राजगुरूनगर, ता. २८ : खेड तालुक्यातील दावडी येथे २०१८ मध्ये एकतर्फी प्रेमातून पीडितेच्या भावाचा खून केलेल्या प्रकरणातील आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर आता मुंबई उच्च न्यायालयातील अपिलाच्या कामकाजासाठी ॲड. सागर कोठारी यांची विशेष सरकारी अभियोक्ता म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या विधी व न्याय विभागाने मंगळवारी (ता. २७) याबाबत अधिसूचना जारी केली.
खेड पोलिस ठाण्यात २०१८ मध्ये दाखल झालेल्या या गुन्ह्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या फौजदारी अपील प्रकरणात आता ॲड. कोठारी शासनाची बाजू मांडणार आहेत. दावडी येथे सुदाम खेसे हे आपल्या दोन मुली व एका मुलासह राहतात. खेसे यांचा भाचा आरोपी अजित कान्हूरकर याचे मामाच्या एका मुलीवर एकतर्फी प्रेम होते. तिच्याशी लग्न लावून देत नाहीत म्हणून अजित याने तिचे छायाचित्र आणि त्या छायाचित्रासोबत अश्लील छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल केले होते, म्हणून खेसे कुटुंबीयांनी खेड पोलिस ठाण्यात ८ जून २०१८ ला तक्रार दिली होती. त्याचा राग मनात धरून सूड घेण्यासाठी अजितने मामाचा बारावीत शिकणारा १८ वर्षांचा मुलगा श्रीनाथ याचा १२ जून २०१८ ला चालत्या एसटीमध्ये कोयत्याने सपासप वार करून खून केला होता.
खेड येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात या खटल्याचे कामकाज ॲड. कोठारी यांनी विशेष सरकारी अभियोक्ता म्हणून पाहिले. न्यायालयाने १० फेब्रुवारी २०२५ला आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्यावर आरोपीने उच्च न्यायालयात अपील केले आहे. मूळ खटल्यात सरकारी पक्षाची बाजू मांडल्यानंतर आता उच्च न्यायालयातील अपिलाची जबाबदारीही ॲड. कोठारी यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.