Vetal Hill Pune
Vetal Hill Pune sakal
पुणे

Pune City : विक्रम-वेताळ आणि शहर बेताल!

संभाजी पाटील @psambhajisakal

वाढत्या शहराची गरज म्हणून नव्याने रस्ते, उड्डाणपूल बांधावेच लागतील. पण हे करताना शहराचे पर्यावरण, सौंदर्य बिघडणार नाही, याचीही काळजी घ्यावीच लागेल.

वाढत्या शहराची गरज म्हणून नव्याने रस्ते, उड्डाणपूल बांधावेच लागतील. पण हे करताना शहराचे पर्यावरण, सौंदर्य बिघडणार नाही, याचीही काळजी घ्यावीच लागेल. वाहने वाढली म्हणून कितीही रस्ते बांधले तरी ते अपुरेच पडतात, हा जगभरातील संशोधनानंतरचा निष्कर्ष आहे. त्यामुळे रस्त्यावर कमीत कमी वाहने येतील यासाठीच्या उपाययोजनांनाच प्राधान्य द्यायला हवे.

वेताळाला घेऊन राजा विक्रम जंगलातून चालत होता.

वेताळ : सांग राजा आपण आता कुठून जात आहोत.

विक्रम : टेकडीवरून.

वेताळ : मग इथे रस्ता, उड्डाणपूल का करायचा आहे?

विक्रम : हा रस्ता विकास आराखड्यात दाखवलेला आहे.

वेताळ : आतापर्यंत विकास आराखड्यात असलेले किती प्रकल्प पूर्ण केलेस?

विक्रम : २५ टक्के.

राजाचे खरे उत्तर ऐकून वेताळ पुन्हा झाडावर जाऊन बसला...

वेताळ टेकडीवरील रस्त्याबाबत सध्या जे काही चाललेय ते अगदी विक्रम वेताळाच्या गोष्टींसारखे सुरू आहे. ज्या भागातील नागरिकांसाठी हा रस्ता करायचा आहे, त्या नागरिकांनीच याला विरोध केला आहे. महापालिका आणि काही लोकप्रतिनिधी मात्र रस्ता झालाच पाहिजे यासाठी आग्रही आहेत. वेताळ विक्रमाला ज्या पद्धतीने नवनव्या गोष्टी ऐकवतो, तशीच नवनवी कारणे नागरिकांना ऐकवली जात आहेत. नागरिकांचे मात्र समाधान होत नाही, त्यामुळे हा प्रश्न तसाच वेताळाला सारखा लोंबकळत पडला आहे.

बालभारती-पौड फाटा रस्त्याबाबत गेली तीस वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. पण दोन्ही बाजूंनी योग्य मार्ग निघालेला नाही. १९८७ मध्ये राज्य सरकारने तर २०१६ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने या रस्त्यामुळे होणाऱ्या पर्यावरणीय हानी बद्दल आक्षेप घेतले होते. त्यानंतरही या रस्त्यावरून न्यायालयीन लढाई सुरूच राहिली. पुणे महापालिकेने या रस्त्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व पर्यावरणीय परवानग्या मिळाल्या असल्याचे सांगून या रस्त्याची निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. महापालिकेचे हे सर्व दावे पर्यावरणप्रेमींनी फेटाळले असून, रस्ता होऊ नये यासाठी गेल्या काही महिन्यांपासून आंदोलन सुरू केले आहे.

प्रस्तावित रस्ता २.१ किलोमीटर लांबीचा आहे. त्यातील सुमारे एक किलोमीटर रस्ता विधी महाविद्यालयाच्या मागील टेकडीच्या उतारावरील दाट जंगलातून जाणार असल्याने त्याला पर्यावरणप्रेमींचा आक्षेप आहे. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी हा रस्ता वेताळ टेकडीच्या पायथ्यापासून जाणार असून टेकडीला नुकसान होणार नाही, असे म्हटले आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील हेही या रस्त्यासाठी आग्रही असून, त्यांनी सुतारदरा, पंचवटी आणि जनवाडी येथून जाणाऱ्या दोन बोगद्यांमुळे वाहतुकीची कोंडी कमी होऊन इंधनाची बचतही होईल आणि पर्यावरण जपले जाईल, असा दावा केला आहे. पण कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनाही दादांचे म्हणणे पटलेले नाही, त्यामुळे त्यांनी या प्रकल्पाला जोरदार विरोध केलाय. जर या प्रकल्पाबाबत एकाच पक्षाच्या आजी माजी आमदारांमध्ये ही एकमत नसले तर नक्कीच काहीतरी चुकतेय. त्यामुळे या प्रकल्पाबाबत घेतलेल्या आक्षेपांबाबत योग्य शंका निरसन व्हायला आहे.

अलीकडच्या काळात केले जाणारे विकास प्रकल्प विशिष्ट घटकांचे हित डोळ्यासमोर ठेवून केले जातात, तसाच आरोप ‘आप’नेही या प्रकल्पाबाबत केला आहे. त्याबाबतही सत्य समोर येणे आवश्यक आहे.

मुळात या रस्त्यासाठी तीनशे कोटी रुपये खर्च करूनही वाहतुकीची कोंडी वीस टक्केही कमी होणार नाही असा अभ्यास असेल तर हा अट्टाहास कशासाठी सुरू आहे. या एकूणच प्रकल्पाबाबत महापालिका करत असलेली घाई, लोकप्रतिनिधींचा आग्रह नागरिकांच्या मनात शंका निर्माण करणारा आहे. पुण्यातील टेकड्या शहराची फुफ्फुसे आहेत, असे भाषण ठोकायचे आणि त्या नष्ट होण्यापासून रोखण्यासाठी काहीच उपाययोजना करायची नाही हे योग्य नाही. ज्यांनी पुण्यात आपले आयुष्य घालवले, ज्यांना या शहराचे पर्यावरण, नाडी माहिती आहे, ते नागरिक विरोध करत असतील तर त्याची दखल घ्यायला हवी. पर्यावरणप्रेमींनीही उठसूट प्रत्येक प्रकल्पास विरोध करणारे लोक ही प्रतिमा बदलायला हवी.

रस्ते, उड्डाणपूल केले म्हणजे वाहतुकीचा प्रश्न सोडवला असे होत नाही. तुम्हाला सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाच मजबूत करावी लागणार आहे. सातारा रस्त्यावरील बीआरटी वर उधळलेले शंभर कोटी किंवा या प्रकल्पाचे तीनशे कोटी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी खर्च झाले तर वाहतुकीचा प्रश्न मुळापासून सोडविण्यासाठी केलेला प्रामाणिक प्रयत्न ठरेल. त्यामुळे वेताळ टेकडीचा प्रकल्प अट्टहासाने पूर्ण करण्यापेक्षा नागरिकांचे हित कशात आहेत, याचा विचार व्हावा.

हे नक्की करा

  • पुण्यातील टेकड्या वाचविण्यासाठी स्पष्ट धोरण

  • अतिक्रमणांवर कठोर कारवाई

  • टेकड्यांवर विकास प्रकल्प नकोत

  • प्रकल्पांबाबत अधिकाधिक पारदर्शकता

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Loksabha: प्रशासनाचा भोंगळ कारभार, मतदार यादीत नाव नसल्याने मतदार हैराण

Google Map Address Update : गुगल मॅपवर पत्ता बदलणे आता तुमच्या हातात ; फॉलो करा 'या' ट्रिक्स

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: पवईतील हिरानंदानी मतदार केंद्रावर दोन तासांपासून मतदारांच्या रांगा

Iran Helicopter Crash : इराणच्या राष्ट्राध्यक्षांना घेऊन जाणाऱ्या 'बेल 212' हेलिकॉप्टरमुळे अनेकांनी गमावलाय जीव ; जोडलं जातंय अमेरिकेच नाव

Latest Marathi Live News Update: उद्या महाराष्ट्रात बारावीचा निकाल जाहीर होणार

SCROLL FOR NEXT