पान १४ साठी
पावसाळ्यात मृद व जलसंधारण
उपचारांची घ्यावयाची काळजी
------------------
पावसाळ्यात प्रत्येक मोठ्या पावसानंतर जलसंधारण उपचारांची प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक दुरुस्ती करणे गरजेचे आहे. योग्य वेळी केलेली देखभाल केवळ माती व पाणी वाचवत नाही, तर शेतीची उत्पादकता वाढविण्यास मदत करते.
------------------
डॉ. सुयोग खोसे, डॉ. मधुकर मोरे
--------------
पावसाळा सुरू झाल्यानंतर मृद व जलसंधारणाच्या विविध उपचारांची खरी परीक्षा सुरू होते. पावसाचे पाणी अडविणे, जमिनीत मुरविणे, मातीची धूप कमी करणे, भूजल पुनर्भरण वाढविणे आणि पिकांना आवश्यक आर्द्रता उपलब्ध करून देणे या दृष्टीने जलसंधारण उपचार महत्त्वाची भूमिका बजावतात. मात्र सतत पडणारा पाऊस, अतिवृष्टी, पाण्याचा वाढलेला वेग, गाळ साचणे, बांध फुटणे किंवा निचरा बंद होणे यामुळे या उपचारांची कार्यक्षमता कमी होऊ शकते.
मृद व जलसंधारणाची कोणतीही संरचना उभारल्यानंतर तिची नियमित देखभाल न केल्यास त्या संरचनेवर झालेला खर्च व श्रम वाया जाऊ शकतात. त्यामुळे पावसाळ्यात प्रत्येक मोठ्या पावसानंतर जलसंधारण उपचारांची प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक दुरुस्ती करणे गरजेचे आहे. योग्य वेळी केलेली देखभाल केवळ माती व पाणी वाचवत नाही, तर शेतीची उत्पादकता वाढविण्यास आणि हवामान बदलामुळे निर्माण होणाऱ्या अनिश्चित परिस्थितीला तोंड देण्यासही मदत करते.
----------------
कार्यक्षम निचरा प्रणाली ः
पावसाळ्यामध्ये काही भागात पाण्याची कमतरता असते, तर काही भागात अतिपावसामुळे पाणी साचण्याची समस्या निर्माण होते. शेतात दीर्घकाळ पाणी साचल्यास मुळांना आवश्यक असलेला ऑक्सिजन मिळत नाही. परिणामी मुळे कुजतात, अन्नद्रव्यांचे शोषण कमी होते, बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढतो आणि उत्पादनावर विपरीत परिणाम होतो.
करावयाचे उपाय ः
- मुख्य नाले, उपनाले आणि शेतातील निचरा चर नियमित स्वच्छ ठेवावेत.
- पाणी अडवणारे गवत, झुडपे, गाळ किंवा प्लास्टिक काढून टाकावे.
- निचरा मार्ग बंद झालेल्या ठिकाणी त्वरित दुरुस्ती करून घ्यावी.
- अतिरिक्त पाण्याचा प्रवाह सुरक्षितपणे मुख्य नाल्याकडे वळवावा.
- पाण्याचा वेग जास्त असल्यास दगडी पिचिंग किंवा गवताचा वापर करून धूप रोखावी.
फायदे ः
- शेतात अतिरिक्त पाणी साचत नाही.
- मुळांची वाढ चांगली होते.
- रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो.
- मातीची धूपही कमी होते.
-----------------------
जलसंधारण सरी ः
उभ्या पिकांमध्ये तयार करण्यात आलेल्या जलसंधारण सऱ्या (Conservation Furrow) पावसाचे अतिरिक्त पाणी साठवून जमिनीत मुरण्यास मदत करतात. विशेषतः सोयाबीन, कापूस, तूर, मका, ज्वारी यांसारख्या पिकांमध्ये या सऱ्या पुढील कोरड्या कालावधीत पिकांना आवश्यक ओलावा उपलब्ध करून देतात.
देखभाल ः
- प्रत्येक जोरदार पावसानंतर सऱ्यांची पाहणी करावी.
- गाळ साचला असल्यास त्वरित काढून टाकावा.
- सऱ्यांची खोली व रुंदी पूर्ववत ठेवावी.
- सरीचे तोंड बंद होणार नाही याची दक्षता घ्यावी.
- पाण्याचा प्रवाह अखंड राहण्यासाठी तण व इतर अडथळे दूर करावेत.
--------------
फुटलेल्या बांधांची डागडुजी ः
मृद व जलसंधारणातील मातीचे बांध, कंपार्टमेंट बंडिंग, शेतबांध किंवा इतर अडथळे हे पाण्याचा वेग कमी करून मातीची धूप रोखतात. अतिवृष्टीच्या वेळी या बांधांवर मोठा दाब निर्माण होतो. त्यामुळे अगदी लहान भेगाही पुढे मोठ्या तुटीमध्ये रूपांतरित होऊ शकतात.
करावयाचे उपाय ः
- प्रत्येक मोठ्या पावसानंतर बांधांची प्रत्यक्ष पाहणी करावी.
- झिरपण, खचणे किंवा भेगा आढळल्यास त्वरित दुरुस्ती करावी.
- स्थानिक चिकणमातीने बांध दाबून मजबूत करावा.
- आवश्यक असल्यास दगड किंवा गवताचा वापर करून संरक्षण द्यावे.
- उंदरांची बिळे किंवा इतर छिद्रे त्वरित बुजवावीत.
फायदे ः
- बांध फुटण्याचा धोका कमी होतो आणि संपूर्ण जलसंधारण प्रणाली सुरक्षित राहते.
--------------
शेततळ्यातील पाण्याचा कार्यक्षम वापर ः
पावसाळ्यात भरलेले शेततळे हे केवळ पाणीसाठा नसून पुढील हंगामासाठी संरक्षित सिंचनाची सोय असते. त्यामुळे उपलब्ध पाण्याचा काटकसरीने व नियोजनबद्ध वापर करणे आवश्यक आहे.
व्यवस्थापन ः
- शेततळ्यातील पाण्याची उपलब्धता नियमित तपासावी.
- उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर होण्यासाठी ठिबक किंवा तुषार सिंचनास प्राधान्य द्यावे.
- संरक्षित सिंचनाला प्राधान्य द्यावे.
- पाण्याचे बाष्पीभवन कमी करण्यासाठी शक्य असल्यास वाऱ्यापासून संरक्षण किंवा फ्लोटिंग कव्हरचा वापर करावा.
- शेततळ्याच्या इनलेट आणि आउटलेटची नियमित साफसफाई करावी.
फायदे ः
- उपलब्ध पाण्याचा अधिक क्षेत्रावर आणि अधिक दिवस उपयोग करता येतो.
----------------
शेतचारी, नाले व चरांची साफसफाई ः
शेतातील चर, नाले आणि फील्ड ड्रेन्स यांची वेळोवेळी साफसफाई न केल्यास गाळ साचून पाण्याचा प्रवाह मंदावतो.
देखभाल ः
- गाळ, पालापाचोळा आणि तण नियमित काढावे.
- चरांची मूळ खोली कायम ठेवावी.
- धूप झालेल्या कडांची दुरुस्ती करावी.
- पाण्याचा प्रवाह अडवणारे अडथळे दूर करावेत.
------------
‘सीसीटी’च्या खालच्या बाजूच्या बांधावर वृक्षलागवड ः
- डोंगर उतारावरील सीसीटीमध्ये साठणारे पाणी जमिनीत मुरण्यास मदत करते. या ‘सीसीटी’च्या खालच्या बाजूच्या बांधावर वृक्षलागवड केल्यास त्या बांधाची स्थिरता वाढते. यासाठी करंज, सीताफळ, बांबू, आवळा, कडुनिंब, साग, ग्लिरिसिडिया, शिसम यांसारख्या स्थानिक प्रजातींची निवड करावी.
फायदे ः
- वृक्ष लागवडीमुळे मातीची धूप कमी होते.
- कार्बन साठवण वाढते.
- जैवविविधतेला चालना मिळते.
- या लागवडीतून चारा किंवा फळांचे अतिरिक्त उत्पन्न मिळू शकते.
----------------
गाळ व्यवस्थापन ः
पावसाळ्यात जलसंधारण संरचनांमध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ साचतो. हा गाळ वेळेवर न काढल्यास पाणीसाठवण क्षमता कमी होते.
करावयाचे उपाय ः
- शेततळे, सीसीटी, चर, लूज बोल्डर स्ट्रक्चर आणि इतर संरचनांतील गाळ नियमित काढावा.
- काढलेला सुपीक गाळ शेतामध्ये पसरवावा.
फायदे ः
- संरचनेची मूळ क्षमता कायम राहते आणि सुपीक मातीचा पुनर्वापर होतो.
--------------
सांडव्यांची तपासणी ः
- शेततळे, वनराई बंधारे किंवा इतर जलसंधारण संरचनांमधील अतिरिक्त पाणी सुरक्षितपणे बाहेर जाण्यासाठी सांडवा असतो.
- सांडवा गवत, गाळ किंवा दगडांनी बंद झालेला नसावा.
- अतिरिक्त पाणी सुरक्षितपणे बाहेर पडत आहे याची खात्री करावी.
- सांडव्याजवळ धूप झाल्यास तातडीने दुरुस्ती करावी.
गवताचे संरक्षण ः
- बांधांवरील नैसर्गिक गवत पूर्णपणे काढून टाकू नये.
- गवतामुळे पाण्याचा वेग कमी होतो.
- मातीची धूप कमी होते.
- बांधांची स्थिरता वाढते.
- आवश्यकतेपुरतेच गवत काढावे.
------------------
अतिवृष्टीनंतर संरचनांची पाहणी ः
प्रत्येक अतिवृष्टीनंतर सर्व जलसंधारण संरचनांची प्रत्यक्ष तपासणी करावी. विशेषतः खालील बाबी तपासाव्यात,
- बांध फुटले आहेत का?
- कुठे झिरपण सुरू आहे का?
- गाळ साचला आहे का?
- निचरा सुरळीत आहे का?
- सीसीटी आणि सऱ्या भरून गेल्या आहेत का?
यामुळे लहान दोष वेळेत दुरुस्त होऊन मोठे नुकसान टाळता येते.
महत्त्वाच्या बाबी ः
- प्रत्येक ५० ते ७५ मि.मी. किंवा त्यापेक्षा अधिक पावसानंतर संरचनांची पाहणी करावी.
- शेतात पाणी २४ ते ४८ तासांपेक्षा जास्त काळ साचणार नाही याची काळजी घ्यावी.
- सर्व जलसंधारण उपचारांचा एकत्रित विचार करून व्यवस्थापन करावे.
- शेततळ्यातील पाण्याचा काटकसरीने वापर करावा.
- गाळ नियमित काढावा.
- सांडवा व निचरा व्यवस्था कायम कार्यरत ठेवावी.
- सीसीटी परिसरात वृक्षलागवड व तणनियंत्रण नियमित करावे.
---------------------
- डॉ. सुयोग खोसे, ९४०३६ १३४७१
(विषयतज्ज्ञ, कृषी अभियांत्रिकी विभाग, कृषी विज्ञान केंद्र, नारायणगाव, जि. पुणे)
फोटो ः
‘सीसीटी’च्या खालील बाजूच्या बांधावर वृक्षलागवडीसाठी स्थानिक प्रजातींची निवड करावी. PNE26W44800
बांधांवरील नैसर्गिक गवत पूर्णपणे काढून टाकू नये. त्या गवताचे संरक्षण करावे. PNE26W44801
-----------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.