प्रसन्नचित्त- (पानाचे जुने टेम्पलेट घेऊ नका. ९ मे चे घ्या.)
लोगो- सारासार
सचिन महाराज पवार
----------
तया अधोगति न चुकती...
----------
संत नामदेव महाराजांच्या अभंगांमध्ये मानवी मनाचे अत्यंत सूक्ष्म निरीक्षण आढळते. ते केवळ भक्तिभाव व्यक्त करत नाहीत, तर माणसाच्या अंतर्मनातील विसंगती, अहंकार आणि आत्मवंचनेवर थेट प्रकाश टाकतात. ‘उपाय असतां अपाय मानिती । तया अधोगति न चुकती।।’ हा अभंग आजच्या काळातील मानवी मानसिकतेचा आरसा वाटतो. कारण आज माणसाकडे माहिती, शिक्षण, साधने आणि पर्याय सर्व काही असूनही तो अधिक अस्वस्थ, तुटलेला आणि गोंधळलेला दिसतो.
नामदेव महाराज सांगतात की, उपाय समोर असतानाही माणूस अपायाचाच मार्ग निवडतो. ही ओळ आजच्या जीवनाला अत्यंत लागू पडते. प्रत्येकाला माहीत आहे मानसिक शांततेसाठी संयम आवश्यक आहे, नातेसंबंध टिकवण्यासाठी संवाद आवश्यक आहे आणि निरोगी जीवनासाठी शिस्त आवश्यक आहे. तरीही माणूस स्वतःच्या विनाशकारी सवयी बदलत नाही. त्याला शांतता हवी असते; परंतु तोच तुलना, स्पर्धा आणि असुरक्षिततेत अडकून राहतो.
आज माहितीचा अभाव नाही; उलट अतिरेकच आहे. प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे, प्रत्येकाकडे मत आहे आणि प्रत्येकजण स्वतःला सजग समजतो. या माहितीच्या गर्दीत अंतर्मुखता हरवत चालली आहे. लोक मानसिक आरोग्यावर बोलतात, अध्यात्मावर चर्चा करतात, प्रेरणादायी विचार ‘शेअर’ करतात; परंतु स्वतःच्या जीवनात बदल घडवण्याचे धाडस फार कमी लोक दाखवतात. म्हणूनच नामदेव महाराज सांगतात- उपाय असूनही जो अपायाचा मार्ग निवडतो, त्याची अधोगती अटळ आहे. कारण समस्या अज्ञानाची नसते; ती अहंकाराची असते.
‘मनुष्या माझारी तो एक गाढव । तया अनुभव काय करी।।’ या चरणात नामदेवरायांनी ‘गाढव’ हा शब्द अपमानासाठी नसून जागृतीसाठी वापरला आहे. जीवन माणसाला वारंवार अनुभव देत असते. चुका होतात, नाती तुटतात, मन दुखावते, अपयश येते. पण तरीही माणूस त्याच चुकांची पुनरावृत्ती करत राहतो.
आज अनेक लोक सतत तणाव, असंतोष आणि रिक्ततेबद्दल बोलतात; परंतु त्यांच्या जीवनपद्धतीत बदल घडत नाही. एखादी व्यक्ती कामाच्या ताणामुळे थकलेली असते; तरीही स्वतःला वेळ देण्याऐवजी ती आणखी स्पर्धेत अडकते. अनुभव येतो; त्यातून आत्मपरीक्षण जन्म घेत नाही. गाढव ओझे वाहते; पण कुठे चाललो आहे, हे त्याला माहीत नसते. आजचा माणूसही अनेकदा तसाच दिसतो. माहिती वाहतो, अनुभव गोळा करतो; मात्र जीवनाची दिशा हरवून बसतो. वय वाढते, अनुभव वाढतात; तथापि शहाणपण वाढत नाही. कारण शहाणपणासाठी नम्रता आवश्यक असते आणि नम्रता अहंकाराला मान्य नसते.
नामा म्हणे देव ऐसियासी कैसा । काया मनें वाचा भेदवादी।।
शरीर, मन आणि वाणी यांच्यात एकरूपता नसणे, ही आजच्या काळातील सर्वांत मोठी समस्या आहे. लोक प्रेम, नैतिकता आणि अध्यात्माबद्दल बोलतात; परंतु व्यवहारात अहंकार, स्पर्धा आणि द्वेष वाढताना दिसतो. समाजमाध्यमांवर संवेदनशीलतेची भाषा करणारे अनेक लोक प्रत्यक्ष जीवनात कठोर आणि असहिष्णू असतात. बोलण्यात करुणा आणि वर्तनात स्वार्थ, विचारांमध्ये आदर्श आणि कृतीत दांभिकता हीच ती ‘भेदवादी’ अवस्था आहे, ज्यावर नामदेवराय बोट ठेवतात. ते विचारतात, अशा माणसाला देव कसा मिळणार? म्हणजेच अशा माणसाला आत्मशांती, समाधान आणि खरी माणुसकी कशी मिळणार?
हा अभंग आजच्या माणसाला आवश्यक प्रश्न विचारतो- आपल्याला खरोखर बदलायचे आहे का, की फक्त बदललेले दिसायचे आहे? उपाय बाहेर नाही; तो आधीपासूनच आपल्यासमोर आहे. माणूस स्वतःच्या अहंकाराला आणि आत्मवंचनेला ओळखत नाही, तोपर्यंत कोणतेही ज्ञान, अधात्म, कोणताही अनुभव त्याला बदलू शकत नाही.
-------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.