पारंपरिक शेतीत न अडकता कृषिपूरक व्यवसायांकडे वळावे
संजीवराजे नाईक-निंबाळकर; फलटणमधील श्रीमंत मालोजीराजे कृषी प्रदर्शनाचा समारोप
फलटण, ता. १ : कृषी क्षेत्र हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असून, रोजगाराची मोठी संधी उपलब्ध आहे. युवा शेतकऱ्यांनी केवळ पारंपरिक शेतीत अडकून न राहता कृषिपूरक व्यवसायांमध्ये सक्रिय होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी केले.
फलटण एज्युकेशन सोसायटी आणि कृषी महाविद्यालय फलटण यांच्या वतीने आयोजित श्रीमंत मालोजीराजे कृषी प्रदर्शनाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कृषिभूषण अंकुश पडोळे, राजश्री छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय, कोल्हापूरचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. एस. एस. कांबळे, महाविद्यालयीन समितीचे उपाध्यक्ष शरदराव रणवरे, गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य भोजराज नाईक निंबाळकर, नितीन गांधी, रणजित निंबाळकर, फलटण दूध संघाचे अध्यक्ष धनंजय पवार, प्रशासन अधिकारी अरविंद निकम, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण, मालोजीराजे शेती विद्यालयाचे प्राचार्य श्री. काळे, परिसरातील शेतकरी, प्राध्यापक वृंद, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
अंकुश पडोळे यांनी जमिनीच्या ढासळत्या आरोग्यावर चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा व औषधांचा अतिरेक केल्यामुळे जमिनीची उत्पादकता कमी होत आहे. पंजाबमधून राजस्थानला जाणारी ‘कॅन्सर ट्रेन’ हे त्याचेच भयानक उदाहरण आहे. भविष्यातील पिढीला सुपीक जमीन द्यायची असेल, तर आताच जागे होऊन सेंद्रिय कर्ब वाढवणे आणि विषमुक्त अन्न पिकवणे गरजेचे आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे नैसर्गिक आहाराकडे वळण्याचे आवाहनही त्यांनी केले.
संजीवराजे म्हणाले, ‘‘रासायनिक खते आणि औषधांमुळे जमिनीचा पोत बदलत चालला आहे. ही चिंतेची बाब आहे. सेंद्रिय व विषमुक्त शेती उत्पादनांना जगभरातून मागणी वाढत असून, युवा शेतकऱ्यांनी सजग होऊन अशा शेतीला प्राधान्य देऊन कृषी उत्पन्न वाढवले पाहिजे, तसेच कृषिपूरक व्यवसायांमध्ये सक्रिय होणे गरजेचे आहे. यातून शाश्वत आर्थिक उत्पन्नाचा मार्ग मिळेल.’’ प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर यांनी प्रास्ताविक केले. दिक्षा चौगुले व सृष्टी झाडोकर यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. ए. पी. रणवरे यांनी आभार मानले. कृषी प्रदर्शनात अडीच फूट उंचीची म्हैस, दहा नखे असलेला आंधळा कोंबडा, क्षारपड जमिनीसाठी वरदान ठरणारे सबसॉयलर यंत्र, ३६ किलो वजनाचा केळीचा गढ अन् मिनी कोळपणी यंत्र हे सर्वांचे विशेष आकर्षण ठरले. यावेळी जिल्ह्यातील एक लाख ५७ हजार शेतकरी, महिला आणि युवकांनी या प्रदर्शनाला भेट दिली.
02385
फलटण : मार्गदर्शन करताना संजीवराजे नाईक-निंबाळकर. त्या वेळी व्यासपीठावर डॉ. एस. एस. कांबळे, धनंजय पवार, रणजित निंबाळकर आणि इतर.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.