शिरूर, ता. १ : बहिणीकडून राखी बांधून करडे येथे घरी परतणाऱ्या शंकर तुकाराम काळे (वय २८) या तरुणाचा दुचाकी अपघातात मृत्यू झाला. शिरूर तालुक्यातील करडे-रांजणगाव या अष्टविनायक मार्गावर मंगळवारी (ता. १) सकाळी ही दुर्दैवी घटना उघडकीस आली. याप्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळचे पिंपरी येथील असलेले शंकर काळे हे करडे येथील एसव्हीएफ रेफ कॉम प्रा. लि. कंपनीत कामाला होते व आई शांता काळे यांच्यासह तेथेच राहत होते. सोमवारी (दि. ३१) रक्षाबंधनासाठी ते आईसह चऱ्होली बुद्रूक येथे बहिणीकडे गेले होते. रात्री उशीर झाल्याने आईला बहिणीच्या घरी सोडून ते साडेआठच्या सुमारास दुचाकीवरून (क्र. एमएच २० एफटी ६५३४) करडे येथे परत निघाले होते. मंगळवारी सकाळी शिरूर पोलिसांनी शंकर यांच्या आईच्या मोबाइलवर संपर्क साधून अपघाताची माहिती दिली. नातेवाईकांनी न्हावरे येथील ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली असता, डॉक्टरांनी शंकर यांना मृत घोषित केले. याप्रकरणी त्यांचे दाजी विकी गोरख बुर्डे यांनी पोलिसांना माहिती दिली. अज्ञात वाहनाने धडक दिली की वळणावर दुचाकी घसरली, याचा शोध पोलिस घेत आहेत.
प्रवास ठरला अखेरचा
दाजींनी घेतलेली नवीन मोटार पाहण्यासाठी आणि बहिणीकडून राखी बांधून घेण्यासाठी शंकर आईसह बहिणीच्या घरी गेले होते. रक्षाबंधनाचा कार्यक्रम आनंदात साजरा झाला, मात्र रात्रीचा परतीचा प्रवास त्यांच्यासाठी अखेरचा ठरला. सकाळी त्यांच्या अपघाती निधनाची बातमी आल्याने काळे व बुर्डे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.