काँग्रेसच्या बैठकीला शशी थरूर यांची दांडी
राहुल यांच्यावर नाराज असल्याची चर्चा; पूर्व परवानगी घेतल्याची पक्षाची माहिती
सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता. २३ ः- केरळ विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी आज दिल्लीत झालेल्या काँग्रेसच्या बैठकीला केरळमधील खासदार शशी थरूर यांची अनुपस्थिती चर्चेत राहिली. थरूर हे राहुल गांधी यांच्यावर नाराज असल्याचे बोलले जात आहे. मात्र, केरळमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी थरूर यांनी आधीच बैठकीला न येण्याबाबत पक्षनेतृत्वाकडून परवानगी घेतली असल्याचे काँग्रेसमधून सांगण्यात आले.
केरळच्या निवडणूक तयारीबाबत आज पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या १० राजाजी मार्ग या निवासस्थानी बैठक झाली. मल्लिकार्जुन खर्गेंसह विरोधी पक्षनेते राहुल गांधी, संघटना सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, सचिन पायलट आणि केरळचे राज्यस्तरीय नेते उपस्थित होते. या बैठकीनंतर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खर्गे यांनी ‘एक्स’ या समाज माध्यमावरील पोस्टद्वारे दावा केला की केरळमधील ३.६ कोटी लोक बदलासाठी उत्सुक आहेत. यूडीएफमधील आपल्या मित्रपक्षांसमवेत काँग्रेस पक्ष राज्याच्या विकासासाठी, प्रगतीसाठी आणि कल्याणकारी सुशासनासाठी कटिबद्ध आहे. त्यापार्श्वभूमीवर आज राज्यातील नेत्यांसमवेत आगामी विधानसभा निवडणुकांच्या तयारीबाबत चर्चा केली.
नाराजीमुळेच गैरहजर
दरम्यान, केरळशी संबंधित सर्व नेते बैठकीत हजर असताना केरळमधील महत्त्वाचा चेहरा असलेले आणि काँग्रेस कार्यकारिणीचे सदस्य असलेले शशी थरूर यांची अनुपस्थिती उल्लेखनीय होती. अलिकडेच काँग्रेस पक्षातर्फे कोची (केरळ) येथे राहुल गांधींच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात शशी थरूर यांना अपमानास्पद वागणूक मिळाल्यामुळे ते राहुल गांधींवर आणि प्रदेशस्तरीय नेत्यांवर नाराज असल्याने बैठकीला आले नाहीत, अशी चर्चा होती. याआधीही थरूर यांनी पक्षाच्या बैठकांकडे तसेच सार्वजनिक कार्यक्रमांकडे पाठ फिरवली होती. त्यामुळे नाराजीनाट्यातून थरूर यांनी दांडी मारल्याचे बोलले जात होते. रचनात्मक काँग्रेसची जबाबदारी सांभाळणारे डॉ. संदीप दीक्षित यांनी शशी थरूर यांच्या अनुपस्थितीला महत्त्व देण्याचे टाळले. ‘‘जे महत्त्वाचे नेते होते, ते सारे बैठकीला आले. महत्त्वाचे नसलेले बैठकीत आले नाही,’’ असा टोला संदीप दीक्षित यांनी लगावला. परंतु, थरूर यांनी दांडी मारल्याचा काँग्रेस पक्षातून मात्र याचा इन्कार करण्यात आला. पक्षाच्या सूत्रांनी सांगितले, की तिरुवनंतपुरम या थरूर यांच्या मतदार संघात पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा आणि रोडशो असल्याने थरूर यांनी बैठकीला उपस्थित राहण्यासाठी श्रेष्ठींची परवानगी परवानगी मागितली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.