पान ८ - १२ साठी
--------------------
शेतीतील ‘ती’
------------------------
शेवगा प्रक्रियेतून तयार झाली ओळख
-----------------------------------
पावडेवाडी (ता.जि. नांदेड) येथील मंजूषा गुलाब पावडे यांनी बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन कुटुंबाच्या सहयोगाने दहा एकरांमध्ये शेवगा लागवड केली. त्याचबरोबरीने प्रक्रिया उद्योगाला चालना दिली. शेवगा पावडर, भरडधान्यांपासून त्यांनी २६ प्रकारची प्रक्रिया उत्पादने तयार केली आहेत. महिला बचत गटाच्या माध्यमातून त्यांनी गावशिवारातील वीस महिलांना रोजगार दिला तसेच १५ शेतकऱ्यांचा गट तयार केला आहे. ग्रामीण आणि शहरी बाजारपेठेत त्यांच्या उत्पादनांची वेगळी ओळख तयार झाली आहे.
----------------------------
डॉ. माधुरी रेवणवार
--------------------------
संघर्षाशिवाय यश मिळत नाही आणि संकटांशिवाय माणूस घडत नाही, ही विचारधारा प्रत्यक्ष आयुष्यात उतरविणाऱ्या मंजूषा पावडे आणि त्यांचे पती गुलाब पावडे यांनी आयटी क्षेत्रातील स्थिर आणि सुरक्षित नोकरीचा त्याग करून शेती, सेंद्रिय उत्पादन आणि मूल्यवर्धनाचा मार्ग स्वीकारला. आज त्यांच्या ‘श्री ऑरगॅनिक एक्स्पोर्ट’ या प्रक्रिया उद्योगातून शेवगा, तसेच भरडधान्य आधारित विविध मूल्यवर्धित उत्पादने तयार होतात. मंजूषा पावडे यांचे शिक्षण बी.ई. (आयटी)
आहे, तसेच त्यांचे पती गुलाब पावडे हे देखील संगणक अभियंता आहेत. दोघांनीही पुणे आणि हैदराबाद येथील बहुराष्ट्रीय आयटी कंपन्यांमध्ये पंधरा वर्षे काम केले. चांगला पगार, सुरक्षित भविष्य आणि सुखसोईचे जीवन असूनही समाजासाठी काहीतरी वेगळे करण्याची इच्छा त्यांच्या मनात होती. हैदराबादमध्ये नोकरी करत असताना शेवगा शेंगांचा आहारातील वापर आणि प्रक्रिया उत्पादनांच्या वाढत्या मागणीचा त्यांनी अभ्यास केला. शेवगा पिकामध्ये असलेली मूल्यवर्धनाची संधी लक्षात घेऊन स्वतःच्या शेतीमध्ये सेंद्रिय पद्धतीने शेवगा लागवड करून दर्जेदार प्रक्रिया उत्पादने तयार करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. पावडे दांपत्याने २०१७ मध्ये नोकरी सोडून गावी परतण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय सोपा नव्हता. अनेकांनी यावर प्रश्न उपस्थित केले. परंतु शेती, सेंद्रिय उत्पादन आणि ग्रामीण रोजगाराच्या माध्यमातून सकारात्मक बदल घडविण्यावर त्यांचा विश्वास कायम राहिला.
शेवगा लागवडीला चालना ः
पावडे दांपत्याने पावडेवाडी येथे स्वतःच्या दहा एकर क्षेत्रावर ५ × २ फूट अंतरावर सेंद्रिय पद्धतीने शेवगा लागवड केली. सुरुवातीपासूनच शेती व्यवस्थापनामध्ये गावशिवारातील विधवा, गरजू महिलांना प्राधान्य देण्यात आले. महिलांना आवश्यक प्रशिक्षण देऊन त्यांना शेवगा लागवड, काढणी, प्रक्रिया, पॅकिंग आणि उत्पादन निर्मितीमध्ये सहभागी करून घेण्यात आले. शेवगा पिकाच्या व्यवस्थापनासाठी गांडूळ खत, व्हर्मिवॉश, जिवामृताचा वापर केला जातो. कीड नियंत्रणासाठी सेंद्रिय कीडनाशकांचा वापर होतो. योग्य व्यवस्थापनामुळे गुणवत्तापूर्ण पानांचे उत्पादन मिळते. पहिल्या टप्प्यात शेवगा पाने आणि फुलांपासून उच्च दर्जाची पावडर तयार करून परिचित ग्राहक तसेच ऑनलाइन माध्यमातून विक्री सुरू झाली. ग्राहकांना उत्पादनाचा योग्य वापर आणि सेवन पद्धतीबाबत आवश्यक माहिती देण्यात आली. ग्राहकांचा प्रतिसाद वाढल्याने व्यवसायाला दिशा मिळाली. उत्पादनांची गुणवत्ता, प्रक्रिया पद्धती आणि सातत्यपूर्ण संपर्क यामुळे ग्राहकांचा विश्वास वाढत गेला. या मागणीमुळे त्यांना स्वतःच्या दहा एकर क्षेत्रातून मिळणारे उत्पादन अपुरे पडू लागले. यातून पुढील टप्प्यात परिसरातील शेतकऱ्यांना या व्यवसायाशी जोडण्याचा निर्णय घेतला.
शेतकऱ्यांसोबत गटशेती ः
मंजूषा आणि गुलाब पावडे यांनी परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन सेंद्रिय शेती, शेवगा लागवड आणि सेंद्रिय निविष्ठा तयार करण्याबाबत मार्गदर्शन केले आणि प्रात्यक्षिके घेतली. या प्रयत्नातून त्यांच्यासोबत पंधरा शेवगा उत्पादक जोडले गेले. त्यानंतर या शेतकऱ्यांकडून त्यांनी सेंद्रिय पद्धतीने उत्पादित शेवगा खरेदी सुरू केली. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी गावशिवारात बाजारपेठ उपलब्ध झाली आणि प्रक्रिया उद्योगासाठी दर्जेदार कच्चा माल मिळू लागला. शेती- प्रक्रिया-मूल्यवर्धन-बाजारपेठ अशी एकात्मिक मूल्यसाखळी या उपक्रमातून विकसित झाली आहे.
प्रशिक्षणातून उत्पादनांचा विकास ः
उद्योगाचा विस्तार करताना केवळ उत्पादन वाढविणे पुरेसे नसून प्रक्रिया, नवीन उत्पादनांची निर्मिती, पॅकिंग, ब्रँडिंग आणि बाजारपेठ या बाबींचे ज्ञान आवश्यक असल्याचे पावडे दांपत्याच्या लक्षात आले. यासाठी त्यांनी विविध प्रशिक्षणांमध्ये सहभागी होऊन ज्ञान आणि कौशल्य सातत्याने विकसित केले. फेब्रुवारी २०२६ मध्ये सगरोळी (ता. बिलोली, जि. नांदेड) येथील कृषी विज्ञान केंद्रामध्ये भरडधान्यांपासून विविध पदार्थ तयार करण्याचे अनुभवाधारित सविस्तर प्रशिक्षण घेतले. यामध्ये भरडधान्यांचे महत्त्व, प्रक्रिया तंत्रज्ञान आणि विविध मूल्यवर्धित पदार्थ तयार करण्याबाबत माहिती घेतली. शेवगा पावडर, ज्वारी, नाचणीपासून लाडू, भाजणी पीठ, बेकरी पदार्थ तसेच इतर अनेक प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करण्याचे तंत्र त्यांनी आत्मसात केले. तसेच पॅकिंग, ब्रँडिंग, उत्पादनांचे सादरीकरण, मार्केटिंग आणि बाजारपेठेतील मागणीचा अभ्यास केला. त्यामुळे उपलब्ध कच्च्या मालापासून विविध नावीन्यपूर्ण मूल्यवर्धित पदार्थ तयार करण्याची दिशा मिळाली.
प्रशिक्षणातून मिळालेल्या ज्ञानाचा प्रत्यक्ष व्यवसायात वापर करत पावडे दांपत्याने भरडधान्य आणि शेवगा पावडर यांच्या मिश्रणातून लाडू तसेच लहान मुलांसाठी खाद्य पदार्थ तयार करण्यास सुरुवात केली. या नव्या उत्पादनांना जिल्हास्तरीय तसेच विविध ठिकाणी आयोजित प्रदर्शनांमध्ये सादर केल्यानंतर ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. उत्पादनांचे नावीन्य, गुणवत्ता आणि वेगळेपणामुळे मागणी वाढली. यासाठी त्यांना कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी येथील डॉ. माधुरी रेवणवार आणि कृषी विज्ञान केंद्र, नांदेड येथील डॉ. देविकांत देशमुख यांचे तांत्रिक मार्गदर्शन मिळाले आहे. देशातील विविध भागांतून त्यांच्या उत्पादनांना मागणी असून, पुढील टप्प्यात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रवेश करण्याचे त्यांचे नियोजन आहे. प्रक्रिया उद्योगातून खर्च वजा जाता एक लाखाची उलाढाल होते. या प्रक्रिया उद्योगासाठी त्यांनी प्रमाणपत्र घेतले आहे. तसेच सेंद्रिय पद्धतीने शेवगा उत्पादनाचेही प्रमाणपत्र त्यांना मिळाले आहे.
महिलांना रोजगार ः
मंजूषा पावडे यांनी गावामध्ये पाच वर्षांपूर्वी समृद्धी स्वयंसाह्यता समूह स्थापन केला आहे. यामध्ये दहा महिला कार्यरत आहेत. या महिलांना प्रक्रिया उद्योगात चांगला रोजगार मिळाला आहे. विधवा, गरजू महिलांना उत्पादन प्रक्रियेत सहभागी करून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. सेंद्रिय पद्धतीने शेवगा लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांकडून खरेदी केल्यामुळे त्यांना बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. त्यामुळे महिला सक्षमीकरण, शेतकरी उत्पन्नवाढ, सेंद्रिय शेती आणि कृषी मूल्यवर्धन या बाबींचा संगम या उद्योगातून साधला आहे. प्रक्रिया उद्योगाच्या व्यवस्थापनामध्ये मंजूषाताईंना सासूबाई दयाबाई पावडे यांची चांगली साथ मिळाली आहे.
---------------------
इन्फो ः
‘महालक्ष्मी सरस’मध्ये गौरव ः
मंजूषा पावडे यांच्या प्रक्रिया उद्योगातील महत्त्वाचा टप्पा म्हणजे मुंबई येथे आयोजित ‘महालक्ष्मी सरस २०२६’ प्रदर्शन. ‘उमेद अभियाना’च्या सहकार्यामुळे त्यांना प्रदर्शनात सहभागी होण्याची संधी मिळाली. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवसापासून त्यांच्या उत्पादनांना ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. उत्पादनांची गुणवत्ता, नावीन्य, शुद्धता आणि सादरीकरण यामुळे ग्राहकांची उत्सुकता वाढली. प्रदर्शनाच्या अखेरीस त्यांच्या स्टॉलवर विविध उत्पादनांची सर्वाधिक विक्री झाल्याने प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.
-------------------------------
इन्फो ः
उत्पादनांची निर्मिती ः
१) प्रक्रिया उद्योगामध्ये २६ प्रकारच्या मूल्यवर्धित उत्पादनांची निर्मिती. यामध्ये शेवगा पावडर, टॅब्लेट्स, सूप, चटणी, लाडू, मुखवास, शेवगा-हळद चॉकलेटचा समावेश.
२) हर्बल साबण, हेअर ऑइल, फेस वॉश, फेस स्क्रब, टोनर आणि इतर विविध मूल्यवर्धित उत्पादनांची निर्मिती.
३) भरड धान्य आणि शेवगा पावडर मिश्रणातून नवीन खाद्यपदार्थाची निर्मिती.
----------------------
इन्फो ः
कर्करोगावर मात ः
प्रक्रिया उद्योग उभारत असतानाच मंजूषा पावडे यांच्या आयुष्यात मोठे संकट आले. त्यांना कर्करोगाचे निदान झाले. उपचारादरम्यानचा काळ शारीरिक तसेच मानसिकदृष्ट्या अत्यंत कठीण होता. मात्र कुटुंबाचा भक्कम आधार, स्वतःवरील विश्वास आणि काहीतरी सकारात्मक करण्याची जिद्द या बळावर त्यांनी संकटावर मात केली. कर्करोगाशी दिलेल्या लढ्याने त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला अधिक बळ दिले. अडचणी आल्या तरी ध्येय सोडायचे नाही, हा आत्मविश्वास अधिक दृढ झाला.
--------------
संपर्क :
- मंजूषा पावडे, ९१७२८९५५८९
- डॉ. माधुरी रेवणवार, ९४०३९६२०१४
(वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी, जि. नांदेड)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.