चौथी, सातवीच्या विद्यार्थ्यांची
२१ फेब्रुवारीला ‘शिष्यवृत्ती’
सोलापूर, ता. २७ : इयत्ता चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा एकाचवेळी २१ फेब्रुवारीला होणार आहे. शासकीय, अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित, स्वंयअर्थसहाय्यित शाळांमधील विद्यार्थी या परीक्षेला बसू शकतील. विद्यार्थ्यांना https://www.mscepune.in आणि https://puppssmsce.in या संकेतस्थळावरून ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहेत.
नियमित शुल्कासह अर्ज करण्यासाठी २७ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत आहे. विलंब शुल्कासह अर्ज करण्यासाठी १ ते १५ डिसेंबरपर्यंत तर अतिविलंब शुल्कासह १६ ते २३ डिसेंबरपर्यंत आणि अतिविशेष विलंब शुल्कासह ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. शिष्यवृत्ती परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरूपाचे असणार आहेत. प्रत्येक पेपरसाठी ए, बी, सी व डी संचाच्या प्रश्नपत्रिका असणार आहेत. परीक्षा मराठी, उर्दु, हिंदी, गुजराती, इंग्रजी, तेलगू व कन्नड अशा माध्यमात परीक्षा होणार आहे.
--------------------
तीन वर्षांसाठी मिळते शिष्यवृत्ती
इयत्ता चौथीतील विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत आल्यावर त्याला पुढील तीन वर्षांसाठी दरमहा ५०० रुपये शिष्यवृत्ती मिळते. तर सातवीच्या विद्यार्थ्यांना दरमहा ७५० रुपये शिष्यवृत्ती मिळते. या परीक्षेसाठी बिगरमागासवर्गीय विद्यार्थ्याला २००, मागासवर्गीय व दिव्यांग विद्यार्थ्याला १२५ रुपये शुल्क भरावे लागणार आहे. शाळा नोंदणीसाठी २०० रुपयांचे शुल्क भरावे लागणार आहे.