फोटो : राऊळगाव ः भीषण स्फोटानंतर इमारतीची झालेली स्थिती.
सकाळ वृत्तसेवा
राऊळगाव (जि. नागपूर), ता.१ : कळमेश्वर तालुक्यातील राऊळगाव येथील एसबीएल एनर्जी लिमिटेड या स्फोटकांची निर्मिती करणाऱ्या कंपनीत आज सकाळी भीषण स्फोट झाला. यात १८ कामगारांच्या अक्षरशः चिंधड्या उडून त्यांचा मृत्यू झाला. या स्फोटात १७ पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. मृत आणि जखमींमध्ये महिला कामगारांचा समावेश आहे. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. येथे छोटे-मोठे शंभर स्फोट झाल्याची माहिती आहे.
राऊळगावलगतच्या येनवरा गावात एसबीएल एनर्जीचा प्रकल्प आहे. या ठिकाणी खाणकाम तसेच औद्योगिक वापरासाठी लागणारे डिटोनेटर्स, स्लरी एक्सप्लोजिव्ह, कास्ट बूस्टर्स, सेस्मिक एक्सप्लोसिव्हचे उत्पादन होते. त्यातीलच एका युनिटमध्ये रविवारी (ता.१) सकाळी सात वाजताच्या सुमारास अचानक स्फोट झाला. स्फोटाची तीव्रता एवढी भीषण होती की यात १८ जणांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना घडली तेव्हा एसबीएलच्या विविध युनिटमध्ये ३० पेक्षा अधिक महिला कर्मचारी काम करीत होत्या. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी स्फोटानंतर लागलेली आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. पोलिस, एनडीआरएफ, एसडीआरएफचे पथक स्थानिक प्रशासन व कंपनीचे बचाव पथक यांच्याकडून घटनास्थळी ढिगारा उपसण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. या ढिगाऱ्याखाली काही कामगार अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. जखमींना पुढील उपचारासाठी नागपूरला हलवण्यात आले आहे.
डिटोनेटर बनविताना स्फोट
एसबीएल एनर्जी लिमिटेड एक प्रमुख औद्योगिक स्फोटके बनविणारी कंपनी आहे. सकाळी कामगार कामावर रुजू झाले असताना डिटोनेटर बनवण्याच्या प्रक्रियेत अचानक मोठा स्फोट झाला. भीषण स्फोटामुळे राऊळगाव व परिसरात भीतीचे वातावरण आहे. अनेक ग्रामस्थ घटनास्थळी जमले होते. दरम्यान, राऊळगाव येथे स्फोटकांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटाची घटना अतिशय दुर्दैवी आणि दुःखद असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. स्थानिक पोलिस प्रशासनाशी त्यांनी संपर्क साधला असून, आवश्यक ती मदत करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. सोबतच मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाखांची मदत घोषित केली आहे.
सुरक्षा ऑडिटवर प्रश्नचिन्ह
काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी, या कंपनीचे सुरक्षा ऑडिट होते की नाही? असा सवाल उपस्थित करत कंपनीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. जखमींना तातडीने आर्थिक मदत करण्याचे आवाहन करत ते म्हणाले की, वारंवार होणाऱ्या स्फोटाच्या घटना कामगारांच्या जिवावर बेतत आहे. या कंपनीच्या सुरक्षा ऑडिट होते की नाही? यासाठी जबाबदार लोकांवर कारवाई होणार की नाही?
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.