सासवड, ता. ३० : सासवड (ता. पुरंदर) शहरात दर सोमवारी होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यात प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. पुढच्या सोमवारी कारवाई करू, असे आश्वासन देणाऱ्या नगरपरिषदेकडून कोणतीही कार्यवाही झाली नाही.
सासवडचा आठवडी बाजार आता केवळ गावठाणापुरता मर्यादित न राहता पीएमटी स्थानक, भूमी अभिलेख कार्यालय ते थेट पोलिस वसाहतीपर्यंत आणि सासवड- कोंढवा रस्त्यापर्यंत पसरला आहे. विशेषतः सासवड नगरपरिषद इमारतीसमोर पालिकेने प्रतिबंध क्षेत्र जाहीर केले आहे. मात्र, याच फलकाखाली आणि रस्त्याच्या दुसऱ्या बाजूलाही हातगाड्यांची गर्दी होत आहे. सायंकाळी ६ ते ८ या वेळेत बाहेरून येणारे फळविक्रेते रस्त्यावरच ठाण मांडत असल्याने वाहतूक कोंडी होत आहे.
गेल्या आठवड्यात मुख्याधिकाऱ्यांनी पथकाद्वारे कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, प्रत्यक्ष या सोमवारी कोणतीही ठोस कार्यवाही दिसून आली नाही. उलट, भाजीपाला बाजार पोलिस वसाहतीपर्यंत विस्तारल्याने कोंडीत अधिकच भर पडली.
याबाबत बोलताना सासवड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांनी सांगितले की, ‘‘पुढच्या सोमवारी पालिकेचे पथक तयार करून आणि पोलिसांची मदत घेऊन हा प्रश्न सोडविला जाईल.’’
06221