सोमेश्वरनगर, ता. १० : शाळा सुरू होऊन दोन महिने होत आले, मात्र राज्याच्या शालेय शिक्षण विभागाला अजूनही शालेय पोषण आहार शाळेपर्यंत पोहोचवता आला नाही. मागील शैक्षणिक वर्षाच्या अखेरीस शिल्लक राहिलेला तांदूळ शाळांनी कसाबसा पुरवला. मात्र आता कुठे तेल आहे तर तांदूळ नाही किंवा हळद आहे तर जिरे-मोहरी नाही, अशी अवस्था झाली आहे. काही ठिकाणी गुरुजींवर उसनवारीने माल आणण्याची वेळ ओढवली आहे.
सध्या शिक्षण विभागाची वीण पूर्णपणे विस्कटल्यासारखी झाली आहे. त्यांना स्वातंत्र्यदिन तोंडावर आला तरी कसाबसा एकच गणवेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवता आला आहे. विशेष म्हणजे अभ्यासासाठी पुस्तकेसुद्धा पूर्णपणे पुरवू शकलेले नाहीत. अशात शालेय पोषण आहाराच्या नावाने, तर स्वातंत्र्यदिनाला शिमगा करण्याची वेळ ओढवणार आहे. १५ जूनला शाळा सुरू झाल्या. मागील शैक्षणिक वर्षाच्या अखेरीस एप्रिलमध्ये शिल्लक राहिलेला तांदूळ गुरुजींनी सुरवातीला महिनाभर कसाबसा पुरवला. आता अनेक शाळांमधला माल संपला आहे, तर काही शाळांमध्ये तांदूळ, हळद, मीठ शिल्लक आहेत पण तूरडाळ, मूगडाळ, वाटाणा संपले आहेत. पोषण आहार शिजवणाऱ्या महिलेच्या मानधनाची गोष्ट तर खूप दूर आहे. काही गुरुजींना रेशन दुकानदारांकडे चकरा मारून तांदूळ उपलब्ध करण्याची वेळ आली आहे तर काहींनी दुकानदारांना साकडे घालून उसनवारी केली आहे.
तुकाराम मुंडेंचा घेतला धसका
पोषण आहार योजनेवर पुरवठादारांच्या उड्या पडायच्या. मात्र चालू वर्षात पुरवठादार मिळणे आणि टेंडरप्रक्रिया होणे याला प्रचंड विलंब लागला. कदाचित तुकाराम मुंडेंनी पोषण आहाराच्या दर्जाकडे लक्ष देण्याचे सूतोवाच केल्याने हे घडत असल्याची चर्चा झडत आहे. त्यांच्या भीतीने पोषण आहारातील उंदीर गायब व्हावेत, अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.
पोषण आहारापासून विद्यार्थी वंचित राहात आहेत. शिक्षकांनाही भुर्दंड बसत आहे. त्यामुळे मालाचा पुरवठा तातडीने होणे आवश्यक आहे.
- ह. रा. शिंदे, संपर्कप्रमुख, शिक्षक संघ
टेंडरप्रक्रिया पूर्ण होऊन पुरवठ्याचे आदेश निर्गमित केले आहेत. शाळांना मागणी नोंदवण्याच्या सूचना दिल्या आहेत. मागणीनुसार तीन दिवसांत पुरवठा केला जाईल.
- शरद घाडगे, सहाय्यक, शालेय पोषण आहार, जिल्हा परिषद, पुणे
दोन दिवसांपूर्वीच टेंडरप्रक्रिया झाल्याने मागणीपत्रे पुरवठादारांना जातील आणि लगेचच पुरवठा सुरू होईल. जास्तीत जास्त २० दिवसांत सर्वत्र पुरवठा करण्याचे त्यांना बंधन असते.
-संदीप कदम, अधीक्षक, शालेय पोषण आहार, पुरंदर तालुका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.