आळेफाटा, ता. ९ : बोरी बुद्रुक (ता. जुन्नर) येथील कोरडे डेरे शिवारातील जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. शाळेला तातडीने संरक्षण भिंत उभारण्यात यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी शिक्षण विभाग व जिल्हा परिषदेकडे केली आहे. यासंदर्भातील प्रस्ताव शिक्षण विभाग आणि जिल्हा परिषदेकडे सादर करण्यात आला आहे.
कोरडे डेरे शिवार हा ग्रामीण भाग असून, परिसरात मोठ्या प्रमाणावर ऊसशेती आहे. त्यामुळे या भागात बिबट्यासह वन्यप्राण्यांचा वावर आढळून येतो. अशा परिस्थितीत शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. बिबट्याच्या हालचालींमुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शाळेच्या परिसराला संरक्षण भिंत नसल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत अधिक काळजी व्यक्त केली जात आहे.
शाळेच्या आवाराभोवती मजबूत संरक्षण भिंत उभारल्यास विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरण उपलब्ध होण्यास मदत होईल. याशिवाय शाळेच्या परिसरातील झाडेझुडपे स्वच्छ करणे, आवश्यक ठिकाणी प्रकाश व्यवस्था करणे आणि वन विभागामार्फत बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी संबंधित विभागांनी समन्वयाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान, शाळेलगत जाबुत फाटा ते बेल्हे हा महामार्ग असल्याने वाहनांची वर्दळ आणि उडणाऱ्या धुळीचाही विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. धुळीमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने या समस्येकडेही प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन ग्रामपंचायत, शिक्षण विभाग, जिल्हा परिषद आणि वन विभागाने या प्रश्नांची गांभीर्याने दखल घ्यावी. शाळेला संरक्षण भिंत उभारण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देऊन कामाला लवकर सुरुवात करावी, अशी अपेक्षा शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विशाल कोरडे, अजित डेरे आणि स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.