केसनंद, ता. ३ : शिरसवडी येथे गावठी पिस्तुलातून गोळीबार करून ११ लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या दोन सोनसाखळ्या लुटणाऱ्या आंतरराज्यीय टोळीवर लोणीकंद पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये मकोका कारवाई केली आहे. या प्रकरणी उत्तर प्रदेशातील तिघांना अटक करण्यात आली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी अविनाश कृष्णचंद्र त्रिपाठी (वय ४३), मोहम्मद शोएब वसीम खान सिद्दीकी (वय ३६) आणि सुरेंद्र रामचंद्र पाल (वय ३२, तिघे रा. उत्तर प्रदेश) यांना अटक केली. ५ ऑगस्ट २०२६ला रात्री साडेआठच्या सुमारास हवेली तालुक्यातील शिरसवडी येथील गावडेवाडी परिसरात ही घटना घडली होती. फिर्यादीचे भाऊ संतोष ज्ञानोबा गावडे (वय ५०) हे कार्यालय बंद करून घरी जात असताना दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्यांच्यावर गोळीबार केला. यात ते गंभीर जखमी झाले. आरोपींनी त्यांच्या गळ्यातील २२ तोळे वजनाच्या ११ लाख रुपयांच्या दोन सोनसाखळ्या हिसकावून नेल्या होत्या.
लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३१५/२०२६ नुसार गुन्हा दाखल आहे. मुख्य आरोपी अविनाश त्रिपाठी याच्यावर शिक्रापूर, कोरेगाव पार्क, हडपसर तसेच उत्तर प्रदेशात खून, खंडणी व अपहरणासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. आरोपी संघटितपणे गुन्हे करत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्यावर मकोका कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली.
ही कारवाई पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलिस आयुक्त संजय दराडे, अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील, राजेश बनसोडे, पोलिस उपायुक्त अविनाश कुमार, सहायक पोलिस आयुक्त अनिता मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनीता रोकडे व पथकाने केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.