कडूस, ता. १६ : राजगुरुनगर (ता. खेड) शहरवासीयांची पाण्याची प्रतीक्षा अखेर कायमस्वरूपी संपणार आहे. २६ जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिनापासून शहराला दररोज नियमित आणि सुरळीत पाणी पुरवठा केला जाईल, अशी घोषणा नवनिर्वाचित नगराध्यक्ष मंगेश गुंडाळ यांनी केली.
चासकमान धरणातून वेताळे येथील डोंगरावरील पाणी साठवण टाकीत पाणी उचलून व तेथून सुमारे १५ किलोमीटर अंतराच्या पाईपलाईनद्वारे राजगुरुनगर शहराला पाणीपुरवठा करण्यात येत आहे. ही पाणी योजना झाली, परंतु अनेक तांत्रिक अडचणींमुळे अद्यापही शहरातील नागरिकांची पाणी समस्या सुटली नाही. ही समस्या गंभीर वळणावर आहे. सध्या शहराला अनियमित व अपुरे पाणी मिळत आहे. पाणी समस्येने नागरिक त्रस्त झाले आहेत. शहराच्या पाणी समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी राजगुरुनगर नगरपरिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष गुंडाळ यांनी पुढाकार घेतला आहे. निवडून आल्यानंतर त्यांनी शहराचा पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे काम प्राधान्याने हाती घेतले आहे. त्यांनी वेताळे येथील पंप हाऊस व धरणातून पाणी उचलणाऱ्या जलवाहिनीची प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली.
वेताळे येथील डोंगरावर धरणातून पाणी उचलणारी एकच जलवाहिनी होती, तीसुद्धा वारंवार नादुरुस्त होत होती. त्यातच वेताळे ते राजगुरुनगरपर्यंत पाणी वाहून आणणारी जलवाहिनीसुद्धा अनेक तांत्रिक कारणाने वारंवार नादुरुस्त व्हायची. त्यामुळे शहराला सुरळीत पाणी पुरवठा होत नव्हता. धरणातून १५० अश्वशक्तीच्या दोन विद्युत पंपाच्या साहाय्याने पाणी उचलले जात होते. परंतु, पाण्याच्या अतिदाबामुळे डोंगरावरील पाणी साठवण टाकीत पाणी वाहून नेणारी ही जलवाहिनी वारंवार नादुरुस्त व्हायची. एका पंपाने पाणी उचलले तर शहराला पाणी पुरवठा करणे शक्य होत नव्हते. यामुळे शहराचा पाणी पुरवठा सुरळीत होण्यात अडचण निर्माण होत होती. यावर गुंडाळ यांनी नगरपरिषदेच्या माध्यमातून धरणातून डोंगरावरील पाणी साठवण टाकीपर्यंत दुसरी जलवाहिनी खोदण्याचा निर्णय घेतला.
नगरपरिषदेने हे काम युद्धपातळीवर हाती घेतले. आता हे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. दुसरी पाइपलाइन टाकल्यामुळे दोन जलवाहिनीद्वारे प्रत्येकी दीडशे अश्वशक्तीच्या विद्युत पंपाद्वारे डोंगरावरील पाणी साठवण टाकीत पाणी साठा करून ते शहराला पुरविणे शक्य होणार आहे. तसेच, वेताळेपासून राजगुरूनगरपर्यंतच्या जुन्या जलवाहिनीच्या दुरुस्तीची कामेही वेगाने पूर्ण केली जात आहेत. त्यातील तांत्रिक दोष दूर करण्यात येत आहेत. डोंगरावरील टाकीपासून वितरण व्यवस्थेतील गळती आणि दुरुस्तीची कामे अंतिम टप्प्यात आहेत. ही कामे पूर्ण करून प्रजासत्ताक दिनापासून शहराला दररोज व नियमित पाणी पुरवठा केला जाईल, अशी घोषणा गुंडाळ केली आहे. या दुरुस्तीमुळे शहराच्या विविध भागांतील पाण्याच्या टाक्या आता पूर्ण क्षमतेने भरल्या जातील. पाणी सोडण्याच्या वेळा निश्चित करून त्याचे काटेकोर पालनसुद्धा केले जाईल. याचे नियोजन झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.