साताऱ्यातील सराफ बाजारात तेजीची लाट
‘लॅब ग्रोन’ हिऱ्यांसह १८ व १४ कॅरेट दागिन्यांना वाढती मागणी
सातारा, ता. ३ : ‘दिवाळी सण मोठा, नाही आनंदा तोटा...’ या उक्तीप्रमाणे दीपोत्सव आणि दागिने खरेदीचे अतूट नाते आहे. सातारकरांसाठी दिवाळीत, विशेषतः पाडव्याच्या मुहूर्तावर गुंजभर का होईना सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. या पार्श्वभूमीवर सध्या साताऱ्याच्या सराफ बाजारात प्रचंड उत्साहाचे आणि तेजीचे वातावरण पाहायला मिळत आहे.
सणाच्या तोंडावर सोन्याचे भाव काही प्रमाणात कमी झाल्याने सातारकर ग्राहकांना सोने-चांदीचे दागिने खरेदीचे वेध लागले आहेत. सराफ बाजारात विविध भिशी योजनेसह विविध आकर्षक बक्षिसेही ठेवण्यात आल्यामुळे ग्राहकांपुढे खरेदीचे अनेक उत्तम पर्याय उपलब्ध झाले आहेत. सोन्याचे दर स्थिर नसले, तरीही साताऱ्यातील सराफ दुकानदारांनी ग्राहकांच्या बजेटचा विचार करून तयार १८ आणि १४ कॅरेटच्या दागिन्यांवर अधिक भर दिला आहे. यामुळे ग्राहकांना कमी किमतीत गळाभरून सोने खरेदी करता येत आहे. बाजारात वेडणे, अंगठी, नेकलेस, ब्रासलेट यांसोबतच मंगळसूत्र, ठुशी, बांगड्या, नथी, बुगड्या, रिंगा आणि कर्णफुले यांसारख्या पारंपरिक जुन्या पद्धतीच्या आणि नवीन ‘टेंपर’च्या कलाकुसरीच्या दागिन्यांना मोठी मागणी आहे. यासोबतच चांदीच्या विविध दागिन्यांचीही उपलब्धता आहे. सोने-चांदीबरोबरच हिऱ्यांच्या दागिन्यांनाही मोठी मागणी असते. त्याचबरोबर या लॅब ग्रोन हिऱ्यांच्या दागिन्यांचे सातारकर ग्राहकांमध्ये विशेष आकर्षण पाहायला मिळत आहे.
....................................
(कोट)
दिवाळीत पाडव्याच्या मुहूर्तावर दागिने खरेदीकडे ग्राहकांचा अधिक कल असतो. आता यामध्ये लॅब ग्रोन हिऱ्यांच्या दागिन्यांचाही समावेश झाला आहे. आमच्या म्हसवडकर सराफ पेढीत लॅब ग्रोन हिऱ्यांचे दागिने ग्राहकांच्या बजेटनुसार उपलब्ध केले आहेत.
- निमिष शहा, म्हसवडकर सराफ, सातारा
..............................
दिवाळी सणासाठी नवीन पद्धतीसोबतच पारंपरिक जुन्या पद्धतीचे दागिनेही सराफ पेढीवर उपलब्ध आहेत. सध्या सोन्याचे दर कमी होत असल्याने ग्राहकांना सोने खरेदीची सणाच्या निमित्ताने चांगली संधी आली आहे, तसेच काही सराफ पेढ्यांनी भिशीची सुविधा सुरू केली आहे, ज्यातून अनेक बक्षिसेही ठेवण्यात आली आहेत. सणाच्या निमित्ताने गुंतवणूक व भिशीच्या माध्यमातून सोन्याची खरेदी दोन्ही साधता येणार आहे.
- प्रफुल नागोरी, अध्यक्ष, सराफ असोसिएशन, सातारा
......................................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.