राज्यसभेच्या १२ जागांसाठी निवडणूक
उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगालच्या जागांवर १६ ऑक्टोबरला मतदान
सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता. २२ : उत्तर प्रदेश (यूपी) आणि उत्तराखंडमधील राज्यसभेच्या ११ जागांसाठी; तसेच पश्चिम बंगालमधील एका रिक्त जागेसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक कार्यक्रम आज जाहीर केला. निवृत्त होणाऱ्या खासदारांमध्ये पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी, समाजवादी पक्षाचे नेते प्रा. रामगोपाल यादव यांचा समावेश असून या जागांसाठी १६ ऑक्टोबरला निवडणूक होईल.
उत्तर प्रदेशातील राज्यसभेच्या दहा आणि उत्तराखंडमधून निवडून आलेल्या एका सदस्याचा कार्यकाळ नोव्हेंबरमध्ये संपत आहे. या एकूण ११ जागांसाठी निवडणूक होत आहे. यासोबतच पश्चिम बंगालमधील एका राज्यसभा सदस्याने राजीनामा दिल्याने ही जागा रिक्त झाली आहे. या जागेसाठी पोटनिवडणूक घेण्यात येणार असून, संबंधित सदस्याचा कार्यकाळ दोन एप्रिल २०३२पर्यंत होता.
निवडणुकीची अधिसूचना २९ सप्टेंबरला जारी केली जाईल. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत सहा ऑक्टोबर असून, सात ऑक्टोबरला अर्जांची छाननी होईल. उमेदवारी मागे घेण्याची अंतिम मुदत नऊ ऑक्टोबर आहे. निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार १६ ऑक्टोबरला सकाळी नऊ ते दुपारी चार या वेळेत मतदान होईल. त्याच दिवशी सायंकाळी पाच वाजता मतमोजणी केली जाणार आहे. या निवडणुकीत मतपत्रिकेवर पसंतीक्रमाद्वारे मतदान नोंदविण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या जांभळ्या रंगाच्या स्केच पेनचाच वापर करावा लागणार आहे.
निवृत्त होणारे राज्यसभा सदस्य
उत्तर प्रदेश (१० जागा)
- अरुण सिंह, गीता ऊर्फ चंद्रप्रभा, नीरज शेखर, बृजलाल, डॉ. दिनेश शर्मा, हरदीपसिंग पुरी, सीमा द्विवेदी, बी. एल. शर्मा (सर्व भाजप), प्रा. रामगोपाल यादव (समाजवादी पक्ष), रामजी गौतम (बहुजन समाज पक्ष)
उत्तराखंड (१ जागा)
नरेश बन्सल (भाजप)
पश्चिम बंगाल (१ पोटनिवडणूक)
रुक्मिणी मलिक (तृणमूल काँग्रेस) यांच्या राजीनाम्यामुळे जागा रिक्त.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.