मनाला करा रिसेट
फारुख काझी
कधी कधी मन अगदी जुन्या कपाटासारखं वाटतं. वर्षानुवर्षे साचलेल्या आठवणी, अपूर्ण इच्छा, न बोललेले शब्द, अपमानाच्या खुणा, अपेक्षांची धूळ आणि उद्याच्या काळजीची जळमटं. सगळं काही त्यात साठलेलं असतं. कपाट भरलं की त्यात नवीन काही ठेवता येत नाही. मनाचंही तसंच आहे. म्हणूनच, वेळोवेळी मनाला रिसेट करणं ही चैनीची नव्हे, तर जगण्याची गरज आहे. आपण मोबाइल हँग झाला, की क्षणाचाही विलंब न लावता तो रिसेट करतो. पण मन अडकून पडलं की मात्र आपण त्यालाच दोष देत राहतो. ‘इतकं का विचार करतोस?’, ‘विसरून जा!’, ‘पुढे चल!’ अशी वाक्यं मनाला सांगतो; पण मन हे यंत्र नाही. त्याला समजून घ्यावं लागतं, ऐकून घ्यावं लागतं आणि कधी कधी शांत बसू द्यावं लागतं. शरीराचा थकवा दिसून येतो, मनाचा थकवा अदृश्य असतो. दिसून येत नाही, पण जाणवत राहतो. चेहऱ्यावर हास्य असतं, काम सुरू असतं, बोलणं सुरू असतं; पण आत कुठेतरी विचारांचा कल्लोळ उसळलेला असतो. प्रत्येक संदेशाला उत्तर देणारा माणूस स्वतःच्या मनाच्या हाकेला मात्र अनेकदा उत्तर देत नाही. हीच खरी शोकांतिका आहे.
मनाला रिसेट करण्यासाठी हिमालय गाठण्याची गरज नसते. एखादी शांत सकाळ, पावसाच्या सरींकडे निवांत पाहणं, जुन्या मित्राशी मनमोकळं बोलणं, आवडतं पुस्तक हातात घेणं, मुलांच्या निरागस हसण्यात हरवून जाणं किंवा स्वतःच्या चुका स्वतःच माफ करणं - हीसुद्धा मनाची पुनर्बांधणीच असते. सततची चिंता, काळजी, अतिविचार, शंका यांत मन गोंधळून गेलेलं असतं. काय करावं हे सुचत नाही. तेव्हा मनाला रिसेट करायची वेळ आलेली आहे हे समजून जावं. मग निघावं भटकायला. भटकणं हा उत्तम पर्याय आहे. संगीत ऐकणं, मनाला प्रसन्न करतील अशी छानशी पुस्तकं वाचणं - असे अनेक पर्याय आहेत, तुम्हाला हवा तो निवडा. काही लोक लोकांचा संपर्क तोडून बसतात. एककल्ली होतात पण असं करून खरंच उपयोग होतो? तर नाही! अशा वेळी गरज असते जवळच्या मित्रांशी बोलण्याची!
आजच्या जगात माहितीचा महापूर आहे; पण मनःशांतीचा दुष्काळ आहे. आपण सतत जोडलेले आहोत, पण स्वतःशीच तुटत चाललो आहोत. म्हणूनच काही वेळ मोबाइल बंद करण्यापेक्षा मनातील अनावश्यक गोंगाट बंद करणं अधिक महत्त्वाचं आहे. जीवनात प्रत्येक सूर्योदय नवी सुरुवात घेऊन येतो. प्रश्न एवढाच असतो, की आपण कालच्या अंधाराची फाइल अजून उघडी ठेवली आहे का? ती बंद करण्याचं धैर्य ज्याने मिळवलं, त्यालाच नव्या दिवसाचा प्रकाश दिसतो. नवी वाट दिसते. मनाला रिसेट करणं म्हणजे आयुष्य बदलणं नव्हे; तर आयुष्याकडे पाहण्याची दृष्टी बदलणं होय. आणि अनेकदा, बदलाची सुरुवात बाहेरून नसतेच - ती आपल्या मनाच्या शांत कोपऱ्यातूनच होत असते.
.............
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.