खोडद, ता. १२ : हिमालयातील उत्तराखंड राज्यातील अत्यंत खडतर आणि रहस्यमय मानला जाणारा १५ हजार ७०० फूट उंचीचा रूपकुंड ट्रेक जुन्नर तालुक्यातील ६ मावळ्यांनी अवघ्या ४ दिवसांत ''अल्पाईन स्टाईल''ने यशस्वीपणे सर केला. ५२ वर्षीय अनिल काशिद यांच्या नेतृत्वाखाली शिवरायांच्या जन्मभूमीतील या गिर्यारोहकांनी प्रतिकूल परिस्थितीत ही मोहीम फत्ते केली.
जुन्नर तालुक्यातील शेतकरी कुटुंबातील अनिल काशिद यांच्या नेतृत्वाखाली श्रीकांत जाधव, राजेश सातपुते, प्रकाश वणवे, विजय तट्टू आणि सुभाष कुचिक या ६ हौशी गिर्यारोहकांनी १ ऑक्टोबर ते ४ ऑक्टोबर या कालावधीत हा ट्रेक पूर्ण केला. उत्तराखंडमधील वाण गावातून या मोहिमेची सुरुवात झाली होती. गुडघ्यापर्यंत साचलेला बर्फ, ऑक्सिजनची कमतरता, उणे १० अंश तापमान आणि बोचरे वारे अशा आव्हानांचा सामना करत या तरुणांनी हे यश मिळवले.
मोहिमेच्या चौथ्या दिवशी पहाटे बगवाबासा येथून हेडटॉर्चच्या उजेडात अंतिम चढाई सुरू करण्यात आली. सकाळी ६:३० वाजता टीमने १५ हजार ७०० फूट उंचीवरील ''सांगाड्यांचे सरोवर'' म्हणून ओळखले जाणारे रूपकुंड गाठले. तेथून परतीच्या प्रवासात एकाच दिवशी २६ किलोमीटरचा उतार पार करून ही टीम ४ ऑक्टोबर रोजी पुन्हा वाण गावात पोहोचली.
‘‘आमच्याकडे कोणतीही मोठी सुविधा नव्हती, फक्त जिद्द होती. इच्छाशक्ती दृढ असेल तर वयाची मर्यादा आड येत नाही. टीमच्या मनोबलामुळेच हा कठीण ट्रेक यशस्वी झाला.’’
अनिल काशिद, ट्रेकर, हिवरे तर्फे नारायणगाव (ता. जुन्नर)
‘‘उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात त्रिशूल पर्वताच्या कुशीत हे रूपकुंड आहे. येथे ९ व्या शतकातील ५०० ते ८०० मानवी सांगाडे आढळतात. उन्हाळ्यात बर्फ वितळला की हे रहस्यमय सांगाडे दिसतात.’’
सुभाष कुचिक, ट्रेकर, खोडद (ता. जुन्नर)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.