मुक्तपीठ
सुविचार
कृती हे ज्ञानाचे उत्तम फळ आहे.
-----
सुभाषित
नाप्राप्यमभिवाञ्छन्ति नष्टं नेच्छन्ति शोचितुम् ।
आपत्स्वपि न मुह्यन्ति नराः पण्डितबुद्धयः ।।
विद्वान माणसे न मिळण्याजोग्या (अशक्य कोटीतल्या) गोष्टींची इच्छा करत नाहीत, नाश पावलेल्या गोष्टींबद्दल दुःख करत नाही आणि संकटकाळी डगमगतही नाहीत.
---
बोधकथा
मित्रभेद
एक व्यापारी संजीवक आणि नंदनक या दोन बैलांच्या गाडीमध्ये सामान ठेवून व्यापारनिमित्त शेजारच्या राज्यात निघाला होता. जंगलात संजीवकाचा पाय मुरगळला व तो चिखलात रूतून बसला. नाईलाजाने व्यापाऱ्याला संजीवकाला तिथे सोडून जाणे भाग पडले. काही दिवसानंतर संजीवक बरा झाला. जंगलातील गवत खाऊन व मोकळ्या हवेमुळे तो धष्टपुष्ट झाला.
एके दिवशी त्या जंगलाचा राजा सिंह पाणी पिण्यासाठी नदीच्या किनाऱ्यावर आला. अचानक संजीवकाचा आवाज त्याच्या कानावर पडला व भीतीने तो पाणी न पिताच परत गेला. दमनक नावाच्या कोल्ह्याने हे पाहिले. तो महाराजांच्या जवळ गेला. पिंगलक म्हणाला, ‘‘कधीही न ऐकलेल्या मोठ्या भीतीदायक आवाजाने मी घाबरलो आहे व त्यामुळे जंगल सोडून निघून जात आहे.’’ हे ऐकताच दमनक म्हणाला, ‘‘महाराज, मी हा आवाज कशाचा आहे याची चौकशी करून येतो.’’ तो आवाजाच्या रोखाने निघाला व त्याला एक बैल दिसला. तो संजीवकाला घेऊन पिंगलक महाराजांकडे आला. पुढे दोघांची चांगली दोस्ती झाली. महाराज जंगलातील सर्व निर्णय संजीवकाला विचारून घेत असत. यामुळे दमनकाचे महत्त्व कमी झाले.
एके दिवशी पिंगलकाला दमनक म्हणाला, ‘‘महाराज ,तो संजीवक बैल तुमच्या जीवावर उठला आहे. माझ्या धारदार शिंगाने मी पिंगलकाचा बळी घेणार आहे असे तो मित्राला सांगत असताना मी ऐकले आहे. त्यामुळेच मी तुम्हाला सावध करण्यासाठी आलो.’’ हे ऐकताच पिंगलक संजीवकावर रागावला. दमनक लगेच संजीवकाकडे गेला व त्याला म्हणाला, ‘‘मित्रा, आता तुझी काही खैर नाही. महाराज तुझ्यावर भयंकर संतापले आहेत. तू सावध राहा.’’ सिंहाच्या आणि बैलाच्या मनात एकमेकाविषयी द्वेष निर्माण झाला आणि मग संधी साधून पिंगलकाने संजीवकावर हल्ला केला व त्याला मारून टाकले.
तात्पर्य - मैत्रीत फूट पाडून स्वतःचा फायदा करून घेणारे काही जण असतात. आपण त्यांना ओळखावे.
----
लोगो - गीताश्लोक
राजविद्या राजगुह्यं पवित्रमिदमुत्तमम् ।
प्रत्यक्षावगमं धर्म्यं सुसुखं कर्तुमव्ययम् ॥
ज्ञान हे सर्व विद्यांचा आणि सर्व ज्ञात नसलेल्या गोष्टी जाणून घेण्याचा राजमार्ग आहे. ज्ञान हे अतिशय पवित्र, उत्तम, प्रत्यक्ष फळ देणारे, धर्मयुक्त, साधन करण्यास फार सोपे आणि अविनाशी असे आहे.
----
पिंडासन
पिंडासन हे स्पर्धात्मक आसन आहे. चक्रबंधासनचा व्यवस्थित सराव झाला की, या आसनाचा सराव सुरू करावा. एकदा का चक्रासन उत्तम जमू लागले की, चक्रबंधासन, पिंडासन या आसनांचा योग्य मार्गदर्शनाखाली सराव सुरू करण्यास हरकत नाही.
कृती
- प्रथम चक्रासन करावे. त्यानंतर दोन्ही हात कोपऱ्यात वाकवावे व दोन्ही कोपरे जमिनीला टेकवावे. त्यानंतर डाव्या हाताने डाव्या पायाचा अंगठा पकडावा व उजव्या हाताने उजव्या पायाचा अंगठा पकडावा.
- मान, डोके दोन्ही मांड्यांच्या जवळ किंवा मध्यभागी येतील याप्रमाणे वर घ्यावे.
- दृष्टी समोर ठेवावी. श्वसन संथगतीने सुरू ठेवावे.
- साधारणपणे छायाचित्रात दाखवल्याप्रमाणे आसनस्थिती घेण्याचा प्रयत्न करावा.
- आसनस्थितीमध्ये जेवढा वेळ स्थिर राहणे शक्य आहे, तेवढा वेळ स्थिर राहावे.
- आसन सोडताना उलट क्रमाने आसन सोडावे. त्यानंतर पवनमुक्तासन करावे. त्यामुळे पाठीवर आलेला ताण कमी होण्यास मदत होते.
लाभ
- छाती, पोटातील अवयव ताणले गेल्याने त्यांची कार्यक्षमता वाढते. पाठीचा कण्याचा लवचीकपणा वाढतो.
काळजी
सराव योग्य मार्गदर्शनाखाली करावा. आसन सावकाश व शरीराला झटके न देता करावे.
---
ऋषिविचार
मित्रांनो, आपण समजतो की शस्त्रक्रिया करणे हे केवळ आधुनिक वैद्यकीय शास्त्रातच शक्य झाले आहे.मात्र, आपल्याला हे ऐकून आश्चर्य वाटेल की, इसवी सनाच्या आठशे वर्षांपूर्वी ज्यांनी शस्त्रक्रिया कशी करावी, हे सांगणारे शास्त्र विकसित केले, ते होते ऋषी सुश्रुत! आयुर्वेद आणि शल्यचिकित्सामध्ये त्यांनी अमूल्य कार्य केले आहे.
सुश्रुत यांच्या मात्यापित्याविषयी फारशी माहिती उपलब्ध नसली, तरी त्यांच्या वडिलांचे नाव विश्वामित्र होते असे समजते, पण हे विश्वामित्र म्हणजे ऋषी विश्वामित्र नसावेत. कारण, त्यांचा काळ सुश्रुत यांच्या काळाच्या खूप आधीचा आहे. आयुर्वेदाचे आणि शल्यचिकित्सेचे शिक्षण सुश्रुत यांनी धन्वंतरीकडून घेतल्याचा उल्लेख आहे.
सुश्रुत यांनी लिहिलेल्या ‘सुश्रुतसंहिता’ या ग्रंथात शल्यचिकित्सेविषयी सर्व माहिती देण्यात आली आहे. त्यांनी ज्या यशस्वी शस्त्रक्रिया केल्या त्याच्या अनुभवावरून त्यांनी या ग्रंथात शस्त्रक्रियेसाठी लागणाऱ्या १२५ पेक्षा जास्त अशा उपकरणांची विस्तृत माहिती दिली आहे. सुश्रुत हे बाळंतपण, मोतीबिंदूची शस्त्रक्रिया तर करतच होते. मात्र, ज्याला आज आपण आधुनिक विज्ञान असे समजतो ती ‘कॉस्मेटिक सर्जरी’ करण्यातही तरबेज होते. त्यांनी सुमारे ३०० शस्त्रक्रिया केल्याचा उल्लेख आहे.
ऋषी सुश्रुत केवळ शस्त्रक्रियेमध्येच हुशार होते असे नाही, तर मधुमेहावरील उपचार, अतिरिक्त वजनामुळे होणारे आजार, तुटलेल्या हाडांवर करण्यात येणारा उपचार आदींवरदेखील त्यांनी कार्य केले होते. शस्त्रक्रियेदरम्यान जास्त दुखू नये म्हणून दिल्या जाणाऱ्या भुलीवर म्हणजे, ‘ॲनेस्थेशिया’वरही त्यांनी काम केले होते. त्यांचे उत्तराधिरी म्हणून ऋषी चरक यांना मानण्यात येते.
----
दिनविशेष
२२ मे २०१८
भारताने ‘ब्राह्मोस’ ह्या सूपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची पहिली चाचणी यशस्वी केली.
२३ मे १९९९
ग्रॅण्डमास्टर विश्वनाथन आनंदने सलग दुसऱ्या वर्षी ‘चेस ऑस्कर’ हा पुरस्कार पटकावला.
२६ मे २००८
जीवसृष्टी शोधण्यासाठी ‘नासा’ने पाठवलेले ‘फिनिक्स’ यान मंगळावर सुरक्षितपणे उतरले.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.