MGV26B16517
माचणूर (मंगळवेढा) : येथील श्री सिद्धेश्वर मंदिर प्रांगणात ‘शिव ते शिव’ या विशेष व्याख्यानात बोलताना वक्ते डॉ. शिवरत्न शेटे. या वेळी उपस्थित डॉ. व्यंकटेश मेतन आदी.
---
‘शिव ते शिव’ व्याख्यानातून
माचणूरमध्ये शिवचरित्राचा जागर
श्रावणानिमित्त डॉ. मेतन फाउंडेशनचा उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
मंगळवेढा, ता. ५ : श्रावण मासानिमित्त डॉ. मेतन फाउंडेशनतर्फे माचणूर येथील श्री सिद्धेश्वर मंदिर प्रांगणात प्रसिद्ध वक्ते डॉ. शिवरत्न शेटे यांच्या ‘शिव ते शिव’ या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. दैनिक ‘सकाळ’चे सहयोगी संपादक सिद्धाराम पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
डॉ. शिवरत्न शेटे यांनी भगवान शिव आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांतील साम्य स्पष्ट करत शिवरायांच्या कार्यावर प्रकाश टाकला. गड-किल्ल्यांवरील शिवमंदिरांचा संदर्भ देत त्यांनी शिवरायांची श्रद्धा आणि समाजहिताची भूमिका मांडली. तसेच जिजाऊंच्या संस्कारांचे महत्त्व सांगत विद्यार्थ्यांनी ध्येयवाद, शिस्त आणि सामाजिक जबाबदारी अंगीकारावी, असे आवाहन केले.
सिद्धाराम पाटील यांनी स्वामी विवेकानंदांच्या विचारांचे आचरण करून उत्तम व्यक्तिमत्त्व घडविण्याचे आवाहन केले. प्रास्ताविकात डॉ. व्यंकटेश मेतन यांनी फाउंडेशनच्या उपक्रमांची माहिती दिली. विठ्ठलराव डोके यांनी मंदिर ट्रस्टचा परिचय करून दिला. कार्यक्रमास सुमारे ५०० विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते. महेश बनसोडे यांनी आभार मानले. कार्यक्रमानंतर प्रसादाचे वाटप करण्यात आले.