ढाका, ता. १६ (पीटीआय) : रोहिंग्या निर्वासितांना घेऊन जाणाऱ्या दोन नौका बंगालच्या उपसागरात उलटून ५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. हे सर्व रोहिंगे म्यानमारमधील छळाला कंटाळून पलायन करत होते, अशी माहिती संयुक्त राष्ट्रांच्या अधिकाऱ्यांनी दिली.
आंतरराष्ट्रीय स्थलांतर संघटना आणि संयुक्त राष्ट्रांच्या स्थलांतर विभागाच्या उच्चायुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, म्यानमारच्या राखिन प्रांतातील रोहिंग्यांना घेऊन दोन नौका बंगालच्या उपसागरात उतरल्या होत्या. या नौकांमध्ये त्यांच्या क्षमतेपेक्षा कितीतरी अधिक प्रवासी होते. बांगलादेशातील निर्वासित छावण्यांमधून आलेल्या प्रवाशांचाही त्यात समावेश होता. सुमारे २५० प्रवासी असलेली पहिली नौका प्रवासाला निघाल्यानंतर काही वेळातच बेपत्ता झाली. तर २८० प्रवासी असलेली दुसरी नौका आठ जुलैला म्यानमारच्या किनारपट्टीजवळ बुडाल्याचे समजते. या घटनांची आणि मृतांच्या संख्येबाबत अधिकृत माहिती जाहीर करण्यात आली नसली तरी मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाल्याचा अंदाज दोन्ही जागतिक संस्थांनी व्यक्त केला आहे. पावसाळ्यात समुद्र खवळलेला असतानाही रोहिंग्यांनी प्रवास सुरू केला होता.
म्यानमारमधील हिंसाचार आणि बांगलादेशातील छावण्यांमधील दुरवस्थेमुळे हजारो रोहिंग्या मुस्लिम जीव धोक्यात घालून मलेशियाकडे जाण्याचा प्रयत्न करत आहेत. म्यानमारमध्ये काही वर्षांपूर्वी झालेल्या लष्करी कारवाईनंतर सुमारे १२ लाख रोहिंग्यांनी बांगलादेशात आश्रय घेतला आहे. मात्र, तेथेही मदतीत कपात झाल्याने आणि म्यानमारमध्ये परतणे सुरक्षित नसल्याने अनेक जण अशा धोकादायक प्रवासाचा मार्ग निवडत आहेत. २०२५ मध्ये अशा सागरी प्रवासात ९०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून, हे वर्ष रोहिंग्यांसाठी सर्वाधिक प्राणघातक ठरले आहे. जागतिक समुदायाने या प्रश्नावर शाश्वत तोडगा काढावा आणि शोध व बचाव कार्यासाठी मदत करावी, असे आवाहन ‘यूएनएचसीआर’ आणि ‘आयओएम’ने केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.