पुणे

ढिंगटांग

CD

ढिंग टांग०५०८२६

या रावजी, तुम्ही जेवा सावजी..!

श्रावण मास लागण्याच्या आतच सदरील ज्ञान देणे आम्हास आवश्यक वाटते. अस्सल नागपुरी झटका असलेले सावजीचे भोजन जेवल्यास महिन्याभरात इस्पितळात जाण्याची वेळ येईल, ऐसे भय आमचे दुष्टांचे कर्दनकाळ आणि सुष्टांचे मित्र जे की तुकारामबावा मुंढेसाहेबांनी व्यक्त केले. हे ऐकून आम्ही हिरमुसलो आहो! आम्ही या पृथ्वीतलावर आजवेरी कैक दशके काढिली. सावजी भोजनाचा आस्वाद हरघडी घेत घेतच आम्ही श्वासोच्छ्वास केला. आजवर तरी आमच्यावर इस्पितळात जाण्याची वेळ आली नाही. उप्परवाला खैर करे!
दु. क आणि सु. मि तुकारामबावा यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाची धुरा हातात घेतल्यानंतर अनेकांना औषध न लगे मजला असे वाटू लागले असून अनेकांना अन्नावरुन उठवल्याची भावना निर्माण झाली आहे. आम्ही जेथे जेथे म्हणून तोंड घालायला जावे, तेथे तेथे हे गृहस्थ आधीच पोचून कायदेशीररित्या झांकपाक करुन येतात! याला काय म्हणावे?
गुदस्त महिन्यात मुंबईतले फेमस आईस्क्रीम खाण्यासाठी आम्ही पोचणार, तोच तुकारामबावांनी तांतडीने सदरील आईस्क्रीम दुकानास टाळे ठोकले. गिरगावातील बहुफेमस सामोसे आणि जिलबीवाल्याच्या प्राचीन दुकानी आम्ही पोचणार, तोच हे तिथे पोचून शील ठोकतें झाले.
अनेक बटाटेवडे विक्रेते गुपचूप गुजरातेत चोरटी दारू विकावी, तशा चेहऱ्याने वडे विकू लागले आहेत, आणि (आमच्यासारखे) खवय्ये, अपराधी मुद्रेने चोरुन ते खाऊ लागले आहेत. आम्ही आजवर जे पनीर पसंदे खाल्ले, ते प्रत्यक्षात पनीर नव्हतेच, ज्या सोयाचापसाठी आम्ही जीव गहाण टाकला तो सोया नव्हताच. इतकेच काय, इतके दिवस जे प्यालो, ते दूधच नव्हते, असले निरनिराळे शोध आम्हाला गेल्या काही महिन्यात लागले. परवा आम्ही मंडईत चांगलासा दुधी भोपळा भीत भीतच घेतला. हा नक्की दुधीच आहे ना, याची खात्री वाटेना.
तसे आम्ही पट्टीचे खवय्ये; पण तूर्त खाण्याजोगा येकच पदार्थ उरला आहे, तो म्हंजे तुकारामबावांची दहशत!! अशा कडकजहाल अधिकाऱ्याने सावजी खाल्ल्यास मी महिनाभरात इस्पितळात जाईन, असे उद्‍गार काढल्याने आम्ही हायच खाल्ली!! एरव्ही बाहेरुन कडकनाथ वाटणारी व्यक्ती अंतरंगात अचानक ब्रायलर निघावी, तसे आम्हाला वाटले.
सावजी भोजनाविषयी तुकारामबावांचे मनीं अनेक गैरसमज असावेत, असा वहीम आहे. सावजी भोजनाने मनुष्य इस्पितळात का जाईल? याची संभवत: कारणे कोणकोणती? असा प्रश्न आम्हांस पडला. सावजी मुर्गी म्हणजे भयंकर जहाल असा काहीतरी गैरसमज विश्वात पसरला आहे. लोकहो, तसे काही नाही. हे फेक नॅरेटिव आहे, हे आम्ही छातीठोकपणाने सांगतो. मटणमुर्गी, डाळकांदा, वांगे, ढेमसे (ऊर्फ टिंण्डे) यांना सावजीचे नाव लागले की स्वादस्वर्ग ठेंगणा होतो. सावजी भोजनकला ही एक उदात्त परंपरा आहे. तिचा योग्य तो सन्मान राहिला पाहिजे.
सावजी भोजन हे स्वादिष्ट भोजन आहे. ज्यास त्याची चव कळली, त्याला स्वादविश्वाचे आर्त आकळले. तुकारामबावांचे म्हणणे खरे असते तर; एकट्या नागपुरात किमान साताठशे सावजी भोजनालये असतील, हर भोजनालयात सरासरी शंभर खवय्ये जेवून आले, असे गृहित धरले तर दररोज किमान पंधरा हजार लोक इस्पितळाच्या खाटांवर गेले पाहिजेत. तसे घडलेले नाही. किंबहुना अनेक पेशंट सावजी खाल्ल्याने कायमस्वरुपी डिस्जार्जावस्थेत असतात, हे सत्य आहे.
आमची विनम्र सूचना अशी : माननीय तुकारामबावांना कुणीतरी सावजी डबा पाठवावा. त्यांची तब्बेत बहलेल, आणि बंद पडलेल्या स्वादगृहांची कुलपे तरी निखळून पडतील! नाही…म्हंजे हा उपाय करुन पाहायला काय हरकत आहे?
-ब्रिटिश नंदी
………………………………..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MCOCA: पुण्यात विषारी दारूमुळे २१ जणांचा बळी घेणाऱ्या टोळीवर ‘मकोका’; राज्य गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई

Daund News : बनावट कुणबी जात प्रमाणपत्र प्रकरणात दौंडचे नगरसेवक रोहित पाटील यांचे सदस्यत्व रद्द

Food Safety Crackdown: कऱ्हाडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; दोन हॉटेल सील, तीन हॉटेलांवर दंडात्मक हालचाली

Latest Marathi News Live Update : श्रेया कालरा हिने नेटफ्लिक्सचा 'कॅप्टिव्ह' रिअ‍ॅलिटी शो जिंकला

ती सगळ्यांसमोर पाणउतारा करायची... अशोक शिंदेनी सांगितलं सेटवर कशा वागायच्या अलका कुबल; पहाटे साडे पाचला...

SCROLL FOR NEXT