कोलकता, ता.९ (पीटीआय) ः खोल समुद्रातील शोध मोहिमा आणि वैज्ञानिक संशोधनाला गती देण्यासाठी ‘गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर’ने (जीआरएसई) ‘सागर मंथन’ या स्वदेशी जहाजाची बांधणी केली आहे. ‘नॅशनल सेंटर फॉर पोलर अँड ओशन रिसर्च’ साठी (एनसीपीओआर) हे जहाज तयार करण्यात आले आहे. या जहाजाच्या बांधणीसाठी ८४० कोटी रुपयांचा खर्च येणार असून २०२८ पर्यंत ते वापरासाठी सज्ज होईल. या यशाबद्दल पृथ्वी विज्ञान खात्याचे राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) जितेंद्रसिंह यांनी ‘जीआरएसई’चे अभिनंदन केले आहे. पृथ्वी विज्ञान खात्याचे सचिव श्रीनिवासकुमार तुम्माला हे या जहाजाच्या अनावरण सोहळ्याला उपस्थित होते.
‘‘ खोल समुद्रातील सागरी मोहिमांसाठी या जहाजाची निर्मिती करण्यात आली आहे त्यामुळे देशाच्या सागरी संशोधनाच्या सामर्थ्यातही लक्षणीय वाढ होईल. ज्या ठिकाणी राष्ट्रीय हिताचा प्रश्न निर्माण होईल त्या ठिकाणी हे जहाज जाईल,’’ असे त्यांनी सांगितले.
प्रशिक्षणही मिळणार
‘डीप ओशन मिशन’साठी ‘अंडरवॉटर व्हेइकल’ (एयूव्ही) आणि ‘रिमोटली ऑपरेटेड व्हेइकल’ची (आरओव्ही) निर्मिती करण्यात आली आहे. ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नोलॉजी’कडून हे जहाज तयार करण्यात आले आहे. या जहाजावर थांबूनच संशोधकांना डेटा विश्लेषणाचे काम करता येईल, त्याचबरोबर हे जहाज वैज्ञानिक आणि तंत्रज्ञांना प्रशिक्षण देण्याचे काम करेल, असेही ‘जीआरएसई’ने म्हटले आहे.
कमी वेळेत बांधणी
- या जहाजाच्या बांधणीसाठी पाच महिन्यांचा कालावधी लागला. फार कमी वेळामध्ये या जहाजाची निर्मिती करण्यात यश आले असून जहाजबांधणी क्षेत्रातील मैलाचा दगड आपण गाठला असल्याचे ‘जीआरएसई’चे व्यवस्थापकीय संचालक कमोडोर पी.आर.हरी (निवृत्त) यांनी सांगितले.
.....
जहाजाचे सामर्थ्य
८४० कोटी
बांधणीसाठी खर्च
८९.५ मीटर
लांबी
१८.८ मीटर
रुंदी
५ हजार ९०० टन
एकूण वजन
१४ नॉटिकल मैल
जहाजाचा वेग
समुद्रतळाचे भूशास्त्र समजणार
तुम्माला म्हणाले, की हे जहाज अत्याधुनिक वैज्ञानिक प्रणालीने सज्ज असेल. त्याच्या आगमनामुळे भारताच्या सागरी क्षमतेमध्ये वाढ होईल. समुद्रतळाशी असलेल्या भूशास्त्रीय रचनेचा या माध्यमातून अभ्यास करता येईल. तशी उपकरणे या जहाजात बसविण्यात आली आहेत. वातावरणातील निरीक्षणे करता यावीत म्हणून अत्याधुनिक रडारही या जहाजावर बसविण्यात आले आहे. ‘‘भारतीय सागरी क्षेत्रातील अभ्यास आणि संशोधनाला बळ मिळावे या उद्देशाने हे जहाज तयार करण्यात आले आहे. बंगालचा उपसागर आणि दक्षिणेकडील समुद्रामध्येही त्यामुळे संशोधन करण्यात येईल. अंटार्क्टिका खंडा भोवतीच्या संशोधनाला यामुळे गती मिळू शकेल,’’ असे तुम्माला म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.