सातारा जिल्ह्यातील
उपसा सिंचन बंदी शिथिल
कृष्णा, उपनद्यांच्या पाण्यावर शेतकऱ्यांना करता येणार सिंचन
ॲग्रोवन वृत्तसेवा
सातारा : जिल्ह्यातील कृष्णा नदी आणि तिच्या उपनद्यांवर लागू करण्यात आलेली उपसा सिंचन बंदी अखेर २६ जूनपर्यंत शिथिल करण्यात आली आहे. या निर्णयामुळे गेल्या काही दिवसांपासून पिकांच्या पाण्यासाठी चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, पिकांचे संभाव्य नुकसान टळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बंदी शिथिल करण्याच्या निर्णयावरून लोकप्रतिनिधी आणि शेतकरी संघटना या दोन्ही बाजूंनी आपापल्या प्रयत्नांना यश आल्याचा दावा केला आहे.
‘एल निनो’चा प्रभाव, मॉन्सूनची संथ प्रगती आणि हवामान विभागाचा अंदाज लक्षात घेऊन जिल्ह्यातील धरणे, नद्या आणि तलावांमधील सिंचनासाठीच्या मोटारींची वीज जोडणी खंडित करण्याचे आदेश यापूर्वी देण्यात आले होते. केवळ पिण्याच्या पाण्याच्या योजनांची वीज जोडणी सुरू ठेवण्यात आली होती.
दरम्यान, पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, खासदार उदयनराजे भोसले, आमदार अतुल भोसले आणि आमदार मनोज घोरपडे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर वरिष्ठ स्तरावरून सकारात्मक निर्देश प्राप्त झाले. त्यानुसार सातारा पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधीक्षक अभियंता ज. स. शिंदे यांनी कृष्णा नदी तसेच तिच्या कुडाळी, वेण्णा, उरमोडी, तारळी, वांग, उत्तरमांड आणि कोयना या उपनद्यांवरील उपसा सिंचन बंदी २६ जून २०२६ पर्यंत शिथिल करण्यात आल्याचे स्पष्ट केले.
महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या सातारा पाटबंधारे प्रकल्प मंडळाने ‘महावितरण’ला अधिकृत पत्र पाठवून नदीवरील सिंचनासाठीची उपसा वीज जोडणी तत्काळ सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार महावितरणने विभागीय आणि उपविभागीय कार्यालयांना आवश्यक कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे लोकप्रतिनिधींनी तातडीने दखल घेऊन प्रश्न मार्गी लावल्याबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे.
शेतकरी आंदोलनाचाही प्रभाव
दुसरीकडे, या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या एकजुटीचा आणि शेतकरी संघटनांच्या तीव्र आंदोलनाचा विजय झाल्याचा दावा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहे. शेतीसाठीची पाणी उपसा बंदी शिथिल व्हावी यासाठी विविध संघटना आणि शेतकऱ्यांनी तालुका स्तरावर आंदोलने केली होती. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी (ता. २२) स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून आदेश शिथिल केल्याची माहिती दिली. तसेच आदेशाची प्रतही त्यांच्या मोबाइलवर पाठविण्यात आल्याचे संघटनेने सांगितले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.