सकाळ न्यूज नेटवर्क
पुणे, ता. १२ ः ‘‘कृत्रिम बुद्धिमत्ता आणि तंत्रज्ञानामुळे साहित्यविश्वामध्ये मोठे स्थित्यंतर घडत आहे. भाषांतरांमुळे साहित्याच्या प्रस्थापित चौकटी बदलून ते भाषिक आणि भौगोलिक सीमांच्याही पलिकडे जात आहे. मात्र, साहित्याचे खरे सामर्थ्य हे केवळ या बदलांमध्ये नसून प्रस्थापित धार्मिक रूढी, सामाजिक संकेत आणि राजकीय व्यवस्थेला प्रश्न विचारण्यामध्ये आहे. साहित्याने प्रश्न विचारावेत, अस्वस्थ करावे आणि परिवर्तनाची प्रक्रिया सुरू करावी,’’ असे मत बुकर पारितोषिक विजेत्या ज्येष्ठ लेखिका बानू मुश्ताक यांनी व्यक्त केले.
‘सकाळ माध्यम समूहा’च्यावतीने आयोजित पहिल्या ‘सकाळ लिट फेस्ट’चे उद्घाटन मुश्ताक यांच्या हस्ते गुरुवारी झाले, त्या वेळी त्या बोलत होत्या. ‘साहित्यातून परिवर्तनाकडे’ या ध्येयविचारातून साकारलेल्या या चार दिवसीय सर्जनशील उत्सवाची या उद्घाटन सोहळ्याने दिमाखदार सुरुवात झाली. याप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक व माजी संमेलनाध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे, ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत व माजी संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचे मानद सचिव सुधीर वैशंपायन, ‘सकाळ माध्यम समूहा’च्या संचालिका मृणाल पवार आदी मान्यवर उपस्थित होते. वाचक आणि लेखकांकडून या साहित्य उत्सवाला मोठा प्रतिसाद मिळाला.
‘आधी स्वतःला प्रश्न विचारले’
मुश्ताक म्हणाल्या, ‘‘ मी सर्वप्रथम स्वतःच्या अंतर्मनाला प्रश्न विचारले. त्यानंतर कुटुंब, समाज, राजकीय आणि धार्मिक व्यवस्थेला प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. त्यातूनच प्रस्थापित विचारांना आव्हान देणारे साहित्य मी निर्माण केले. साहित्याने प्रश्न विचारणे आणि परिवर्तनाची प्रक्रिया सुरू करणे, हे मला महत्त्वाचे वाटते. तब्बल ९४ वर्षांची समृद्ध परंपरा असलेल्या ‘सकाळ’च्या या साहित्य महोत्सवाने उत्तरोत्तर मोठी भरारी घ्यावी आणि जागतिक साहित्यविश्वाचे लक्ष वेधून घ्यावे.’’
‘सांस्कृतिक घडणीत माध्यमांचे योगदान’
सध्याचा काळ हा जगभरातच कोलाहलाचा आणि अस्वस्थतेचा असल्याचे नमूद करत डॉ. ढेरे म्हणाल्या, ‘‘तंत्रक्रांतीचा वेग अफाट असला तरी सर्जनशील माणसे या नव्या युगाच्या आव्हानांना मोठ्या क्षमतेने सामोरे जात आहेत. माध्यमे ही केवळ बातम्यांची वाहक नसून समाजाच्या सांस्कृतिक घडणीत त्यांचे मोठे योगदान आहे. मानवी संवेदनशीलता आणि सहअनुभूती गमावता कामा नये, याची जाणीव आजच्या कलावंतांना, लेखकांना आहे. उत्तम साहित्याला समाजामध्ये एक सत्तानिरपेक्ष सामर्थ्य असते. त्यामुळे सर्व भेदांच्या पलीकडे जाऊन समाजाला सोबत नेणाऱ्या विवेकी लेखकांची संख्या वाढली पाहिजे.’’ डॉ. मोरे यांनी साहित्यातील बहुभाषिकतेचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, ‘‘बहुभाषिकता ही मराठी भाषेची प्रकृतीच आहे. संत नामदेव यांनी पंजाबात जाऊन पंजाबी भाषेत पदे लिहिली; तर तंजावरच्या राजांनी कन्नड, तमिळ, तेलुगू आणि संस्कृत भाषांना आश्रय दिला. भाषा ही देशाला जोडणारी अत्यंत महत्त्वाची साखळी आहे, ती तुटली तर देश दुभंगेल.’’
‘सकाळ’ने वाचन संस्कृती जोपासली’
प्रास्ताविकात मृणाल पवार म्हणाल्या, ‘‘ गेल्या ९४ वर्षांत ‘सकाळ’ने वाचनसंस्कृती जोपासण्याचे काम केले असून, त्याचाच विस्तार म्हणून ‘सकाळ लिट फेस्ट’चे आयोजन करण्यात आले आहे. साहित्य हे माणसाला दुसऱ्यांच्या कथांमधून स्वतःकडे पाहण्याची दृष्टी देते. साहित्याने प्रस्थापित चौकटी मोडून ज्ञान आणि अभिव्यक्तीची व्याप्ती वाढवावी, हा या महोत्सवाचा उद्देश आहे. विविध भाषा, साहित्यप्रकार आणि विचारप्रवाहांतील लेखक, अभ्यासक, अनुवादक व कलाकारांना एकत्र आणून वाचन, संवाद आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीला चालना देण्याचा प्रयत्न या महोत्सवातून केला आहे.’’ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरजे तरुण यांनी केले. राघव रामदासी यांनी सरस्वती वंदना सादर केली. ‘सकाळ प्रकाशना’चे सरव्यवस्थापक आशुतोष रामगीर यांनी आभार मानले.
हे आहेत प्रायोजक
विश्वकर्मा विद्यापीठ हे ‘सकाळ लिट फेस्ट’चे मुख्य प्रायोजक आहेत. ‘चितळे डेअरी’ आणि ‘पु. ना. गाडगीळ अँड सन्स’ हे सहप्रायोजक आहेत. ‘भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर’ हे स्थळ प्रायोजक, ‘सपना’ हे ग्रंथदालन आणि ‘तिकीट खिडकी हे’ तिकिटांसाठीचे सहयोगी आहेत. ‘सकाळ प्रकाशना’तर्फे या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या साहित्य उत्सवामध्ये एकूण चार मंच उभारण्यात आले असून मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांतील ११० हून अधिक सत्रे आणि १५० हून अधिक वक्ते सहभागी होणार आहेत.
‘लिट फेस्ट’ म्हणजे ज्ञानाची दिवाळी’
‘लिटरेचर’मधील ‘लिट’ या शब्दाचा अर्थ प्रकाशमान होणे, उजळणे असा आहे. याचा थेट संबंध दिव्यांचा उत्सव असलेल्या दिवाळीशी जोडता येतो,’ असे सांगत डॉ. सदानंद मोरे म्हणाले, ‘‘संत ज्ञानेश्वर महाराजांनी ‘अमृतानुभव’ या ग्रंथात ‘सणु भोगिजे सणें विश्वाचेनि’ म्हणजेच ग्रंथलेखनाला सणांचा सण म्हटले आहे. साहित्याला आणि शब्दाला आपल्या परंपरेत इतके उच्च स्थान आहे.’’ हाच धागा जोडत डॉ. अरुणा ढेरे यांनीही ‘तैसी वाचा श्रोतयां ज्ञानाची, दिवाळी करी’ या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या वचनाची आठवण करून देत हा ‘लिट फेस्ट’ म्हणजे खऱ्या अर्थाने ज्ञानाची दिवाळीच असल्याची भावना व्यक्त केली.
फोटो क्रमांक ः PPRTT26B19040
फोटो क्रमांक ः PPRTT26B19041
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.