तांदूळ उत्पादनात गुणवत्तावाढ,
शाश्वत शेतीला प्राधान्य द्या
रामनाथ कोविंद ः आंतरराष्ट्रीय तांदूळ परिषद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) ः ‘‘भारताने तांदळाचा प्रमुख उत्पादक आणि निर्यातदार देश या ओळखीपलीकडे जाऊन गुणवत्ता, शाश्वत शेती, कृषी नवकल्पना आणि मूल्यवर्धनाच्या क्षेत्रात जागतिक नेतृत्व मिळविण्याचे उद्दिष्ट ठेवावे,’’ असे आवाहन माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शुक्रवारी (ता. २३) केले.
शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासोबतच नैसर्गिक साधनांचे संरक्षण करण्यासाठी कृषी क्षेत्रातील नवकल्पना आणि शेतकरी-बाजारपेठ यांच्यातील संबंध अधिक मजबूत करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
भारत आंतरराष्ट्रीय तांदूळ परिषद २०२६ मध्ये कोविंद बोलत होते. शुक्रवारी (ता. २३) नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे सुरू झालेल्या या तीन दिवसीय परिषदेचे आयोजन भारतीय तांदूळ निर्यातदार महासंघाने (आयआरईएफ) केले आहे. तांदूळ उद्योगातील जागतिक व्यापार, निर्यातवाढ, बाजारपेठांच्या संधी आणि आगामी काळातील दरांच्या अंदाजावर परिषदेत चर्चा होत आहे.
कोविंद म्हणाले, की जगातील सर्वांत मोठा तांदूळ उत्पादक आणि निर्यातदार देश म्हणून भारताच्या स्थानामुळे अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. तांदूळ उत्पादन आणि निर्यातीतील आघाडी कायम ठेवण्याबरोबरच गुणवत्ता, शाश्वत लागवड पद्धती, कृषी नवकल्पना आणि मूल्यवर्धनाच्या माध्यमातून जागतिक नेतृत्व मिळविण्याचे भारताचे उद्दिष्ट असले पाहिजे, असे त्यांनी नमूद केले.
भारतीय व्यवसायांना नवीन बाजारपेठांमध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय खरेदीदारांशी दीर्घकालीन संबंध निर्माण करण्यासाठी तांदळाचे प्रभावी ब्रँडिंग आणि विश्वासार्ह पुरवठा साखळी विकसित करण्यावरही त्यांनी भर दिला.
तांदूळ उद्योगातील शेतकऱ्यांच्या भूमिकेवर भर देताना कोविंद म्हणाले, की शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाची उपलब्धता, बाजारपेठेच्या गरजांविषयी वेळेवर माहिती, शास्त्रीय साठवणूक सुविधा आणि विश्वासार्ह खरेदीदार मिळाल्यास त्यांच्या उत्पादनाला चांगला परतावा मिळू शकतो. जागतिक स्तरावरील आर्थिक वाढीचा लाभ गावपातळीवरील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल, अशी तांदूळ अर्थव्यवस्था निर्माण करणे हे अंतिम उद्दिष्ट असले पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.
मध्यपूर्वेतील संघर्ष, लाल समुद्रातील वाहतुकीतील अडथळे आणि रशिया-युक्रेन युद्धामुळे जागतिक व्यापार व जहाज वाहतुकीवर परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर भारत जागतिक तांदूळ उद्योगासाठी एक मजबूत आणि विश्वासार्ह केंद्र म्हणून उदयास येऊ शकतो, असे भारतीय तांदूळ निर्यातदार महासंघाचे (आयआरईएफ) अध्यक्ष प्रेम गर्ग यांनी सांगितले.
जागतिक तांदूळ बाजारपेठेतील भारताचे महत्त्व अधोरेखित करताना गर्ग म्हणाले, की २०२५-२६ मध्ये भारताने सुमारे १५४ दशलक्ष टन तांदळाचे उत्पादन केले. तांदूळ निर्यातीचे मूल्य सुमारे १२ अब्ज डॉलर होते. जागतिक तांदूळ व्यापारात भारताचा वाटा जवळपास ४० टक्के आहे. यावरून आंतरराष्ट्रीय अन्नपुरवठा साखळीतील भारताची महत्त्वपूर्ण भूमिका स्पष्ट होते.
१५३ देशांतील खरेदीदारांचा सहभाग
परिषदेसाठी १५३ देशांतील ४ हजार ८५६ आंतरराष्ट्रीय खरेदीदारांनी नोंदणी केली आहे. परिषदेत ६५ वक्ते, नऊ ज्ञानसत्रे आणि डिजिटल व्यासपीठाच्या माध्यमातून निश्चित झालेल्या २ हजार ३८ व्यावसायिक बैठका होणार आहेत. तसेच १८० हून अधिक कंपन्या सहभागी झाल्या आहेत. देशातील २३ राज्यांतील प्रतिनिधीही परिषदेत सहभागी होत आहेत.
‘२०२७ मधील जागतिक तांदूळ मागणी आणि पुरवठा : दर कोसळणार की तेजी येणार?’ या विषयावरील सत्रात बासमती आणि बिगर बासमती तांदळाच्या संभाव्य दरांचा आढावा घेतला जाणार आहे. तसेच २०२७ मध्ये लक्ष ठेवण्याजोग्या प्रमुख दहा तांदूळ बाजारपेठा, पीक सर्वेक्षण, दरांचे पूर्वानुमान, निर्यात कागदपत्रे, विमा, पतपुरवठा, जहाज वाहतूक, गुणवत्ता प्रमाणन, सरकारी धोरणे, शाश्वतता आणि तांदूळ प्रक्रिया उद्योगाची नफाक्षमता यांवर चर्चा होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.