साहित्य संमेलन ठरणार लेखकांसाठी पर्वणी
प्रकाशन कट्ट्याचे आकर्षण; वैविध्यपूर्ण ११० पुस्तकांचे होणार प्रकाशन
नागठाणे, ता. ३० : सातारा येथे ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन रसिक, वाचकांबरोबरच लेखकांसाठीही पर्वणी ठरणार आहे. या संमेलनात राज्यभरातील लेखकांची तब्बल ११० पुस्तके प्रकाशित होणार आहेत.
यंदाच्या या संमेलनात प्रकाशन कट्टा हा स्वतंत्र विभाग असणार आहे. पाच सत्रात होणाऱ्या या प्रकाशन कट्ट्याचे उद्घाटन साहित्य संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांच्या हस्ते होणार आहे. संमेलनाचे स्वागताध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसले, कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी, साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी आदींची उपस्थिती असणार आहे.
एक जानेवारी रोजी सायंकाळी पहिल्या सत्रात ‘संस्कृती प्रकाशन’चे ‘जनसंवाद राजमातांचा’ हे राजमाता श्रीमंत छत्रपती सुमित्राराजे भोसले यांच्या ऐतिहासिक सामाजिक, सांस्कृतिक अन् आध्यात्मिक भाषणांचा आढावा घेणारे पुस्तक प्रकाशित होणार आहे. देशमुख अँड कंपनीने प्रकाशित केलेले नरहर कुरुंदकर यांचे ‘युगप्रवर्तक छत्रपती’ ही पुस्तकही यावेळी प्रकाशित होत आहेत. उल्लेखनीय म्हणजे ‘चपराक प्रकाशन’ने प्रकाशित केलेली पाच पुस्तके ब्रेल लिपीत येत आहेत. यानिमित्ताने साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर प्रथमच अंध वाचकांसाठी ही पुस्तके प्रकाशित होत आहेत. साहित्य संमेलनाचे आजी- माजी अध्यक्ष, साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक अन् मराठीतील अन्य मान्यवर साहित्यिकांची उपस्थिती हे या प्रकाशन कट्ट्याचे वैशिष्ट्य असणार आहे. त्यासाठी प्रकाशन कट्ट्याचे मुख्य समन्व्यक घनश्याम पाटील, प्रकाशन कट्टा समिती प्रमुख शिरीष चिटणीस तसेच सदस्य परिश्रम घेत आहेत.
चौकट
वैविध्यपूर्ण पुस्तके
या पुस्तक प्रकाशन कट्ट्यावर कथा, कविता, कादंबरी, ललित, वैचारिक, चरित्र, आत्मचरित्र, बालसाहित्य, लोककला, विनोदी लेखन, प्रवास वर्णन, गुंतवणूक अशा सर्व प्रकारातील वैविध्यपूर्ण पुस्तकांचे प्रकाशन होणार आहे.