शिरूर, ता. २ : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आठ व राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पाच सदस्यांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या ‘शिरूर नगर परिषद गट’ या सत्ताधारी आघाडीला अंतर्गत राजकीय कलहातून तडे गेले असून, उपनगराध्यक्षांसह राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पाच नगरसेवकांनी सत्ताधारी गटातून बाहेर पडण्याचा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे नगर परिषदेतील सत्तेची समीकरणे झपाट्याने बदलली आहेत.
शिरूर नगर परिषदेच्या डिसेंबर २०२५ ला झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ऐश्वर्या अभिजित पाचर्णे नगराध्यक्षपदी निवडून आल्या होत्या. तर भाजपचे सर्वाधिक ११ नगरसेवक निवडून आले होते. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सात, तर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पाच नगरसेवक निवडून आले होते. एका अपक्षानेही या निवडणुकीत बाजी मारली होती. १२ हे बहुमताचे संख्याबळ कुठल्याच पक्षाला गाठता न आल्याने त्रिशंकू अवस्था निर्माण झाली होती. या स्थितीत एका अपक्षासह दोन्ही राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी एकत्र येत जिल्हाधिकाऱ्यांकडे ‘शिरूर नगर परिषद गट’ नावाने स्वतंत्र गटाची नोंदणी करून सत्ता स्थापन केली. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याने सर्वाधिक सदस्य निवडून येऊनही भाजपला सत्तेपासून दूर राहावे लागले होते.
या सत्तास्थापनेनंतर उपनगराध्यक्षपदासह पाणीपुरवठा समितीचे सभापतिपद व महिला व बालकल्याण समितीचे उपसभापतिपद राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नगरसेवकांकडे गेले होते. केवळ राजकीय तडजोडीतून जुळवून घेतलेल्या या गटातील दोन्ही पक्षांचे सदस्य मात्र मनाने एक न झाल्याने किरकोळ कुरबूरी, हेवेदावे, आरोप- प्रत्यारोप आणि राजकीय चढाओढी चालूच होत्या. अखेर ही अंतर्गत खदखद आज उफाळून आली.
राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडून आलेले उपनगराध्यक्ष मितेश प्रदीप गादिया, माजी नगराध्यक्ष रवींद्र ढोबळे, पाणीपुरवठा समितीच्या सभापती डॉ. सुनिता संतोष पोटे, महिला व बालकल्याण समितीच्या उपसभापती स्वप्नाली योगेश जामदार, सदस्या चारुशीला गणेश कोळपकर या नगरसेवकांनी आज नगराध्यक्षा ऐश्वर्या पाचर्णे यांना पत्र दिले असून, सत्ताधारी शिरूर नगर परिषद गट या गटातून मुक्त करण्याची मागणी केली आहे. पक्षाचे नेते व स्थानिक पदाधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेतून सत्ताधारी गटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असल्याचे ढोबळे यांनी सांगितले. सत्ताधारी गटातून आम्हाला मुक्त करावे, अशा आशयाचे पत्र नगराध्यक्षा पाचर्णे यांना दिले असून, सत्ताधारी गटात आम्हाला सापत्नभावाची वागणूक दिली जात असल्याने तसेच विकासकामांमध्ये दुजाभाव केला जात असल्याने सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घ्यावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.