सणसवाडी, ता. २४ : स्थानिकांना रोजगार आणि कंत्राटी कामांच्या अटींचा भंग केल्याप्रकरणी सणसवाडी ग्रामपंचायतीने बोलावलेल्या बैठकीला ६५ पैकी ५९ कंपन्यांनी दांडी मारली. याप्रकारामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने तीव्र संताप व्यक्त केला आहे. संबंधित कंपन्यांवर कायदेशीर कारवाईसह त्यांची ना-हरकत प्रमाणपत्रे रद्द करण्याचा इशारा दिला आहे.
सणसवाडीतील सुमारे २०० कंपन्यांना उद्योग सुरू करताना स्थानिकांना ३० टक्के रोजगार आणि कंत्राटी कामांत प्राधान्य देण्याच्या अटीवर ना-हरकत प्रमाणपत्रे देण्यात आली होती. मात्र, या अटींचे पालन होत नसल्याच्या तक्रारी युवकांनी ग्रामसभेत केल्या होत्या. या पार्श्वभूमीवर पहिल्या टप्प्यात ६५ कंपन्यांना बाजू मांडण्यासाठी निमंत्रित केले होते. दरम्यान, बुधवारी (ता. २४) झालेल्या बैठकीला केवळ ६ कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहिले. उर्वरित ५९ कंपन्यांच्या अनुपस्थितीमुळे प्रशासक तथा सरपंच शशिकला सातपुते आणि उपसरपंच डॉ. मोहन हरगुडे यांनी संताप व्यक्त केला. दरम्यान, काही कंपन्यांनी कंत्राटी कामांच्या प्रश्नांबाबत प्रतिसाद दिला नाही.
या अटींचा झाला भंग
स्थानिकांना किमान ३० टक्के रोजगार देणे, स्थानिक व्यावसायिकांना कंत्राटात प्राधान्य देणे या अटींचे उल्लंघन होत आहे. ठराविक लोकांनाच कंत्राटे दिली जात असून ग्रामस्थांना दाद दिली जात नसल्याची माहिती माजी उपसरपंच सागर दरेकर यांनी दिली.
कंपन्यांना दिलेली ना-हरकत प्रमाणपत्रे रद्द करण्याचा अधिकार ग्रामसभेला आहे. प्रतिसाद न देणाऱ्या कंपन्यांबाबत आता ग्रामसभेत कठोर निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
- शशिकला सातपूते, सरपंच
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.