सांगली जिल्हा बँकेचे
अध्यक्ष काँग्रेसचे महेंद्र लाड
शिवसेनेचे तानाजी पाटील उपाध्यक्ष
बिनविरोध निवडी ः भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यात यश
ॲग्रोवन वृत्तसेवा
सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे ज्येष्ठ संचालक महेंद्र लाड यांची, तर उपाध्यक्षपदी शिंदेंच्या शिवसेनेचे नेते तानाजी पाटील यांची बुधवारी (ता. १८) बिनविरोध निवड झाली. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याची खेळी करत काँग्रेस आणि शिंदेंची शिवसेना एकत्र आली. निवडीनंतर भाजपने ‘आम्ही आता विरोधक म्हणून काम करू’, असे जाहीर केले.
निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सुनील चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (ता. १८) दुपारी तीन वाजता बैठक सुरू झाली. अध्यक्षपदासाठी महेंद्र लाड, तर उपाध्यक्षपदासाठी तानाजी पाटील यांनी अर्ज दाखल केला. लाड यांच्या अर्जास आमदार विश्वजित कदम सूचक, तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील अनुमोदक होते. उपाध्यक्ष पाटील यांच्या अर्जाला अमोल बाबर सूचक, तर माजी खासदार संजय पाटील अनुमोदक होते. दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी चव्हाण यांनी बिनविरोध निवडीची घोषणा केली.
नूतन अध्यक्ष व उपाध्यक्षांचा खासदार विशाल पाटील, मावळते अध्यक्ष मानसिंगराव नाईक, आमदार विश्वजित कदम, गोपीचंद पडळकर, संजय पाटील, माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्यासह संचालकांनी सत्कार केला. देवराज पाटील, वैभव शिंदे, संभाजी कचरे, विराज नाईक, सतीश देशमुख, के. डी. कांबळे, पृथ्वीराज पाटील, राहुल महाडिक, रणधीर नाईक, पूजा पाटील, वर्षा सावंत, नितीन होनराव, अण्णासाहेब कोरे उपस्थित होते.
भाजपला वगळण्याची खेळी
जिल्हा बँकेच्या संचालक मंडळात काँग्रेसचे सहा, भाजपचे पाच, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे चार, शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे तीन आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे तीन संचालक आहेत. महायुतीतील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे एकत्रित संख्याबळ ११ होते. शिवसेनेचे तीन आणि राष्ट्रवादीचे रणधीर नाईक महाविकास आघाडीसोबत गेल्याने सत्तेचे गणित बदलले. शिवाय, संजय पाटील यांनी तानाजीरावांना ‘अनुमोदक’ होत भाजपला ‘सूचक’ इशारा दिला. त्यामुळे महाविकास आघाडीने सत्तावाटपाबाबत भाजपशी चर्चाही केली नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.