तांदूळ उत्पादन ७० लाख
टनांनी घटण्याची शक्यता
पावसाअभावी फटका; खरिपात भात क्षेत्रात १४ लाख हेक्टरने घट
ॲग्रोवन वृत्तसेवा
पुणे ः देशात यंदा अपुऱ्या पावसाचा भात पिकाला फटका बसला आहे. त्यामुळे तांदूळ उत्पादनात सुमारे ७० लाख टनांनी घट होण्याचा अंदाज केंद्रीय कृषी मंत्रालयाने व्यक्त केला आहे. यंदाच्या खरीप हंगामातील तांदूळ लागवडीतही सुमारे १४ लाख हेक्टरने घट झाली आहे.
केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशात खरीप हंगामात तांदूळ लागवडीखालील सरासरी क्षेत्र ४१२ लाख हेक्टर आहे. यंदा या क्षेत्रात सुमारे १४ लाख हेक्टरने घट झाली आहे. अपुऱ्या पावसामुळे अनेक भागांत पिकाला पाण्याची टंचाई जाणवत असून, त्याचा परिणाम उत्पादनावर होण्याची शक्यता आहे.
राज्यनिहाय पाहता, कर्नाटकात ३.६१ लाख, तेलंगणात ३.२९ लाख, झारखंडमध्ये १.८२ लाख, मध्य प्रदेशात १.७५ लाख, तमिळनाडूत १.२२ लाख, महाराष्ट्रात १.०२ लाख, आसाममध्ये १.२१ लाख, उत्तर प्रदेशात ७० हजार आणि हरियाणात १५ हजार हेक्टरने तांदूळ लागवड घटली आहे. सर्वाधिक घट कर्नाटक, तेलंगणा, झारखंड आणि मध्य प्रदेशात झाली आहे.
गेल्या वर्षी विक्रमी लागवड आणि चांगल्या पावसामुळे देशात १५४० लाख टन तांदूळ उत्पादन झाले होते. यंदा अपेक्षित पाऊस न झाल्याने लागवड आणि उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्यामुळे यंदाचे तांदूळ उत्पादन सुमारे १४७० लाख टन राहण्याचा अंदाज आहे.
जागतिक बाजारात भारताचाच दबदबा
उत्पादनात घट होण्याचा अंदाज असला तरी केंद्र सरकारकडे ऑगस्टअखेर ६३९ लाख टन तांदळाचा साठा आहे. हा साठा संरक्षित साठ्याच्या तुलनेत पाच पटीने अधिक आहे. अन्न सुरक्षा, इथेनॉलसह अन्य उपयोगांसाठी देशाला वर्षाला सुमारे ४५० लाख टन तांदळाची गरज असते. त्यामुळे देशाची गरज भागल्यानंतरही निर्यातीसाठी तांदूळ उपलब्ध राहण्याची शक्यता आहे. लागवड आणि उत्पादनात घट झाली तरी जागतिक तांदूळ बाजारातील भारताचा दबदबा कायम राहील, असा विश्वास तांदूळ निर्यातदार जयराज ग्रुपचे संचालक डॉ. राजेश शाह यांनी व्यक्त केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.