तळेगाव दाभाडे, ता. ४ : मावळ तालुक्यात निसर्गाच्या लहरीपणाचा सामना केल्यानंतर आता भात कापणीला वेग आला आहे. दुसरीकडे रब्बी ज्वारीच्या बियाण्यांची कमतरता असल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.
भात निसावण्याच्या काळात पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांसमोर पिके वाचविण्याचे आव्हान होते. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची उपलब्धता होती, त्यांनी कसरत करून पिके जगवली. त्यानंतर कापणीच्या तोंडावर परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. मात्र, या पावसामुळे भातपिकाचे मोठे नुकसान झाले.
पवन मावळातील दारूंब्रे येथे सध्या भात कापणीची लगबग सुरू आहे. शेतातील पाणी कमी झाल्याने शेतकरी कापणीच्या कामात व्यस्त आहेत. अनेक महिला शेतकरी भात कापणी करत आहेत. सोमाटणेपासून खालच्या पट्ट्यात उत्पादनात वाढ होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली. पूर्वीच्या तुलनेत आता भात कापणीसाठी मजूर मिळवणेही जिकिरीचे झाले असल्याचे शेतकरी तानाजी बाळू वाघोले यांनी सांगितले.
दरम्यान, भात कापणीनंतर रब्बी हंगामातील पेरणीची तयारी शेतकऱ्यांना करावी लागते. सोयाबीन काढणीनंतर रब्बी ज्वारीची पेरणी केली जाते. यासाठी कृषी विभागाने महाडीबीटी पोर्टलवर रब्बी ज्वारी बियाणे मिनी किटसाठी शेतकऱ्यांची नोंदणी केली आहे. आंदर, नाणे आणि पवन मावळातील शेतकऱ्यांना पाच दिवसांत बियाणे घेऊन जाण्याचे संदेशही पाठविण्यात आले आहेत. मात्र, आठ दिवस उलटूनही तालुका कृषी कार्यालयातून बियाण्यांचे वाटप झालेले नाही. त्यामुळे पेरणीला विलंब होत आहे. बियाणे वाटपाला नेमका विलंब का होत आहे, याबाबत शेतकऱ्यांना माहिती मिळत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. कृषी विभागाने तातडीने बियाणे उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
दरम्यान, येत्या दोन दिवसांत बियाणे मिळतील, असे मावळ तालुका कृषी अधिकारी मारूती साळे यांनी सांगितले.
---
दारूंब्रे ः भात कापणी करत असताना महिला शेतकरी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.