पुणे

धान्य दर वाढ

CD

पान १०- ९ साठी
००००००००००००००
बाजारपेठेत तांदळाचे चढेच दर...
------------------------
सणासुदीचा हंगाम सुरू होत असतानाच अवघ्या एका महिन्यात आधी साखर, आता तांदळाचे दर सुमारे ११ टक्क्यांनी वाढले आहेत. यामागचे कारण शोधण्यासाठी आम्ही भंडाऱ्यातील भातशेतीपासून वाशीतील घाऊक बाजारपेठेतील धान्य खरेदी- विक्रीचा मागोवा घेतला.
------------
मयूरी सामल, बी. वेणूगोपाल
-------------------
जेवण पूर्ण होण्यासाठी काय लागते, असे महाराष्ट्रात कोणालाही विचारले, तर उत्तर बहुधा गरमागरम भात असेच येईल. यंदा सणासुदीचा हंगाम सुरू होताना तांदूळ महाग होत आहे. ऑगस्ट २०२६ च्या अखेरच्या व्यवहारांची आकडेवारी दर्शवते, की राज्यभरातील घाऊक आणि किरकोळ बाजारात तांदळाचे दर अवघ्या एका महिन्यात सुमारे ११ टक्क्यांनी वाढले आहेत. व्यापारी सांगतात, की यामागे दोन कारणे आहेत. एक म्हणजे बाजारात तांदळाची आवक कमी झाली आहे. दुसरे कारण म्हणजे गणेशोत्सव, नवरात्री आणि दिवाळीसाठी नागरिक तांदळाचा साठा करत असल्याने खरेदी वाढली आहे. मात्र शेतकरी, तांदूळ गिरणीमालक आणि घाऊक व्यापाऱ्यांशी बोलले, की याहून मोठे चित्र समोर येते. साखळीतील प्रत्येकाला एकाच वेळी चटका बसत आहे.
महाराष्ट्रातील प्रत्येक भागात भात उत्पादन होत नाही. पश्चिम किनाऱ्यावरील कोकण पट्ट्यात पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथील शेतकरी भातशेतीवर अवलंबून आहेत. पूर्वेकडे विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली हे भाताचे मुख्य केंद्र आहे. कोकण आणि विदर्भ पट्ट्यांतील भातशेतीचा हंगाम नैर्ऋत्य मोसमी पावसाबरोबर सुरू होतो. काही मोजक्या प्रमुख प्रदेशांतून होणारा पुरवठा मंदावला, की राज्यभरातील दुकाने आणि वितरकांना त्याचा जवळपास लगेचच फटका बसतो.


शेतकऱ्यांची बाजू : जास्त दर, कमी नफा
यंदा पेरणीच्या वेळी सुरुवातीच्या महिन्यांत आम्ही अत्यंत अनिश्चित पावसाच्या चक्रांना तोंड दिल्याचे भंडारा येथील भात उत्पादक विठ्ठल राव यांनी सांगितले. ते म्हणाले, की पीक टिकून राहिले आहे, परंतु उत्पादनासाठी लागणारी जवळजवळ प्रत्येक गोष्ट आता महागली आहे. चांगले बियाणे, भाडोत्री मजूर, खते आणि पीक स्थानिक एपीएमसी बाजारात नेणाऱ्या ट्रॅक्टरच्या दरात मोठा वाढ झाली आहे. शहरांतील ग्राहकांना दिसणारे किरकोळ दर जास्त असूनही आमचा कसाबसा खर्च भरून निघत आहे. मुंबईत ग्राहक जो दर देतो आणि मंडीत शेतकऱ्याला जो दर मिळतो, हे दोन्ही आकडे अगदी वेगळे आहेत.

दरवाढीमागील कारणे ः
आवक घटली : प्रमुख उत्पादक केंद्रांतून, तसेच भात पिकवणाऱ्या इतर काही राज्यांतूनही बाजारात येणाऱ्या गोण्यांची संख्या कमी झाली आहे. पुरवठा आटतो पण मागणी तशीच राहते, तेव्हा दर झपाट्याने वाढतात.
परदेशात निर्यात ः परदेशी खरेदीदारांना होणाऱ्या निर्यातीमुळे स्थानिक बाजारातील धान्य कमी होते, आणि त्यामुळे देशांतर्गत दरांवरील दबाव वाढतो.
सणासुदीची गर्दी : गणेशोत्सव, नवरात्री आणि दिवाळी एकापाठोपाठ येतात.या काळात मोठ्या प्रमाणातील खरेदीमुळे मागणी वाढते.
धान्याचा प्रवास : तांदूळ तुमच्या ताटात येईपर्यंत अनेक हातांतून जातो, आणि प्रत्येक टप्प्यावर हाताळणी शुल्क, साठवणूक खर्च आणि इंधनाचा खर्च वाढत जातो.
लहरी मॉन्सून : भाताला सातत्यपूर्ण पाणी लागते. अनियमित पावसामुळे उत्पादनाचे अंदाज घटू शकतात आणि पीक कमी येईल या भीतीनेही दर वर सरकू शकतात.
शेतीचा वाढता खर्च ः बियाणे, मजुरी, खते, कीटकनाशके, यंत्रांचे भाडे आणि कापणीनंतरची वाहतूक हे सर्व उत्पादकांसाठी महाग झाले आहे.

वाशी बाजारातील घाडमोडी ः
नवी मुंबईतील वाशी एपीएमसी बाजारात घाऊक तांदूळ एका महिन्यापूर्वीपेक्षा सुमारे ११ टक्क्यांनी महाग आहे, आणि ही वाढ आता गल्लीतील दुकानांपर्यंत पोहोचली आहे. साखर महागल्यानंतर लगेचच हे घडले आहे, त्यामुळे आधीच बजेटकडे लक्ष ठेवणाऱ्या कुटुंबांना आता रोजच्या वापरातील तांदळाच्या दराची चिंता आहे. दिवाळीपर्यंत मागणी वाढतच राहील, त्यामुळे दर आणखी वाढू शकतात, असा इशारा व्यापारी देतात.
येथील दर मोठ्या उत्पादक राज्यांतून, म्हणजेच महाराष्ट्र, मध्य प्रदेश, बिहार, छत्तीसगड आणि पश्चिम बंगाल येथून किती तांदूळ येतो, यावर बऱ्याच प्रमाणात अवलंबून असतात. वाढती मागणी, यापैकी काही राज्यांतून कमी झालेली आवक आणि निर्यात याचा महत्त्वाचा परिणाम होतो.

चौकट ः तांदळाचे प्रकार आणि अंदाजे दर (प्रति किलो)
प्रकार ---घाऊक--- किरकोळ
कोलम---४५ – ७०--- ५५ – ८५
इंद्रायणी--- ५० – ७५--- ६५ – ९०
आंबेमोहोर---८५ – १२०--- १०० – १३५
बासमती तुकडा (तुटलेला)--- ६० – ७०--- नोंद उपलब्ध नाही
मोगरा ---६० – ७०--- नोंद उपलब्ध नाही.

दर कधी कमी होणार?
वाशी एपीएमसीमधील अनुभवी घाऊक वितरक अश्विन शहा यांनी परिस्थितीचे वर्णन करताना सांगितले,की पुरवठा साखळीतील अडथळे आणि सर्वोच्च मागणी यांची गाठ महत्त्वाची ठरली आहे. वाहतूक खर्च वाढला आहे. तसेच प्रमुख उप-प्रदेशांतून तांदूळ केवळ अधूनमधून येत आहे. मुख्य खरीप हंगामाचे पीक पूर्णपणे बाजारात आल्यानंतर, म्हणजे दिवाळीनंतरच दिलासा मिळेल, तोपर्यंत ग्राहकांनी चढ्या दरांसाठी तयार राहावे.
---------------------
इन्फो ः

एका दृष्टिक्षेपात तांदळाचे दर :
तांदळाच्या दरातील वाढ ः एका महिन्यात सुमारे ११ टक्के (घाऊक आणि किरकोळ, ऑगस्ट २०२६ अखेर)
भाताचे प्रमुख पीक क्षेत्र ः कोकण (पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग); विदर्भ (भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली)
भातासाठी एमएसपी ः खरीप २०२६-२७ २,४४१ प्रति क्विंटल (सामान्य); २,४६१ (ए ग्रेड)
२०२५-२६ च्या तुलनेत एमएसपीमधील बदल ः ७२ प्रति क्विंटलने वाढ, सुमारे ३ टक्के (२,३६९ वरून)
दर कमी होण्याची अपेक्षा ः दिवाळीनंतर, खरिपाचे पीक बाजारात आल्यावर (व्यापाऱ्यांचा अंदाज)

केंद्र सरकारने २०२६-२७ च्या खरीप हंगामासाठी सामान्य भातासाठीची किमान आधारभूत किंमत (एमएसपी) सुमारे तीन टक्क्यांनी वाढवली. बाजारात मात्र अवघ्या एका महिन्यात ११ टक्क्यांनी दराने उडी घेतली आहे, त्यामुळे केवळ आधारभूत किमतीने काय घडत आहे हे स्पष्ट होत नाही. हे दोन आकडे वेगवेगळ्या गोष्टी मोजतात, पण त्यातील तफावत पुरवठा साखळीवर किती ताण आहे हे दाखवते.
महाराष्ट्रात तांदळाचे दर चौफेर दबावामुळे वाढत आहेत. बाजारपेठेत कमी आवक, सणासुदीची मागणी, महाग वाहतूक आणि निविष्ठा, आणि लहरी मॉन्सूनचा परिणाम दिसत आहे. ग्राहकांसाठी पुढील काही आठवडे सर्वांत कठीण असतील. विठ्ठल राव यांच्यासारख्या शेतकऱ्यांसाठी मोठा प्रश्न हा आहे, की वाढलेल्या दराचा काही भाग तरी शेतापर्यंत पोहोचतो का? दिवाळीनंतर आपल्याला अधिक चित्र कळू शकेल.
------------------------------------------------
इमेल ः mahisamal15@gmail.com
(लेखिका भारतीय वृक्षारोपण व्यवस्थापन संस्था, बंगळुरू येथील कृषी व्यवस्थापन शाखेच्या विद्यार्थिनी आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ट्रम्प यांच्यासोबत दिवाळी साजरी करणारे विशाल गोंडल कोण? हनुमान चालीसाही दिली भेट

Mumbai Local: चर्चगेट-विरार फास्ट लोकलमध्ये थरार! दोन प्रवाशांमध्ये जबर मारहाण, धावत्या ट्रेनमधून ढकललं; नेमकं काय घडलं?

Sayaji Shinde Karjat Tree Felling Protest News : "पर्यावरण मंत्र्यांना पर्यावरणाचा किती गंध आहे?"; अभिनेते सयाजी शिंदे यांचा कर्जतमधील वृक्षतोडीवरून सरकारवर घणाघात

Latest Marathi News Live Update: अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलचा मेहुणा सलीम फ्रूटच्या मालमत्तेवर ईडीची मोठी कारवाई

Pune Metro: दिवाळीनिमित्त पुणे मेट्रोच्या वेळापत्रकात बदल; ८ नोव्हेंबरला रात्री ८ नंतर सेवा बंद

SCROLL FOR NEXT