साताऱ्यातील आयटीआयचे रूप पालटणार
पीएम-सेतू योजनेतून २४१ कोटींची गुंतवणूक; नामांकित उद्योगांच्या सहभागातून रोजगाराच्या नव्या संधी
उमेश बांबरे : सकाळ वृत्तसेवा
सातारा, ता. ४ : केंद्र शासनाच्या ‘पीएम-सेतू’ योजनेअंतर्गत साताऱ्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचा (आयटीआय) चेहरामोहरा बदलून त्यांना आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योगांच्या गरजांशी जोडण्यात येणार आहे. या योजनेद्वारे जिल्ह्यासाठी पुढील पाच वर्षांत तब्बल २४१ कोटी रुपयांची भरघोस गुंतवणूक केली जाणार आहे. यात केंद्र शासनाचा ५० टक्के (१२०.५० कोटी), राज्य शासनाचा ३३ टक्के (७९.५० कोटी) आणि उद्योग क्षेत्राचा १७ टक्के (सुमारे ४१ कोटी) सहभाग असेल.
या योजनेच्या अंमलबजावणीसाठी शिरवळ येथील सयाजी हॉटेलमध्ये उद्योग प्रतिनिधी व अधिकाऱ्यांची ‘इंडस्ट्री मीट’ नुकतीच झाली. यामध्ये संचालक सतीश सूर्यवंशी, उपसंचालक रमण पाटील, सहसंचालक सचिन धुमाळ, जिल्हा व्यवसाय शिक्षण अधिकारी, आयटीआय प्राचार्य व नामांकित व्यावसायिक उपस्थित होते.
साताऱ्यातील ''हब अँड स्पोक'' मॉडेल
या योजनेंतर्गत जिल्ह्यात ''हब अँड स्पोक'' मॉडेल राबवले जाईल. ''सातारा आयटीआय'' हे हब आयटीआय म्हणून काम करेल, तर वाई, मेढा, कोरेगाव आणि औंध-खटाव येथील आयटीआय ''स्पोक आयटीआय'' म्हणून जोडले जातील. साताऱ्यातील या हब संस्थेत चार नवीन व्यवसाय, तर प्रत्येक स्पोक संस्थेत दोन नवीन व्यवसाय सुरू होणार आहेत.
नवीन तंत्रज्ञान, आधुनिकीकरण आणि ‘पीओटीएस’
साताऱ्यातील या निधीतून नवीन मशिनरी, आधुनिक कार्यशाळा आणि पायाभूत सुविधांचा विकास केला जाईल. विद्यार्थ्यांसह शिक्षक, निदेशक व अधिकाऱ्यांनाही प्रशिक्षण दिले जाईल. आधुनिक विषयांचा सहभाग अभ्यासक्रमात होणार आहे. यामध्ये रोबोटिक्स, ड्रोन, इलेक्ट्रिक व्हेईकल, सोलर व इंडस्ट्री ५.० चे प्रशिक्षण दिले जाईल. त्यासोबतच पारंपरिक व्यवसायांचे जसे इलेक्ट्रिशियन, फिटर, टर्नर, मशिनिस्ट, वेल्डर आणि पेंटर या पारंपरिक शाखांचेही अद्ययावतीकरण होईल. प्रत्येक आयटीआयमध्ये स्वतंत्र ''प्रॉडक्शन सेंटर'' स्थापन केले जाईल. येथे औद्योगिक सुटे भाग, शासकीय फर्निचर, कुलर्स व वेल्डिंग उत्पादने तयार केली जातील. यामुळे प्रशिक्षणार्थींना प्रत्यक्ष कामाचा अनुभव, आर्थिक लाभ आणि संस्थेला महसूल मिळेल. एकंदरीत, या योजनेमुळे चितळे, गरवारे, किर्लोस्कर, गोदरेज, टाटा कमिन्स, विप्रो अशा नामांकित उद्योगांच्या सहभागातून साताऱ्यातील ग्रामीण व शहरी तरुणांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.
.....................................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.