सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅंकेसाठी २३६ अर्ज
ॲग्रोवन वृत्तसेवा
सातारा : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या गुरुवारीअखेरच्या दिवशी चार मंत्री, एक खासदार, एक आमदार, माजी खासदार यांच्यासह दिग्गजांनी आपापल्या समर्थकांसह येऊन अर्ज भरले. गुरुवारी एका दिवशी १२९ उमेदवारांनी १६९ अर्ज दाखल केले असून, बॅंकेच्या संचालकांच्या २१ जागांसाठी एकूण २३६ इच्छुकांनी अर्ज भरले आहेत.
सोमवारी (ता. ५) अर्जांची छाननी होणार असून, सहा ऑक्टोबरला पात्र उमेदवारांची यादी जाहीर होणार आहे. त्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी २१ ऑक्टोबरपर्यंत मुदत असून, त्यानंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जांची प्रक्रिया सुरू असून, अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस असल्याने सकाळपासून दुपारी चारपर्यंत दिग्गज नेत्यांनी आपल्या समर्थकांसह येऊन अर्ज दाखल केले. त्यामुळे या निवडणुकीत दिग्गज नेत्यांचे शक्तिप्रदर्शनच पाहायला मिळाले. बॅंकेवर संचालक होण्यासाठी तब्बल २३६ इच्छुक उमेदवार रिंगणात उतरले आहेत. गुरुवारी सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मदत आणि पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील, ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे, पालकमंत्री शंभूराज देसाई, बॅंकेचे अध्यक्ष खासदार नितीन पाटील, आमदार धैर्यशील कदम, माजी खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर, विद्यमान संचालक बाळासाहेब पाटील, अनिल देसाई, शेखर गोरे, शिवरूपराजे खर्डेकर, ज्ञानदेव रांजणे, कांचन साळुंखे, प्रदीप विधाते, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, समशेरसिंह नाईक निंबाळकर, शिवरूपराजे यशवंतराव निंबाळकर, सुनेत्रा शिंदे, डी. के. पवार, काका धुमाळ, सुरेंद्र गुदगे, सुरभी भोसले, अविनाश कदम, नितीन भरगुडे- पाटील आदींसह अनेकांनी अर्ज दाखल केले आहेत.
खासदार उदयनराजे भोसले यांनी यापूर्वीच अर्ज दाखल केला आहे. दाखल झालेल्या १६९ अर्जांमध्ये सोसायटी मतदारसंघातून फलटण पाच, वाई पाच, खंडाळा आठ, माण चार, खटाव चार, कोरेगाव चार, पाटण पाच, कऱ्हाड चार, महाबळेश्वर एक, जावळी आठ, सातारा तीन अशा ५१ उमेदवारांनी अर्ज भरले. राखीव मतदारसंघातून महिला राखीवमधून १९, ओबीसी प्रवर्गातून २३, अनुसूचित जाती प्रवर्गातून १३, विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गातून १७ असे ७२ अर्ज भरले गेले. औद्योगिक विणकर, मजूर संस्था मतदारसंघातून २१, गृहनिर्माण आणि दुग्धसंस्था मतदारसंघातून तीन, बॅंका व पतसंस्था मतदारसंघातून १६, कृषी उत्पादन व प्रक्रिया संस्था मतदारसंघातून दोन, खरेदी-विक्री संघ मतदारसंघातून चार असे एकूण ४६ अर्ज दाखल झाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.