तारळे भागात डोंगर लागले पुन्हा पेटू
वणव्याचे ग्रहण थांबेना; अटकाव करण्याची निसर्गप्रेमींची मागणी
यशवंतदत्त बेंद्रे ः सकाळ वृत्तसेवा
तारळे, ता. ४ : जानेवारी- फेब्रुवारी उजाडला, की डोंगरदरे धगधगू लागतात. यंदाही त्यास अपवाद नाही. विज्ञानवादी युगातही अनेक अंधश्रद्धा व गैरसमजुती लोकांमध्ये आहेत. त्या काही केल्या दूर होत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे वणव्याचे प्रमाण कमी न होता वाढू लागले आहे. त्यावर कसा आणि कोण अंकुश ठेवणार? हाच प्रश्न आहे. तालुक्यासह विभागात वणवे सुरू असून, त्यावर नियंत्रण आणण्यासाठी ठोस उपाययोजनांची गरज आहे.
स्वच्छ, सुंदर निसर्ग सर्वांनाच हवा आहे; पण तो टिकविण्याची जबाबदारी नको, अशीच मानसिकता आहे. काही लोक, स्वयंसेवी संस्था, निसर्गप्रेमी व मित्र समूह निसर्ग जतन करण्यासाठी धडपड करताना दिसतात. त्यावेळी अज्ञानातून अथवा गैरसमज, अंधश्रद्धेतून गवत जळल्यावर दुसऱ्या वर्षी दुप्पट गवत येण्याच्या समजुतीतून हे वणवे लावले जातात. त्यामुळे निसर्ग संपदा अक्षरशः होरपळून जाते. निसर्गाचा ऱ्हास होत आहे.
तारळे विभाग हा सह्याद्रीच्या कुशीत डोंगररांगांत पसरला आहे. विभागात मोठी वनसंपदा आहे. पावसाळा व हिवाळ्यात येथील निसर्गसौंदर्य मनाला प्रसन्नता देते. तारळी धरण, सडावाघापूर पठार, तोंडोशी रामघळ आदी ठिकाणी पर्यटक नियमित भेटी देतात. मात्र, सध्या जिकडे-तिकडे वणव्यांमुळे हे हिरवे डोंगर आता काळवंडले आहेत. येथील वनराई वणव्यांच्या भक्ष्यस्थानी पडल्याने परिसर भकास दिसू लागला आहे. हजारो हेक्टर क्षेत्र वणव्याच्या आगीत धगधगत आहे. जाणून-बुजून वणवे लावणाऱ्यांवर कारवाई करणे आवश्यक आहे.
वणव्यात छोठी- मोठी झाडे, वेली, गवत यासह सरपटणारे प्राणी किटक आगीत नष्ट होत आहेत. बिबट्या, भेकर व ससे आदींचा वावरही येथे अधोरेखित झाला आहे. त्यांचीही वस्तीस्थाने व आश्रयस्थाने आगीच्या वणव्यात भस्मसात होत आहेत. त्याचा परिणाम स्वरूप वन्यप्राणी मानवी वस्तीत येऊ लागले आहेत. या वणव्यांकडे पाहण्याखेरीज अथवा जुजबी उपाय करण्याऐवजी वनविभाग काहीच करू शकत नाही. सततच्या वणव्यांनी डोंगर काळेकुट्ट पडून उघडे दिसू लागले आहेत. हे वणवे रोखण्यासाठी वनविभागाने ठोस पावले उचलण्याची मागणी निसर्गप्रेमींकडून होत आहे.
........
चाैकट
............
विस्तीर्ण वनसंपदा अन्
तोकडी कर्मचारी संख्या...
विस्तीर्ण हजारो हेक्टर डोंगरातील वनसंपदेचे संरक्षण नाममात्र संख्या असलेल्या वनविभागाकडे असल्याने ही स्थिती आहे. एकाच वेळी अनेक ठिकाणी वणवे लागत असल्याने त्यांचीही पुरती दमछाक होत आहे. मात्र, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष न करता दोषींवर कठोर कारवाई करून इतरांपुढे धाक निर्माण करण्याची गरज आहे.
................................
B01239
आंबेवाडी : जन्नेवाडी डोंगराला लागलेला वणवा. (यशवंतदत्त बेंद्रे ः सकाळ छायाचित्रसेवा)
.......................................................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.