पान ५
शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याची
कला शिवाजीराव देशमुखांकडे
शरद पवार ः ‘आठवणींची ओंजळ’ पुस्तकाचे प्रकाशन
ॲग्रोवन वृत्तसेवा
पुणे : ‘‘प्रशासनात काम करताना शेतकऱ्यांच्या मनातील भावना ओळखून त्यांच्या समस्या सोडविण्याची कला शिवाजीराव देशमुख यांच्याकडे आहे. त्यांच्या योगदानामुळे वसंतदादा साखर संस्थेचा (व्हिएसआय) विस्तार झाला आणि साखर उद्योगाला आंतरराष्ट्रीय पत मिळाली,’’ असे गौरवोद्गार ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी काढले.
माजी सनदी अधिकारी शिवाजीराव देशमुख लिखित ‘आठवणींची ओंजळ’ या पुस्तकाचे प्रकाशन सोमवारी (ता. १७) पवार यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमाला केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी, यशदाचे महासंचालक सुहास दिवसे, माजी कृषिमंत्री शशिकांत सुतार, माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, माजी मुख्य सचिव अजित निंबाळकर, सुमित मलिक, नितीन करीर आदी उपस्थित होते.
पवार म्हणाले, ‘‘समस्या सोडविण्याचे आदर्श उदाहरण म्हणजे शिवाजीराव देशमुख होय. कोल्हापूरच्या समस्यांचे चित्रण या पुस्तकात करण्यात आले आहे. बारामतीचे प्रांताधिकारी म्हणून काम करण्यास ते सुरुवातीला इच्छुक नव्हते. त्यावेळी मी मुख्यमंत्री होतो. मुख्यमंत्र्याच्या गावात काम करताना प्रत्येक कार्यकर्ता मीच मुख्यमंत्री आहे, अशा आविर्भावात वागतो, त्यामुळे बारामतीला येण्यास त्यांनी नकार दिला होता. मात्र प्रत्येक पदावर काम करताना त्यांनी उत्तम काम केले. त्यांच्या अनुभवाचा विचार करून मी त्यांची ‘व्हीएसआय’वर नियुक्ती केली. त्यांनी तेथेही शिस्त आणत संस्थेचा विदर्भ, मराठवाडा आणि कोकणात विस्तार केला. या विस्ताराचे श्रेय त्यांना जाते.’’ ‘व्हीएसआय’च्या माध्यमातून साखर उद्योगाला आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्यातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या कार्यामुळे ४० देशांचे प्रतिनिधी ‘व्हीएसआय’ला भेट देऊ लागले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, की युती सरकारच्या काळात १९९५ मध्ये मला नागपूरला दोन चांगले अधिकारी हवे होते. त्या वेळी मला शिवाजीराव देशमुख आणि श्रीनिवास पाटील यांची नावे सुचविण्यात आली. मात्र या दोघांवर शरद पवार यांचा ठप्पा आहे. ठप्पा असू द्या, फक्त काम करणारा पाहिजे, असा माझा आग्रह होता. या दोन्ही अधिकाऱ्यांची प्रशासनावर पकड आणि निर्णयक्षमता होती. लोकाभिमुख निर्णय घेताना कायदा न तोडता तो कसा वाकवला जातो, हे देशमुख यांना चांगले जमले आणि लोकहिताची कामे झाली. त्यांच्या अनुभवाचे हे पुस्तक प्रशासकीय सेवेत येणाऱ्यांसाठी महत्त्वाचे अनुभवकथन आहे. त्यांनी हे पुस्तक वाचावे.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिवसे यांनी केले. सुधीर भोंगळे यांनी पुस्तकामागील भूमिका विशद केली. तर पोलिस अधिकारी पांडे, निंबाळकर, सुतार यांनी मनोगते व्यक्त केली.
‘२२ कारखाने काढून मोठी चूक’
‘‘मी नेहमी म्हणतो, मागील जन्मी पाप केले तो साखर कारखाना काढतो. मी आयुष्यातील मोठी चूक केली, २२ कारखाने काढले. मात्र आता केवळ चारच चालवतो. साखर उद्योगाच्या समस्या कमी करण्यासाठी ‘व्हीएसआय’चे नागपूरला केंद्र काढण्याची विनंती पवार साहेबांना केली आणि देशमुखांमुळे ते शक्य झाले,’’ असे नितीन गडकरी म्हणाले.
‘अधिकाऱ्यांचे बायकोपेक्षा फाइलवर जास्त प्रेम’
‘‘ज्या अधिकाऱ्यांना एक तारखेला पगार मिळतो, त्यांना वेळेचे महत्त्व नसते. काही अधिकारी पत्नीपेक्षा फाइलवर जास्त प्रेम करतात आणि फाइल अडवून ठेवतात. यामुळे फाइलमध्ये बराच वेळ जातो,’’ असेही गडकरी म्हणाले.
फोटो
पुणे : शिवाजीराव देशमुख लिखित ‘आठवणींची ओंजळ’ या पुस्तकाचे प्रकाशन सोमवारी (ता. १७) शरद पवार यांच्या हस्ते झाले. या वेळी (डावीकडून) यशदाचे महासंचालक सुहास दिवसे, माजी मुख्य सचिव नितीन करीर, माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, शिवाजीराव देशमुख, श्री. पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी कृषिमंत्री शशिकांत सुतार, माजी मुख्य सचिव अजित निंबाळकर, सुमित मलिक आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.