पुणे

- प्रभू महाराज माळी, देहू

CD

कर्मयोगी : संत सावता महाराज
संत सावता महाराज हे आपण करत असलेल्या कर्मालाच ईश्वर मानून पूर्ण निष्ठेने आणि इच्छेने कर्म हीच ईश्वराची पूजा आहे, अशा स्वरूपाचा प्रापंचिक जीवनामध्ये राहून मानव जातीच्या उद्धारासाठी अत्यंत जवळचा संदेश संत सावता महाराजांनी दिला. कारण कोणताही देव आणि देवाची भक्ती हे आपण करत असलेले कर्म सोडून कधीही होणार नाही, केलेले कर्म हे प्रामाणिक असेल तर ते कर्म ईश्वराची पूजा होते, असा ज्ञानेश्वर महाराजांचा मतप्रवाह आहे. तोच मतप्रवाह संत सावता महाराजांनी पुढे चालवला
- प्रभू महाराज माळी, देहू

पवित्र ते कुळ पावन तो देश ।
जेथे हरीचे दास जन्म घेती ।।
पवित्र असणाऱ्या देवू माळी यांच्या कुळात परसोबा यांच्या पोटी एका महान संतांचा जन्म झाला. जन्म कालखंड सन १२५० ते संजीवन समाधी सन १२९५ असा आहे. अरण, ता. माढा जि. सोलापूर. देवु माळी हे सावता महाराजांचे आजोबा. ते पंढरीचे निष्ठावंत वारकरी होते. देवू माळी यांना दोन मुले झाली. परसोबा आणि डोंगरोबा. परसोबा हे वारकरी होते. पारंपारिक शेतीचा व्यवसाय सांभाळून भजन-पूजन करत असत. पवित्र भगवत भक्तांच्या पोटी सावता महाराज यांचा जन्म झाला.
‘‘धन्य ते अरण रत्नाची ते खान ।
जन्मला निधान सावता तो ।।
धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता ।
साठविला दत्तात्रय त्रेलोक्याचा ।।’’

असे गौरवोद्गार संत नामदेव महाराज यांनी सावता महाराज यांच्याबाबतीत काढले आहेत. संत सावता महाराज हे कर्म सिद्धांताचे जनक होते. म्हणजे ईशावास्योपनिषदामध्ये कर्मसिद्धांताला अनन्यसाधारण महत्त्व आहे, ‘कर्म ईशु भजावा’ या श्लोकाच्या माध्यमातून हा विचार मांडला. म्हणून सावता महाराज यांनी ‘‘आपण करत असलेल्या कर्मालाच ईश्वर मानून पूर्ण निष्ठेने आणि इच्छेने कर्म हीच ईश्वराची पूजा आहे,’’ अशा स्वरुपाचा प्रापंचिक जीवनामध्ये राहून मानव जातीच्या उद्धारासाठी अत्यंत जवळचा संदेश दिला.
कारण, कोणताही देव आणि देवाची भक्ती हे आपण करत असलेले कर्म सोडून कधीही होणार नाही. केलेले कर्म हे प्रामाणिक असेल, तर ते कर्म ईश्वराची पूजा होते, असे ज्ञानेश्वर महाराजांचे मार्गदर्शन आहे. तोच मार्ग संत सावता महाराजांनी पुढे चालवला. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात,
‘‘तया सर्वात्मका ईश्वरा ।
स्वकर्म कुसुमाचिया विरा ।।
पूजा केली अपरा ।
तोषवयालागी ।।’’

श्री संत सावता महाराज हे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रभावळीतील समकालीन संत होते. ‘कर्मे इशू भजावा ।’ या माउलींच्या ओवीप्रमाणे जीवन जगणारे होते. सावता महाराज यांनी आपल्या व्यवसायातील वाक्प्रचार, शब्द अभंगात वापरले आहेत. लोकभाषेचा वापर केला, तरच या सामान्य समाजाला तत्त्वज्ञानाची समज येते. अन्यथा ते बोजड होते. तत्कालीन मराठी काव्यामध्ये, भाषेत नव्या शब्दांची, नव्या अलंकाराची भर पडली. सावता महाराजांचे अभंग काशीबा महाराज गुरव यांनी लिहून ठेवले.
‘साव’ म्हणजे शुद्ध, पवित्र. सावता महाराज हे नावाप्रमाणेच होते. ‘स्वधर्मे निधनं श्रेय: परधर्मो भयाव:।।’ या गीतेतील श्लोकाप्रमाणे त्यांची जीवनशैली होती. आपल्या वाट्याला आलेले कर्म यथासांग करावे. त्यात टाळाटाळ करणे म्हणजे अधर्म होय. अनासक्त वृत्तीने ईश्वरार्पण बुद्धीने केलेला प्रपंचच परमार्थ होतो, हीच त्यांची जीवननिष्ठा होती. त्यांना मोक्ष-मुक्ती नको होती. ‘वैकुंठीचा देव आणू या कीर्तनी ।’ ही त्यांची प्रतिज्ञा होती.
‘स्वकर्मात व्हावे रत।
मोक्ष मिळे हातो हात।’ ‘
सावताने केला मळा।
विठ्ठल देखियला डोळां।’ अनासक्त वृत्तीने ईश्वरार्पण बुद्धीने केलेला प्रपंचच परमार्थ होतो, ते सावता महाराजांच्या जीवनात यथार्थ लागू पडते. यातून त्यांची जीवननिष्ठा दिसून येते.
छांदोग्य उपनिषदात नारद सनत्कुमारांच्या संवादात असे म्हटले आहे की ‘यो वै भूमा तत्सुखं नाल्पे सुखमस्ति, भूमैव सुखं भूमा त्वेव विजिज्ञासितव्य:।’ व्यापकत्वातच सुख आहे. अल्पत्वात सुख नसते आणि व्यापक एक ब्रह्म आहे. तदभिन्न सर्व मिथ्या असते. तो परमात्मा सर्वत्र आहे. फक्त तशी दृष्टी असावी लागते. प्रत्येक भूतमात्रात एक भगवंतच आहे, हे एकदा कळले की मग त्याने मंदिरात जावो अथवा न जावो. जगद्गुरू संत तुकाराम महाराज म्हणतात ‘मग तू राहें भलत्या ठायीं ।
जनी वनी खाटे भुई ।।
तो कुठेही राहिला तरी त्याच्या जीवनमुक्तीमध्ये काहीही फरक पडत नाही. वारी करूनही जर आत्मदृष्टी आली नाही, तर ती वारी म्हणजे फक्त येरझार ठरते. त्यांनी तो भाव त्यांच्या अभंगात प्रगट केला आहे.
‘आमुचि माळियाची जात ।
शेत लावू बागाईत ।।’ माळी जातीत जन्माला आलेलो आहे व आमचे कर्तव्य कर्म म्हणजे शेती करणे. होय, शेतकरी खरा अन्नदाता आहे. तो बाकीच्या गोष्टी बाजूला ठेवतो व प्रथम प्राधान्य शेतीला देतो. अगदी तुकाराम महाराजही म्हणतात,
‘मढे झाकोनिया करिती पेरणी ।
कुणबियाची वाणी लवलाही ।।’ कर्तव्य कर्म चुकवायचे नाही ही संतांची ग्वाही आहे.

सावता महाराजांनी शांतिरुपी शेवंती फुलवली, प्रेमरूपी जाई उगविली, लसूण मिरची, कोथिंबिरीमध्ये त्यांनी त्या व्यापक हरिला पाहिले. त्यांची पंढरी व्यापक होती. एकदेशी नव्हती.
‘‘तुका म्हणें आम्हां ब्रह्माण्ड पंढरी ।’’ सावता महाराजांनी जसा शेतीचा विविध पिकांचा मळा केला, तसा आध्यात्मिक क्षेत्रात भक्तीचा मळा केला व जगाला व्यापकत्वाचा आदर्श घालून दिला. ही त्यांची प्रतिभासंपन्न अनुभूती होती. त्यामुळे त्यांना पंढरीला जाण्याची आवश्यकता नव्हती. अंधश्रद्धा त्यांनी मोडीत काढली. बळी देण्याची प्रथा त्यांनी बंद करायला लावली. सावता महाराजांच्या मळ्यात ज्ञानेश्वर महाराज व नामदेव महाराज आदी तत्कालीन सर्व संत यायचे तेथे संतमेळा भरायचा. आध्यात्मिक संवाद होत असत. नामदेव महाराजांचे कीर्तन महाराजांच्या मळ्यात होत होते. त्या सर्वांचा एकोपा होता. कोणत्याही प्रकारचा भेद नव्हता. किंबहुना शांतीचा संदेश या संत मेळाव्यातून जात असे. आता मात्र संतसुद्धा एकत्र येणे अवघड होत आहे. विविध पक्षांचे सुद्धा संत-महंत झाले आहेत, हे दुर्दैव आहे.

भगवद्गीतेमध्ये म्हटले आहे. ‘सुखदु:खे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ ।’ अगदी याचप्रमाणे सावता महाराज जीवनाचा सहज सोपा सिद्धांत सांगतात,
‘समयासी सादर व्हावें ।
देव ठेविले तैसें रहावें ॥’
संत तुकाराम महाराजही हेच सांगतात,
‘ठेविले अनंते तैसेचि राहावे ।
चित्ती असो द्यावे समाधान ।।’
संतांची सर्वत्र एकवाक्यता असते. परंतु आता मात्र समाजात चित्र वेगळे दिसू लागले आहे. सर्व क्षेत्रात जातीभेदाच्या भिंती उभ्या राहिल्या आहेत. अगदी संतांना सुद्धा जाती जातीमध्ये विभागून ठेवले आहे, हे विदारक आहे. ‘संत दिसती वेगळालेले ।
परी ते स्वरूपी मिळाले ।।’
वारकरी संतांनी एकात्मकतेचा संदेश दिला आहे. देव धावतो आणि भक्ताबरोबर कामाला भिडतो, तो त्याच्या उपासकाला त्या कामांचा शीण वाटू नये म्हणून इथे मुक्ती आहे; पण ती कर्मापासून नव्हे कर्म करुन ती देवाला समर्पित करुन होते. सावतोबा माळी होते. शेती हेच त्यांचे कर्म. आपल्या या शेतीकर्माचे वर्णन त्यांनी अभंगातून केले आहे. शेतात राबून मेहनत करून आलेले पीक त्यांना विठ्ठल दर्शनाचा आनंद देत होते.
‘कांदा मुळा भाजी ।
अवघी विठाई माझी।।’
हा त्यांचा अभंग प्रसिद्धच आहे. सावता महाराजांनी आपल्या मळ्यातच पांडुरंग पाहिला. महाराजांच्या मळ्यात स्वतःची विहीर होती. त्यांचे समाधी मंदिर या विहिरी शेजारीच आहे. त्यामुळे उन्हाळी पिके सुद्धा असावीत. शिवाय त्यांचे गाव अरण हे पंढरपूर पासून साधारण ४० किलोमीटरवर. त्यामुळे ते अजिबातच पंढरपूरला गेले नसतील, असे संभवत नाही. पण नेमाने वारी घडली नाही, नेमका एकादशीचाच दिवस त्यांना साधला असेल असे नाही, हे मात्र निश्चित असावे. शिवाय, आजही आषाढी वारीला सावता महाराजांची पालखी येत नाही; तर पांडुरंगाचा पालखी सोहळा सावता महाराजांच्या समाधी सोहळ्याच्या कालावधीत अरण येथे येतो. स्वकर्मास फुलांची उपमा देताना ज्ञानेश्वरांसमोर सावता महाराजांसारख्या कर्मयोग्याचे व त्यांच्या फुललेल्या मळ्याचे उदाहरण असावे, असे मला वाटते.
वारी करणे हा वारकरी संप्रदायाचा एक मुख्य आचार पद्धतीचा साधनामार्ग आहे. वारकरी या शब्दाचा सरळ सरळ अर्थ वारी करणारा असा आहे. अनेक संतांनी काही प्रसंगी कष्टाने वारी पार पाडली, याच्याही कथा कीर्तनामध्ये सांगितल्या जातात. मामासाहेब दांडेकर यांच्यासंदर्भातल्या दोन आठवणी यासंदर्भात महत्त्वाच्या आहेत . मामासाहेब स.प. महाविद्यालयामध्ये प्राध्यापक व काही काळ प्राचार्य सुद्धा होते. अशा वेळी वारीमध्ये पूर्णवेळ रजा शक्य नव्हती. तेव्हा मामासाहेब फलटणपासून पालखी सोहळ्यात सहभागी होत. म्हणजेच आपले कर्म सांभाळून वारी करत. एक वर्ष व्यवस्थापनाने मामासाहेबांची अडवणूक करण्यासाठी त्यांना अजिबातच रजा दिली नाही. तेव्हा त्यांनी राजीनामा देण्याची तयारी दाखवली. अर्थात त्यांना रजा मिळाली व वारी चुकली नाही.
येथे वारी चुकते ती कर्मरत असल्याने एरवी वारीमध्ये लाभ होतो. अशा गोष्टी समविचारी लोकांचा सहवास, भजनाचा आनंद महत्त्वाचाच आहे. याबद्दल दुमत दिसत नाही. वारीप्रमाणे वर्षातून समविचारी लोकांनी एकत्रित येऊन काही काळ घालवणे ही आजच्या वारकऱ्यांना वारी महत्त्वाची आहे. संतसंगती, कीर्तन, नामस्मरणाचा महिमा सावतोबांच्या अभंगात सुद्धा आहेच.

प्रपंचाविषयी न्यूनगंड नसणे, परमार्थ साधण्यास प्रपंच अडचणींचा न वाटणे, नामस्मरण या एकाच साधनाच्या जोरावर हृदयामध्ये पांडुरंगाचा वास होण्याची किमया घडणे या सर्व गोष्टी सावता महाराजांनी एका अभंगात सांगितल्या आहेत. शेवटच्या चरणावरून हा अभंग म्हणजे सावता महाराजांनी आपल्या पत्नीस केलेला उपदेश आहे, हे लक्षात येते. अर्थात वारकरी कर्मयोगाचे सार सांगणारा हा अभंग आहे. या अभंगाचा उपदेश सर्वांसाठीच आहे.
‘प्रपंची असूनी परमार्थ साधावा ।
वाचें आठवावा पांडुरंग ।।’
प्रपंचामध्ये राहून परमार्थाची साध्यता करता येते, हेच सावता महाराज यांच्या जीवन दर्शनातून अनुभवता येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kudankulam Data Leak: देशाच्या अणुसुरक्षेला मोठा धोका? भारताच्या सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पाचा डेटा लीक; कुडनकुलम प्रकरण नेमकं काय आहे?

IPL 2027: नवा कॅप्टन ते हार्दिक पांड्याचे ट्रेड... Mumbai Indians ची मोठे निर्णय घेण्यासाठी इंग्लंडमध्ये मिटिंग

Fine Arts BFA Admission: कला शिक्षणाच्या प्रवेश नोंदणीस रविवारपर्यंत मुदतवाढ; अभ्यासक्रमासाठी १ हजार ३७९ विद्यार्थ्यांची नोंदणी

‘कॅन वी अटेंड युअर वेडिंग?’ म्हणत भूषण प्रधान- सायली पाटील पोहोचले चाहत्यांच्या लग्नात; व्हिडिओ व्हायरल!

Bullet Train: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रवासाचा खर्च किती होणार? तिकीट दर विमानांपेक्षा किती स्वस्त असणार, जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT