‘‘संतांचा विद्रोह हा सर्वसमावेशक आणि सर्जक होता. जगासमोर त्यांनी पारमार्थिक लोकशाहीची संकल्पना मांडली. समन्वयाचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून परिवर्तन घडविले त्यामुळे त्यांचा विद्रोह उपकारक आहे; अतिरेकी नाही,’’ असे प्रतिपादन संतसाहित्याच्या अभ्यासक व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे यांनी गुरुवारी केले. डॉ. ढेरे यांनी ‘संतसाहित्य व लोकसाहित्यातील विद्रोह’ या विषयावर विचार मांडले. त्या म्हणाल्या, ‘‘आपल्या काळाला अनुकूल असे साहित्य एकसंधपणे वाचण्याची गरज आहे. सद्यःस्थितीत लोक तुकड्या-तुकड्यांमध्ये वाचन करतात आणि त्यातून आपल्या सोयीचा तुकडा निवडून घेतात, असे होता कामा नये. प्रत्येक परिवर्तनाला द्रोह समजण्याची गरज नसते. मानवाच्या विकासाच्या विधायक मार्गात ज्या विकृती येतात त्यांना दूर सारणे हाच खरा विद्रोह आहे.’’ संतांची भूमिका उलगडून सांगताना डॉ. ढेरे यांनी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, समर्थ रामदास यांच्यासह विविध संतांचे दाखले देऊन त्यांच्या कार्य व विचारातील विद्रोह अधोरेखित केला.
------
भक्तिमार्गाची कास धरून विद्रोह
- नाथपरंपरेचा भाग असलेल्या ज्ञानदेवांनी भक्तिमार्गाची कास धरत भगवद्गीता सोप्या भाषेत आणली, हा त्यांचा विद्रोहच आहे. संत तुकारामांनी ‘पंढरीचे भूत मोठे, आल्या गेल्या झडपी वाटे...’ या शब्दांत देवाला चक्क भूत म्हटले आहे. ही केवढी मोठी बंडखोरी म्हणायची! समर्थ रामदासांनी वेणाबाईंना उभे राहून कीर्तन करण्याची मुभा दिली. त्यांना मठपती केले. त्या ‘वेणास्वामी’ झाली. हा त्या काळात घडलेला मोठा विद्रोहच आहे.
विठ्ठलाच्या पायाशी सर्व एकवटले
- सर्व संतांनी विठ्ठलाला शिरी धरले आहे. विठ्ठलाच्या पायाशी सर्व संप्रदाय एकवटलेले आहेत. त्यामुळे विठ्ठल हा एक महासमन्वय आहे. संतांनी विठ्ठलासाठी ‘विठू माउली’ असा शब्द वापरला. याद्वारे त्यांनी देवाचे मानुषीकरण केले. सामान्यांच्या मनातील देवाची भीती काढली. पुरोहित आणि भगवंतांमधील अडसर दूर करून भक्ताचे थेट देवाशी असलेले नाते अधिक भक्कम केले. यातूनच संतांचा विद्रोह दिसतो.
डॉ. ढेरे म्हणाल्या...
- संतांनी भारतीय संस्कृतीचे प्राणतत्त्व स्पंदित केले
- निरामय जगण्यासाठी विचारांची शस्त्रक्रिया हवीच
- प्रस्थापित घट्ट होऊ लागले की, गतिशीलता थांबते
- प्रत्येक प्रश्नांकडे राजकीयदृष्टीने पाहता कामा नये
- माणसाचे उन्नयन हेच संतांच्या विद्रोहाचे उद्दिष्ट
- परिवर्तनाचे उद्दिष्ट हे समन्वय साधण्याचे असावे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.