वडापुरी, ता. ३० : जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज व प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल लाखेवाडीमधील विद्यार्थिनींनी अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरे केले.
रुग्णसेवेचे अखंड व्रत हाती घेतलेल्या शासकीय रुग्णालय इंदापूर तसेच बावडा येथील डॉक्टर, परिचारिका, अधिकारी वर्ग ज्यांनी काळ, वेळ न पाहता रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा मानली अशा डॉक्टरांच्या रूपातील देवालाच राखी बांधून आपले सलोखा व स्नेहाचे बंध जपले. तसेच ''खाकी हीच राखी'' मानून संरक्षण करणारे, आपले कर्तव्य निभावणाऱ्या इंदापूर पोलिस स्टेशन व बावडा पोलिस स्टेशनमधील सर्व पोलिस कर्मचाऱ्यांना राखी बांधली. यासह विद्यार्थिनींनी शेतकऱ्यांना राखी बांधून त्यांच्या कष्टाचे मोल जाणले.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्रीमंत ढोले व उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले यांनी हा अनोखा उपक्रम राबवण्याची प्रेरणा दिली.
जय भवानीगड विकास प्रतिष्ठानचे मुख्य सल्लागार प्रदीप गुरव यांच्या संकल्पनेतून हा स्तुत्य उपक्रम राबवण्याचा सल्ला दिला.
या उपक्रमासाठी विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य गणेश पवार, प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य राजेंद्र सरगर, गणेश नगरे, तेजल इनामके या शिक्षकांचे मोलाचे सहकार्य लाभले.