शांतिगिरी महाराजांचा ‘मलवडी रत्न’ने सन्मान
शिवजयंतीनिमित्त पुरस्कार प्रदान सोहळा; गंजी नृत्याने जिंकली मने
दहिवडी, ता. २० : पंच दशनाम जुना आखाडाचे आंतरराष्ट्रीय महामंत्री, विश्व हिंदू परिषदेच्या केंद्रीय मार्गदर्शक मंडळाचे सदस्य, जनसेवा प्रतिष्ठान महाराष्ट्र, गुजरातचे संस्थापक महंत श्री शांतिगिरीजी महाराज यांचा समाजासाठी दिलेल्या योगदानाबद्दल ‘मलवडी रत्न’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
माण तालुक्यातील शिवजयंती महोत्सव समितीकडून दरवर्षी या पुरस्काराचे वितरण करण्यात येते. माळशिरसचे नायब तहसीलदार अमोल कदम, दहिवडी पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय दराडे, डॉ. वैभव तिवाटणे, किसन मगर, आकाश मगर यांच्या हस्ते शांतिगिरी महाराजांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती, सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी पंचायत समिती सदस्य बाळकृष्ण कदम, हेमलता मगर, अमोल घाडगे, प्रकाश पवार, ॲड. संजय शिंदे, श्रीकांत कदम आदी मान्यवर उपस्थित होते. दादा जगदाळे यांनी सन्मानपत्राचे वाचन केले.
या वेळी बोलताना शांतिगिरी महाराज यांनी शिवजयंती महोत्सव समितीच्या कार्याचे कौतुक केले, तसेच हा पुरस्कार माझ्यासाठी गावकऱ्यांनी दिलेला अनमोल ठेवा आहे, असे प्रतिपादन केले. अमोल कदम यांनी शिवजयंती कशी साजरी करावी याचा वस्तुपाठ मलवडीकरांनी घालून दिला आहे, असे सांगतानाच यापुढेही समितीने सामाजिक उपक्रम राबवावेत, असे आवाहन केले. यावेळी विविध क्षेत्रांत प्रावीण्य मिळविलेल्या मलवडी व परिसरातील युवक, युवतींचा गुणगौरव करण्यात आला, तसेच शिवज्योत घेऊन धावणाऱ्या मावळ्यांपैकी प्रातिनिधिक सहा जणांचा सन्मान केला गेला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला टाकेवाडीतील सतोषा मंडळाने गजी नृत्याचे तालासुरात, लयबद्ध सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. त्यानंतर महंत शांतिगिरी महाराज इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी गायन व नृत्य सादर केले. महिलांनी शिव पाळणा गायला व त्यानंतर हळदी- कुंकवाचा कार्यक्रम झाला.
....................................
छायाचित्र : MLV26B07302
मलवडी (ता. माण) : महंत श्री शांतिगिरीजी महाराज यांचा सन्मान करताना अमोल कदम, दत्तात्रय दराडे आदी मान्यवर. (रूपेश कदम : सकाळ छायाचित्रसेवा)
......................................................................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.