लोगो
----------
बससेवा सुरू होण्याच्या
आशेने सुखावले सातारकर
जुन्या आठवणी जाग्या; नव्या पिढीसाठी पर्यावरणपूरक मिनी बसची अपेक्षा
सातारा, ता. ३ : शहर बससेवा ही केवळ प्रवासाची सुविधा नसून साताऱ्याच्या दैनंदिन जीवनाचा एकेकाळचा अविभाज्य भाग होती. राजवाडा, समर्थ मंदिर, मंगळवार तळे, संगमनगर, कृष्णानगर अशा शहराच्या विविध भागांना जोडणाऱ्या बससेवेच्या जुन्या आठवणी आजही अनेकांच्या मनात ताज्या आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेली ही सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी ‘सकाळ’ने घेतलेल्या पुढाकाराला नागरिकांनी दिलेली साथ आणि त्यानंतर शासनस्तरावर झालेल्या हालचालींमुळे आता सातारकरांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. जुन्या बससेवेच्या आठवणींना उजाळा देतानाच नव्या पिढीसाठी पर्यावरणपूरक मिनी बससेवा लवकर सुरू व्हावी, अशी अपेक्षा नागरिकांच्या प्रतिक्रियांमधून व्यक्त होत आहे.
‘सकाळ’च्या पुढाकाराचे कौतुक
सातारा हे जिल्ह्याचे प्रमुख ठिकाण असल्याने शहरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असणे अत्यावश्यक आहे. बंद पडलेली बससेवा पुन्हा सुरू व्हावी, यासाठी ‘सकाळ’ने घेतलेला पुढाकार आणि त्याला नागरिकांनी दिलेली साथ कौतुकास्पद आहे. ‘सकाळ’ हे प्रभावी माध्यम असून, या प्रश्नाला सातत्याने वाचा फोडल्यामुळे आता त्याची दखल घेतली जात असल्याचे मत सुरेश शिवराम दयाळ (सूत्रसंचालक व हार्मोनियम वादक, कोरेगाव) यांनी व्यक्त केले. सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी बससेवा सुरू करण्याबाबत सकारात्मकता दर्शविल्याचा आनंद असल्याचेही त्यांनी सांगितले.
१९७५ पासून बससेवा पाहिली
मी १९७५ पासून साताऱ्यातील बससेवा पाहिली आहे. समर्थ मंदिर, मंगळवार तळे, राजवाडा, संगमनगर, कृष्णानगर या भागांतून नियमित बससेवा सुरू होती. खालच्या आणि वरच्या रस्त्याने बस धावत असल्यामुळे नागरिकांची मोठी सोय होत होती, अशी आठवण दयाळ यांनी सांगितली.
ते कृष्णानगर येथे पाटबंधारे विभागात नोकरीस होते. त्या काळातील अनुभव सांगताना ते म्हणाले, ‘‘कृष्णानगरची बस आमच्या कार्यालयासमोर कार्यालय सुटण्याच्या वेळेत आतील बाजूस येऊन उभी राहात असे. ही बस राजवाडामार्गे समर्थ मंदिर किंवा मंगळवार तळे येथे जात असे. त्यामुळे कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांची सोय होत होती, तसेच संगमनगर ते बसस्थानक अशीही बससेवा सुरू होती. त्यामुळे बसस्थानकावर जाणाऱ्यांनाही सोय होती.’’
बससेवा अचानक बंद का झाली?
पूर्वीपासून सुरू असलेली बससेवा अचानक बंद का झाली? असा प्रश्न उपस्थित करताना दयाळ यांनी प्रशासनाच्या भूमिकेबाबतही नाराजी व्यक्त केली. खासगी वाहतुकीला बळ देण्यासाठी प्रशासन बससेवा सुरू करत नाही, असा संशय व्यक्त, केला तर चुकीचे ठरणार नाही. बससेवा बंद झाल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक भुर्दंडाबरोबरच शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. याची प्रशासनाला जाणीव झाली नाही, ही आश्चर्याची बाब आहे, असे त्यांनी नमूद केले. ‘सकाळ’ने नागरिकांची गरज ओळखून हा प्रश्न हाती घेतल्याचे सांगत त्यांनी आता बससेवेच्या दिशेने एक पाऊल पुढे पडल्याचे समाधान व्यक्त केले. आता ज्येष्ठ नागरिक आणि शालेय शिक्षण घेणाऱ्या मुला-मुलींसाठी नव्याने सुरू होणारी बस पुन्हा उपयुक्त ठरेल. आमच्या बसप्रवासाच्या जुन्या आठवणी आहेत; तशाच नव्या पिढीलाही बसप्रवासाच्या आठवणी राहतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
मिनी बस, तीही इलेक्ट्रिक असावी
सातारा शहरातील बंद असलेली बससेवा सुरू करण्यासाठी ‘सकाळ’ने केलेल्या प्रयत्नांची लोकप्रतिनिधींनी दखल घेतल्याबद्दल नगराध्यक्ष अमोल मोहिते आणि सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे, असे मत माजी विशेष कार्यकारी अधिकारी आशा अशोक कुंदप यांनी व्यक्त केले. बससेवा लवकरच सुरू होईल, अशी आशा असून, त्यामुळे सातारकर तसेच सातारा परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असल्याचे त्यांनी सांगितले. सातारा शहरातील रस्ते छोटे आहेत. त्यामुळे शहराची रचना लक्षात घेऊन मिनी बससेवा सुरू करावी. ही सेवा पर्यावरणपूरक मिनी इलेक्ट्रिक बसची असावी, अशी मागणी त्यांनी केली.
सातारा शहर आणि जवळपासच्या भागातील ज्येष्ठ नागरिकांनाही सहज प्रवास करता यावा, यासाठी इलेक्ट्रिक मिनी बससेवा लवकरात लवकर सुरू व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
.......................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.