सातारा गॅझेटसाठी राजेंनी
पुढाकार घ्यावा ः जरांगे
सातारा, ता. १२ : साताऱ्याच्या राजघराण्याकडे त्यांच्या पूर्वजांनी दिलेली गॅझेटची शिदोरी आहे. ही शिदोरी मराठ्यांच्या पोरांसाठी खुली करावी. मराठा समाजाच्या कल्याणासाठी दोन्ही राजेंनी पुढाकार घेऊन राज्य सरकारला सातारा व औंध गॅझेट लागू करण्यास सांगावे. हे गॅझेट लागू केल्यास भविष्य व कल्याणाची शिदोरी तुम्ही सरकारला द्यावी आणि समाजाचे कल्याण करावे, अशी अपेक्षा मनोज जरांगे- पाटील यांनी पत्रकार परिषदेत केले.
श्री. जरांगे पाटील यांचे आज राजधानी साताऱ्यात आगमन झाले. या वेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. या वेळी मोठ्या संख्येने मराठा समाजातील कार्यकर्ते उपस्थित होते.
जरांगे-पाटील म्हणाले, ‘‘कोल्हापूर व साताऱ्यातील राजेंकडून मी अपेक्षा करत नाही. ते राजे आहेत; पण मराठा समाजातील पोरांचे भविष्य घडविण्यासाठी जाहीरपणे सांगतो. दोन्ही राजगादींचा आम्ही सन्मान ठेवतो. समाजातील लेकर उपाशी पडू देऊ नका. त्यांच्याकडे समाजाचे भविष्य घडविणारी व कल्याणाची शिदोरी आहे. त्यांनी ही गॅझेटची शिदोरी सरकारला देऊन ही शिदोरी घ्या आणि या समाजाचे कल्याण करा, असे सांगितले पाहिजे.’’
गाडीवरून तुमच्यावर टीका होत आहे, याविषयी विचारले असता जरांगे-पाटील म्हणाले, ‘‘माझ्या समाजातील पोरांनी गाडीत बसायचे नाही का, घर घ्यायचे नाही का, नोकरी करायची नाही का, उच्च शिक्षण घ्यायचे नाही का. आम्ही प्रामाणिक काम करतो. समाजासाठी काहीही करायची माझी तयारी आहे.’’
सरकारचे शिष्टमंडळ चर्चेसाठी आले, तर तुम्ही काय प्रतिसाद देणार यावर ते म्हणाले, ‘‘गेले तीन वर्षे झाले मी समजून घेऊन चर्चा करतोय. आता निर्णायक आंदोलन होणार असून, आता कोणालाही सुटी नाही.’’
.............
चौकट
शिंदे, फडणवीसांना इशारा
-------------
सर्व पक्षातील मराठा नेते माझ्यासोबत आहेत. एकनाथ शिंदेंविषयी गैरसमज होत नाही. यापूर्वी शिंदे, फडणवीस यांच्याशी बोललो होतो. माझ्या व समाजाच्या वाट्याला गेल्याशिवाय मी बोलत नाही. तुम्ही चूक दुरुस्ती करा, तुमचे आमचे संबंध पहिल्यासारखे होतील; पण तुम्ही चूक दुरुस्त नाही केल्यास तुम्हाला सोडणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना त्यांनी दिला.
...............
जरांगे म्हणाले...
- अंतरवालीत २९ ऑगस्टला निर्णायक लढ्यासाठी सर्वांनी यावे
- एकनाथ शिंदेंनी मराठा समाजाचा रोष घेऊ नये
- देवेंद्र फडणवीसांना सांगा, मराठा समाज वस्ताद आहे
- चंद्रशेखर बावनकुळेंची दादागिरी मराठा समाज सहन करणार नाही
- २०० वर्षांपूर्वीच्या आढळलेल्या नोंदी रद्द कशा करता
..............
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.