डॅशबोर्डमुळे कामकाजात पारदर्शकता;
अतिक्रमणमुक्त शहराकडे वाटचाल
डॉ. सचिन ओंबासे यांची वर्षभरात प्रभावी कामे
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. २० : महापालिका आयुक्त सचिन ओम्बासे यांनी शहर प्रशासनाच्या कामकाजात वेग, पारदर्शकता आणि शिस्त आणण्यावर विशेष भर दिला. डॅशबोर्ड प्रणालीची अंमलबजावणी, अतिक्रमणमुक्त शहरासाठी राबविलेली मोहीम, स्वच्छता व्यवस्थेतील सुधारणा आणि पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी उचललेली पावले ही त्यांच्या एक वर्षाच्या कार्यकाळातील ठळक वैशिष्ट्ये ठरली आहेत.
महापालिका आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर शहर विकासाच्या दृष्टीने त्यांनी विविध महत्त्वपूर्ण उपक्रम राबविले. विविध विभागांची प्रलंबित कामे, नागरिकांच्या तक्रारी आणि प्रकल्पांची प्रगती यांचा नियमित आढावा घेण्यासाठी सुरू केलेली डॅशबोर्ड प्रणाली प्रभावी ठरली आहे. यामुळे तक्रारींचे वेळेत निराकरण होण्यास मदत झाली. तसेच कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या कामकाजाचा लेखाजोखा ठेवल्याने कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रशासन अधिक जबाबदार बनले.
शहर स्वच्छतेवर विशेष भर देत नियमित स्वच्छता मोहीम, कचरा संकलन व्यवस्थेतील सुधारणा आणि सार्वजनिक ठिकाणांची देखभाल यावर लक्ष केंद्रित केले. मुख्य रस्ते व बाजारपेठांतील अतिक्रमणांवर कारवाई करून शहर अतिक्रमणमुक्त करण्याची मोहीम राबविली. त्यामुळे वाहतुकीला मोकळीक मिळून नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला.
पाणीपुरवठा व्यवस्थेत सुधारणांसाठी वितरण यंत्रणेतील तांत्रिक अडचणी दूर करण्यावर भर देण्यात आला. गळती रोखणे, वितरण व्यवस्था सक्षम करणे आणि तक्रारींवर त्वरित प्रतिसाद देणे, या बाबींना प्राधान्य देण्यात आले. एंडोस्कोपी मशिनद्वारे दूषित पाणीपुरवठ्याच्या ठिकाणांचा शोध घेऊन आवश्यक त्या ठिकाणी दुरुस्तीची कामे करण्यात आली.
शहरातील अनेक भागांत सुशोभीकरणाची कामे हाती घेतली. तसेच अनधिकृत बांधकामांवर कठोर कारवाई करण्यात आली. एकूणच, डॉ. ओम्बासे यांच्या वर्षभराच्या कार्यकाळात प्रशासनाला शिस्तबद्ध आणि परिणामकारक दिशा मिळाल्याचे चित्र दिसत आहे. आगामी काळातही विकासकामांना गती देत नागरिकाभिमुख उपक्रम राबविण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.