पिंपरी, ता. १० ः राष्ट्रीय श्रमिक आघाडी संघटनेच्या वतीने संत तुकाराम नगर येथील जगद्गुरु संत तुकाराम महाराज सभा मंडपामध्ये क्रांती दिन साजरा करण्यात आला. यावेळी शेकडो कामगार उपस्थित होते. या मेळाव्यात राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंत भोसले यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ‘‘कामगारांना न्याय मिळावा म्हणून आपला लढा सुरूच राहील. संविधान, न्यायव्यवस्था व आपल्या सरकारवर आमचा विश्वास आहे. संविधानाने दिलेले कामगारांचे अधिकार त्यांना मिळवून देण्यासाठी ३० वर्षांत आम्ही अनेक मोर्चे काढले. रस्त्यावर आंदोलने केली. सात वेळा उपोषण केले. परंतु, कायमस्वरूपी कामगारांची संख्या घटून दिवसेंदिवस कंत्राटदार आणि कंत्राटी कामगारांची संख्या वाढली. श्रमिक शेतकरी व कामगार हितासाठी लोकशाहीचे हे आपले स्तंभ कठोर पावले उचलतील व आपल्याला न्याय मिळवून देतील अशी खात्री आम्ही देतो.’’
-----