GHR26A08788
संगमनेर : तालुक्याच्या पठारभागावरील पावसाअभावी सुकू लागलेले टोमॅटोचे पीक.
पावसाअभावी टोमॅटोचे आगार कोमेजले
टँकरच्या पाण्यावर शेतकऱ्यांची जिवाची झुंज ः पावसाची प्रतीक्षा कायम
संगमनेर, ता. २३ ः तालुक्याच्या पठार भागावरील वर्षानुवर्षे ‘टोमॅटोचे आगार’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुंजाळवाडी पठार, पिंपळगाव देपा, मोधळवाडी, खंडेरायवाडी येथील टोमॅटो उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. पावसाअभावी टोमॅटोचे फड सुकू लागले आहे. फड जगविण्यासाठी शेतकऱ्यांना टँकरचे विकत पाणी घ्यावे लागत आहे. त्यामुळे टोमॅटो उत्पादक अडचणीत आले आहे.
टोमॅटोच्या आगाराला आता पावसाचीच प्रतीक्षा आहे. या भागातील शेतकऱ्यांची शेती पावसावरच अवलंबून आहे. दरवर्षी शेतकरी मे महिन्यात टोमॅटोच्या रोपांची लागवड करतात, कारण जून महिन्यात पावसाला सुरवात होते. मात्र, यावर्षी जून संपण्यास अवघे काही दिवस उरले असतानाही अद्याप पाऊस झालेला नाही. उलट कडक ऊन पडत आहे. त्यातच शेततळे, विहिरी व बोअरवेलचे पाणीही संपले आहे. त्यामुळे टोमॅटोचे फड जगविण्यासाठी शेतकऱ्यांवर टँकरचे विकत पाणी घेण्याची वेळ आली आहे. पाणी शेततळ्यात किंवा विहिरीत सोडून ठिबक सिंचनाद्वारे टोमॅटोच्या पिकाला दिले जात आहे.
कडक उन्हामुळेही टोमॅटोच्या फडांना मोठा फटका बसला आहे. झाडे मोठी झाली, पण त्यांना म्हणावी तशी फळधारणा झालेली नाही. टोमॅटोचे फडही सुकू लागले आहेत. काही शेतकऱ्यांनी टोमॅटोची झाडे उपटून टाकली आहेत. केवळ टँकरचे विकत पाणी आणण्यासाठी काही शेतकऱ्यांचा एक लाख, तर काहींचा दोन लाखांहून अधिक खर्च झाला आहे. आता, पाऊस पडेल या आशेवर टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांची भिस्त आहे.
----------
मी पाच एकर टोमॅटो रोपांची लागवड केली आहे. मात्र, शेततळ्यातील पाणी संपल्याने टँकरचे विकत पाणी आणून टोमॅटोचे फड जगवले आहेत. आतापर्यंत पाण्यावर दोन लाखांहून अधिक खर्च झाला. पण, अद्यापही पाऊस झालेला नाही. जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत टँकरचे विकत पाणी आणून टोमॅटोला सोडावे लागणार आहे.
-दादाभाऊ आगलावे, टोमॅटो उत्पादक शेतकरी.
---------
सहा ते सात एकर टोमॅटोच्या रोपांची लागवड केली आहे. मात्र, शेततळ्यातील पाणीही कमी पडू लागले आहे. त्यामुळे टोमॅटो पिकाला मुबलक पाणी सोडता येत नाही. सध्या टोमॅटो फडांना उन्हाऐवजी पावसाची गरज आहे. काही शेतकऱ्यांकडे पाणीच नसल्याने त्यांनी टोमॅटोची झाडे उपटून टाकली. परिसरातील टोमॅटो उत्पादक शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
-नंदू ढेरंगे, टोमॅटो उत्पादक शेतकरी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.