Sakal-Vidya
Sakal-Vidya 
पुणे

उच्च शिक्षणातील मैलाचा दगड : चॉईस बेस्ड क्रेडिट पद्धती

प्रा. डॉ. नितीन घोरपडे

शिक्षण पद्धतीतील या बदलांमध्ये चॉईसबेस क्रेडिट सिस्टिम या पद्धतीचा अंतर्भाव हाही मोठा बदल म्हणावा लागेल. विद्यार्थ्याची आवड, त्याचा कल लक्षात घेऊन त्याला हव्या त्या विषयाची निवड करता यावी या उद्देशाने चॉईस बेस क्रेडिट सिस्टिम (निवड आधारित मूल्यांकन पद्धत) लागू करण्यात आलेली आहे.

शिक्षणामुळे माणसाच्या विचारसरणीत सकारात्मक बदल होऊन तो उत्तम माणूस होतो आणि उत्तम शिक्षण मिळाल्याने माणसाचे आयुष्य सुखी होते, समाज घडतो आणि पर्यायाने देशाची प्रगती होते. भारताला ५००० वर्षाच्या शैक्षणिक इतिहास आहे. तक्षशिला, नालंदा ही शिक्षणाची महाद्वारे होती.

बौद्ध, मुस्लीम आणि ब्रिटिशकाळ लक्षात घेता शैक्षणिक पद्धतीमध्ये अनेक बदल होत गेले. भारताच्या स्वातंत्र्यानंतरच्या काळात शिक्षणामध्ये तर आमूलाग्र बदल होत गेले. शिक्षणपद्धतीमध्ये असणा-या कमतरतांवर प्रकाश टाकून त्यासाठी योग्य ती शिक्षण पद्धती अमलात आणली गेली. शिक्षण पद्धतीतील या बदलांमध्ये चॉईसबेस क्रेडिट सिस्टिम या पद्धतीचा अंतर्भाव हाही मोठा बदल म्हणावा लागेल. विद्यार्थ्याची आवड, त्याचा कल लक्षात घेऊन त्याला हव्या त्या विषयाची निवड करता यावी या उद्देशाने चॉईस बेस क्रेडिट सिस्टिम (निवड आधारित मूल्यांकन पद्धत) लागू करण्यात आलेली आहे. जगभरातील मोठया विद्यापीठांमध्ये सत्रपद्धती आणि निवड आधारित मूल्यांकन पद्धती पूर्वीच अवलंबलेली आहे. भारतामध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाने गेल्या काही वर्षांपासून या पद्धतीचा अवलंब केलेला आहे. काळाची गरज आणि विज्ञान , तंत्रज्ञानाचा वाढता वापर यामुळे शिक्षणपद्धतीमध्ये, ज्ञानदानाच्या पद्धतीमध्ये भासणा-या गरजेतूनच ही पद्धत सुरू केली गेली. या पद्धतीमुळे विद्यार्थ्याला आपल्याला आवडत असलेला विषय (course) शिकता येणार आहे. विद्यार्थ्याच्या कुवतीनुसार तो अनेक क्रेडिट पूर्ण करू शकणार आहे. विषयांतर्गत आणि कौशल्याधारित विषय (course) अभ्यासणे विद्यार्थ्याला शक्‍य होणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगात अंतर्भूत केल्याप्रमाणे एक कोर्स पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या संस्थांमध्ये अभ्यास करण्याची मुभा या पद्धतीमध्ये असणार आहे. या पद्धतीमुळे शिक्षण शिक्षककेंद्रित न राहता विद्यार्थी केंद्रित होण्यास मदत होईल. विविध प्रकारचे शिक्षण घेता येत असल्याने पदवी आणि रोजगारक्षमता यामधील दरी कमी होण्यास या पद्धतीमुळे नक्कीच मदत होणार आहे. यामुळे शैक्षणिक दर्जा राखण्यास, शैक्षणिक आणि संशोधन पर्यावरण वाढण्यास मदत होणार आहे.

कला, वाणिज्य, विज्ञान, संगणक अशा ज्ञानदानातील भिंती कमी होऊन विद्यार्थ्याला आपल्या शाखेतील मूलभूत विषयांबरोबरच इतर विषयाची निवड करता येणार आहे. आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रमाला महत्त्व हे या पद्धतीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. विशिष्ट शाखेपुरते मर्यादित न राहता या शाखांचा संबंध, उपयोजित आणि व्यापक अभ्यासक्रम निवडण्याची संधी विद्यार्थ्याला मिळणार आहे. विद्यापीठांनाही आपले अभ्यासक्रम तयार करण्याचे स्वातंत्र्य आणि वैशिष्ट्य टिकविण्यास संधी मिळणार आहे.

विद्यार्थ्यांना मूलभूत विषय, निवडक आणि कौशल्याधारित विषयांपैकी विषय (course) निवडता येणार आहेत. यापैकी मूलभूत विषय  त्यांच्या विषयाच्या संदर्भातील असतील, तसेच इतर दोन विषय  त्याच्या मूळ विषयाशी संबंधित, त्यांचे अधिक ज्ञान देणारे असतील आणि उरलेले दोन कौशल्य प्रदान करणारे असतील. 

सध्याचे युग हे गतिशील आणि बदलणारे आहे तसेच ते वाणिज्य आणि व्यापाराचे आहे. देशातील आर्थिकसमृद्धी आणि प्रगती व्यापार, व्यवसाय आणि उद्योगधंद्यावर अवलंबून असते. अलीकडील काळात त्याला महत्त्व प्राप्त झालेले आहे आणि त्यासाठी प्रशिक्षित आणि कुशल अशा तरुणांची गरज आहे. आणि म्हणूनच वाणिज्य अभ्यासक्रमाला महत्त्व प्राप्त झालेले आहे. चॉईस बेस क्रेडिट सिस्टिमचा अभ्यासक्रमात अंतर्भाव करताना काळानुसार असणा-या गरजांचा विचार करून त्याला अनुसरून अभ्यासक्रम तयार करण्यात आलेला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने तयार केलेल्या अभ्यासक्रमाप्रमाणे वाणिज्य शाखेमध्ये प्रवेश घेणा-या विद्यार्थ्याला प्रथम वर्षाला इंग्रजी हा विषय  अनिवार्य असणार आहे तसेच वाणिज्य शाखेशी संबंधित मूलभूत विषयांमधील तीन विषय, वाणिज्य शाखेशी संबंधित निवडक दोन विषय आणि एक भाषा असे एकूण ७ विषय विद्यार्थ्यांना असतील. यामध्ये प्रत्येक विषयाला ३ क्रेडिट असे २१ क्रेडिट, प्रात्यक्षिक विषयाला  १ क्रेडिट व ॲडऑन कोर्सला १ क्रेडिट असे २३ क्रेडिट प्रथम सत्र व २३ क्रेडिट द्वितीय सत्र असे ४६ क्रेडिट प्रथम वर्षाला असणार आहेत. याचप्रमाणे द्वितीय वर्षाला प्रथम सत्रामध्ये ६ विषयांचे १८ क्रेडिट व प्रात्यक्षिक दोन क्रेडिट असे २० क्रेडिट तर द्वितीय सत्रामध्ये ६ विषयांचे १८, प्रात्यक्षिक विषयाचे दोन व ॲड कोर्सचे दोन असे एकूण २२ क्रेडिट असणार आहेत. तृतीय वर्षाला प्रथम सत्राला ६ विषयांचे १८ क्रेडिट, प्रात्यक्षिकाचे ३ क्रेडिट असे २१ क्रेडिट असणार आहेत तर तृतीय वर्षाच्या दुसर्या सत्राला ६ विषयांचे १८ क्रेडिट, प्रात्यक्षिकाचे ३ क्रेडिट व ॲड ऑन कोर्सचे २ क्रेडिट असे २३ क्रेडिट असणारे आहेत. दुस-या वर्षी विद्यार्थ्याला विशेष स्तरावरील विषय  निवडायचा असून त्यातील विषय  त्याला घेता येणार आहेत. तिस-या वर्षीही या विशेषस्तरावरील विषयांचा अभ्यास विद्यार्थ्याला करावा लागणार आहे. १३२ क्रेडिटच्या या कोर्समध्ये ६ सत्रांमध्ये एकूण ३८ विषयांपैकी १२ प्रात्यक्षिक व ४ ॲडऑन कोर्स अशा विषयांचा अभ्यास विद्यार्थ्यांना करावा लागणार आहे. क्रेडिट सिस्टिममध्ये एका विषयाला ३ क्रेडिट असे प्रथम वर्षाला ४६ क्रेडिट, दुस-या वर्षाला ४२ क्रेडिट आणि तिस-या वर्षाला ४४ क्रेडिट अशी त्याची विभागणी केली जाणार आहे. यामध्ये प्रत्येक वर्षाला दोन क्रेडिट हे ॲडऑन कोर्सेससाठी असणार आहेत. यामध्ये मूल्य शिक्षण, लिंग संवेदनशीलता, पर्यावरण जाणीवजागृती, आणि विशेष स्तरावरील विषयाशी संबंधित विषय अभ्यासता येणार आहेत. 

हे विषय  शिकविताना पूर्वापारप्रमाणे फक्त खडू फळा याचा वापर न करता फिल्म शो, पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन, प्रोजेक्‍ट, दृकश्राव्य माध्यमे, व्हीडीओ, गटचर्चा याचा वापर केल्याने हे विषयांचे आकलन होणे सोपे जाईल याचा विचार करून अभ्यासक्रम तयार करताना अध्यापनाच्या पद्धतीची माहितीही देण्यात आलेली आहे. तसेच या विषयाचे ज्ञान घेतल्याने त्याचे मिळणारे फलित (आउटकम) याची माहिती अभ्यासक्रमामध्ये देण्यात आलेली आहे. नॅकच्या गाईडलाइन मध्ये दिल्याप्रमाणे आपण शिकवीत असलेल्या विषयाचे कोर्स आउटकम आणि प्रोग्रॅम आउटकम देणे आवश्‍यक असते. या अभ्यासक्रमामध्ये हे सविस्तर दिलेले असल्याने विषयाचे ज्ञान विद्याथ्रयांना काय देईल याची माहिती दिलेली आहे. विद्यार्थ्यांचे सततचे मूल्यमापन ही या पद्धतीची जमेची बाजू आहे. या अभ्यासक्रमांमधील गुणदान पद्धतीमध्ये ३० गुण हे अंतर्गत मूल्यांकनासाठी तर ७० गुण हे विद्यापीठ परीक्षेसाठी दिलेले आहेत. अंतर्गत मूल्यांकन हे चाचणी परीक्षा, प्रेझेंटेशन, प्रोजेक्‍ट, असाईनमेंट, टयुटोरिअल्स यावर आधारित असणार आहे. कोर्सच्या शेवटी असणारा निकाल हा गुणांच्या ऐवजी ग्रेडमध्ये दिला जाणार आहे. यूजीसी कडून १० बिंदूंची ग्रेडिंग सिस्टिम देण्यात आलेली आहे. 

उच्च शिक्षणामध्ये गुणवत्ता आणि परिवर्तनशीलबदल आणण्याच्या हेतूने या पद्धतीची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. या पद्धतीमुळे स्वअध्ययनास मदत होईल, अभ्यासक्रमात लवचिकता येईल, विद्यार्थ्यांची विषयाची निवड आणि स्वायत्तता तसेच अनेक कौशल्य विकसित होण्यास याची मदत होईल. संशोधन हा विकासाचा आत्मा आहे आणि या पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना अध्ययन, संशोधन याकडील कल वाढण्यास नक्कीच मदत होईल. ही शिक्षणपद्धती शैक्षणिक संस्थांसाठी मैलाचा दगड ठरेल हे निश्‍चित.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

PCB T20 WC 2024 : टी 20 वर्ल्डकप जिंकला तर पाकिस्तानी खेळाडू होणार करोडपती; PCB ने दिलं मोठं आश्वासन

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; पंजाबची गळती सुरू जवळपास निम्मा संघ गारद

Baramati Lok Sabha Election : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT