पुणे

नामदेवांची निर्गुणपंथी ‘आद्य’बानी

CD

नामदेवांची निर्गुणपंथी ‘आद्य’बानी

संत नामदेवांनी ज्ञानेश्वर-माउलींच्या संजीवन-समाधीनंतर सहा दशके (इ.स. १२९६ ते १३५०) उत्तर हिंदूस्थानाची परिक्रमा केली. ‘विठू’माउलीच्या सावलीतील महाराष्ट्र त्यागून अस्थिर-अगतिक झालेल्या उत्तर-भारतीय समाजाला त्यांनी आपलेसे केले. या काळातील नामदेवांचा वावर किती प्रभावी असावा, याचा खरा दाखला उत्तर-भारतात शतकानुशतके जपलेल्या ‘नामदेव की बानी’ या ग्रंथातील रचनांतून मिळतो. शिवाय संत नामदेवांच्या रचना या आजही स्वामी रामानंद संप्रदायापासून ते कबीर संप्रदाय, नाथ संप्रदाय आणि शीख संप्रदायाच्या ‘गुरूग्रंथसाहिब’ ग्रंथापर्यंत समाविष्ट होताना आढळतात. 
- मनीषा बाठे,  संत वाङ्‌मय अभ्यासक


विविध संप्रदायांच्या प्रमुखांनी आणि संत नामदेवांच्या पश्चातही त्यांचा वैचारिक मार्ग अंगीकारलेल्या मंडळींनी आपापल्या लेखनात नामदेवांचा उल्लेखही केलेला दिसतो. उदाहरणार्थ, दादु दयाळ संप्रदायाच्या आरंभीच्या स्तवनात दादु दयाळ लिहितात-
‘‘रामरस मीठा रे, कोइ, पीवै साधु सुजाण । 
सदा रस पीवै प्रेम सों, सो अविनासी प्राण ।।१।।
इहि रस राते नामदेव, पीपा अरु रैदास ।
पिबत कबिरा ना थक्या, अजहूँ प्रेम पियास ।।२।।
यहु रस मीठा जिन पिया, सो रस ही रहा समाय।
मीठे मीठा मिलि रहा, दादू अनत न जाइ ।।३।।’’

वरील रचनेत दादु दयाळ हे नामस्मरणाचे माहात्म्य जगलेल्या आदर्श संतांच्या ओळीत सर्वप्रथम स्थान संत नामदेवांना देत आहेत. केवळ नामस्मरण एवढीच उपासना आणि बरोबरीने संपूर्ण कर्मकांड अगदी तिलक, माळ, मूर्ती इ. सर्वच नाकारलेला खऱ्या अर्थाने कडवा निर्गुणपंथी ‘दादु दयाळ संप्रदाय’! जो फक्त ‘सत्तराम’ या अभिवादनाने आजही चार राज्यांत जोडलेला आहे. त्यांच्या रचनांमध्ये संत नामदेव आढळतात. ‘दादुदयाळ की बानी’ या पदावल्यांच्या संग्रहात एक ब्रजी बोलीतील संत नामदेव-रचित विरहिणी आहे. 
‘मेरा पिया विलम्यो परदेस, होरी मैं कासों खेलौं ।
जा दिनसे पिया गबन कियो है, सिंदुरा न पहिरो मांग ।
प्रीतम को पलियाँ लिषि भेजौ, प्रेम प्रीति मसि लाय ।
बेगि मिलो जन नामदेव को, जनम अकारथ जाय।।

वरील पदामधील भक्तहृदयाची तळमळ ही इतकी उत्कट आहे, की अनेक शतके समाजात रुजली. त्यामुळे संत नामदेवांच्या पश्चात दोनशे वर्षांनंतरही संत दादु दयाळांसारखे स्वतंत्र संप्रदायाची स्थापना करताना त्यांच्याबद्दल पूज्यभाव ठेवताना आढळतात. दादु दयाळांचा जीवनकाळ इ. स.१५४४ ते १६०३ होता. तरीही त्यांच्या रचनांतून दिसणारा नामदेवांचा प्रभाव हा थक्क करणारा आहे. अहमदाबादच्या नागर ब्राह्मण परिवारात वाढलेल्या दादु दयाळांनी पुढे ईश्वरी शोधात घर त्यागून राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा येथे नित्य भ्रमण केले. त्यामुळे येथील स्थानिक संस्कृतीमध्ये एकजीव झालेल्या नामदेवांचा ऋणानुबंध दादु दयाळांच्या लेखनात सहज जाणवतो. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात हिंदू विश्वविद्यापीठात कार्यरत रा. द. रानडे, यांनीही ‘दादु दयाळ संप्रदायावरील नामदेवांच्या प्रभावाबद्दल’ विशेष नोंदींसह लेखन केलेले आहे. 

संत नामदेवांच्या अमराठी रचनांतील ‘निर्गुण-उपासना’ : 
संत ज्ञानेश्वरांच्या पश्चात उत्तर-भारतात भ्रमण करताना नामदेवांना भक्तिमार्गातील ‘सगुण-निर्गुण एकु गोविंदु रे...’ ही अनुभूती सहज लाभत गेली. त्यामुळेच नामदेवांच्या ‘त्या मलंग अस्तित्वामध्ये’ प्रांतिक अभिमान विरून ‘निर्गुणभाव’ जागू लागला. जो ब्रजी, पूर्बी, खड़ी बोली व सधुक्कड़ी या लोकबोलींमध्ये कधी ‘नामा कहे''(खड़ी बोली) तर कधी‘भणै नामा’ (गुर्जरी) म्हणत तो प्रकटला. द्वारका-सोरठ ते मथुरा-काशी आणि प्रयाग-उज्जैन ते पंजाबपर्यंतच्या लोकभाषांतून भागवत धर्माची शिकवण सहज दरवळू लागली.

ऐसा रामराई अंतर जाती । जैसे दरपनमाहि बदन परवाना।। 
बसै घटाघट लीपै न छीपै । बन्धन मुगता जातु न दीसै ।।
पानिमाहि देखु मुख जैसा । नामे को सुआमी बीठलु ऐसा ।।
या पदात दिले आहे की ‘‘आरसा तथा पाण्यातील आपलेच प्रतिबिंब जितके स्पष्ट आहे, तितकेच सृष्टीतील, स्वत:तील परब्रह्म / विठ्ठल हा मला (नामदेवांना) सहज भेटतो. ’’

उत्तर-भारतामध्ये संत नामदेवांच्या ‘निर्गुण-उपासनेच्या अधिष्ठानाला’ खऱ्या अर्थाने उचलून धरले ते स्वामी रामानंदांचे शिष्य संत कबीरांनी! त्यामुळेच आजही उत्तर-भारतात ‘हिंदी वाङ्‌मय इतिहासकर्त्यांमध्ये’ निर्गुणपंथाचे आद्य-प्रवर्तक ‘संत नामदेव, का संत कबीर’? यात दुमत आहे. तरीही ‘हिंदी वाङ्‌मयाचे आद्य इतिहासकार’ ब्रिटिश अधिकारी सर डॉ. जॉर्ज ग्रियर्सन यांनी मॉर्डन व्हर्नेक्युलर लिटरेचर ऑफ नॉरर्दन हिंदुस्थान (सन १८८९), त्यानंतर इ.स. १९१३ मध्ये मिश्रबंधूंच्या ग्रंथांमध्ये ‘नामदेव की बानी’चा काळानुसार ‘कबीरांच्या पूर्वीची’ म्हणून क्रमाने ‘आद्य’ म्हटली आहे. शिवाय इ.स. १९३० पर्यंत वाराणसीतील आचार्य रामचंद्र शुक्लांनी उत्तर-भारतातील ‘भक्तिचळवळीतील महत्त्वपूर्ण केंद्र’ म्हणत, ‘‘निर्गुणपंथ को मार्ग दिखाने वाले नाथपंथ तथा वारकरी संप्रदाय के योगी और भक्त नामदेव ही है। (पृ.४२)’’ हे स्पष्ट विधानही केलेले आहे.

वास्तविक पाहता, संत नामदेवांचे महाराष्ट्राबाहेरील कार्य हे बहुआयामी आहे. यात त्यांनी जातिपाती, कर्मकांडापासून परावृत्त होण्याचे लोकशिक्षण दिले. संत नामदेवांनी मांडलेला निर्गुणवाद हा हिंदु-मुसलमान दोन्ही धर्मांतील आचरण-पद्धतींमुळे होणारा भेदभाव विसरण्यास सांगतो.
एका पदात नामदेव मांडतात की- 
‘‘हिंदू अंधा तुरुकौ काना, दुवौ ते ज्ञानी सयाना। 
हिंदू पूजै देहरा, मुसलमान मसीद।
नामा सोई सेविया जहॅं देहरा न मसीद।।’’

चौदाव्या शतकाच्या आरंभी भारताच्या सीमावर्ती समाजात फोफावलेली कर्मकांडे, नाथ संप्रदायातील रूढीबाह्य पद्धती तसेच अगदी मुसलमानांमध्येही सुफी संप्रदायाची भर पडली होती. अशा काळात ‘खरा धर्म कोणता?’ ‘आध्यात्मिक आचरणात काय करावे?’ ‘कोणती उपासना योग्य?’ अशा प्रश्नांनी येथील समाज भ्रमित होता. त्यातच इस्लामी सत्ता दक्षिणेपर्यंत स्थिरावत होती. एकूणच संपूर्ण भारतीय समाज अस्थिर होता. अशा स्थितीत संत नामदेवांसारखे एक साक्षेपी ‘वैष्णव साधक’ हे तर्कशुद्ध विचारांतून लोकशिक्षण देत होते.
संत नामदेवांबद्दलचा ‘पूज्यभाव’ हा गुजरातमधील द्वारकेलगतचा प्रदेश ‘सौराष्ट्र’ येथील आद्यवैष्णव ‘संत नरसी महेता’ यांनाही वाटला होता. नरसी त्यांच्या ‘आख्यानकार’ घराण्यातील पणजोबांच्या पोथ्यांतून आणि द्वारका परिसरातील लोककलांतून ऐकलेल्या ‘संत नामदेवांच्या’ तत्त्वज्ञानाने प्रभावित झाले होते. त्यामुळे नरसींच्या काव्यात सहजतेने ते सूर उमटतात की,
‘‘कबीरने तमे किधी सहाय, नामदेवनी जीवडी गाय... महेते करमां लीधी ताळ रे... ’’

या रचनेत नरसी महेता गुर्जरी बोलीभाषेत द्वारकाधिशांना सांगतात, ‘‘देवा, तू कबीराच्या हाकेला धावतोस, नामदेवाची गाय जिवंत करतोस अन्‌ म्हणून आता महेतानेही हाती टाळ घेतले रे...’’ 
नामदेवांच्या भक्तीतील अनन्यता ही उत्कट व ज्ञान संपन्नदेखील होती. त्यामुळेच नामदेवांची पदे गुजरातमधील ‘आख्यानकार’ नागर ब्राह्मणांच्या पिढ्यान्‌पिढ्यांनी जतन करीत, रुजवली. याचेच एक उदाहरण म्हणजे नरसींच्या वंशातील अकराव्या पिढीतील वंशज अनंतदास हे एकोणीसाव्या शतकात राधानगरी येथे दिवाण म्हणूनही कार्यरत होते. त्यांनी पूर्वजांनी संकलित केलेली ‘वैष्णवांची आख्याने’ एकत्र प्रकाशात आणली. त्याच आख्यानात एका भवईच्या सांगतेमध्ये आख्यानकार संत नामदेवांचे वर्णन लिहितो की,
नामदेव धन्य धन्य सहुं कहे, नामदेव धन्य धन्य । 
विप्रो ज्ञानी ध्यानी तपसी, तम सम कोए न अन्य ।
साचा संत सख्या श्रीवरना, शरणागतज अनन्य । 
आप प्रताप बाप अम सहु पर, वरस्या हरि परजन्य । 
अनुए जोइ ओई चित्त श्रीपदे, सविधि थयो शरण्य ।।

वरील पंक्तींमध्ये गुजरातमधील जनमानसात रूढ संत नामदेवांच्या व्यक्तित्वाबद्दलचे विलक्षण वर्णन पहायला मिळते. खरे तर, या नामदेवांच्या गुणविशेषांना पुढेही उत्तर-भारतातील संत-संप्रदायांप्रमाणे महाराष्ट्रातील पुढील पिढ्यांतील संतांनीही त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे. 
संत एकनाथ महाराज ‘और भी नानक’ या दखनी पदात लिहितात,

‘‘सिर में टोपी गले में सैली, कफनी डाला देख  ।
फेक दाम फेक, मुझे फेक दाम फेक।।
निराकार नाम एक, हमने लिया भेक ।
सोहं की तो नौबत बाजे, बिरला जाने एक।।
और नानक नामा दरजी, देव बुलाया देख।।
और नानक कबीर हुआ, दुजा कमाल देख।
...एकनाथ तो एकही जाने, एका जनार्दनी देव।। ’’

असो, संत नामदेव हे महाराष्ट्रातून सीमोल्लंघन केलेले पंढरपूरच्या मऱ्हाटमोळ्या पांडुरंग-‘विठाई’चे लेकरू !... परंतु ही माय-विठाई नामदेवांच्या सांगाती उत्तर-भारताच्या परिक्रमेत प्रेमाने ‘विठ्ठलवर, बिठूला, विठुला’ म्हणवत सगुणापासून निर्गुणापर्यंत चालली. अन्‌ आजही निर्गुणपंथाला दिशा देत संत नामदेवांच्या कवनांतून ती ‘शब्दरूप-विठाई’ होऊन तिथेच रमली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer: थेट मंत्र्याशी नडणारा आयएएस अधिकारी! कोण आहेत जॉन किंग्जली? वाद थेट मुख्यमंत्री अन् मुख्य सचिवांपर्यंत

Success Story: भाड्याचे घर अन् 10 हजारांच्या पगारातून सुरुवात! मात्र आज तब्बल 400 कोटींच्या कंपनीचे मालक

Madhya Pradesh : लाडकी बहीण योजनेचा ३८ वा हप्ता जमा; १.२५ कोटी महिलांच्या खात्यात १८३५ कोटी रुपयांची थेट मदत

Latest Marathi News Update : पावसाबाबत हवामान विभागाचा मोठा अंदाज, नेमका कधी परतणार? वाचा...

Mumbai Railway NOC: रेल्वे ट्रॅकपासून ३० मीटरपर्यंत बांधकाम करायचंय? तर आधी रेल्वेकडून NOC घ्यावी लागणार, मुंबईत नवा नियम लागू

SCROLL FOR NEXT