शिवशंकर पतसंस्थेचे ठेवीदार आक्रमक
चार वर्षांपासून संस्था बंद; चार वर्षांत १७ ठेवीदारांच्या मृत्यूनंतरही वसुलीला वेग नाही
कऱ्हाड, ता. २१ ः येथील शिवशंकर पतसंस्था बंद होऊन सुमारे चार वर्षे उलटली, तरीही केवळ अवसायकाची नियुक्ती झाली आहे. ती होऊनही ठोस वसुली होत नसल्याने शासकीय यंत्रणेच्या दिरंगाईचा थेट फटका ठेवीदारांना बसत आहे. थकीत कर्जदारांकडून वसुली, मालमत्तांवरील कारवाई, गैरव्यवहाराची चौकशीचा तातडीने निर्णय घेऊन ठेवीदारांची रक्कम परत मिळवून द्यावी, अशी मागणी सहकार उपनिबंधकांकडे निवेदनात केली आहे.
उपनिबंधकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की लेखापरीक्षण अहवालानुसार संस्थेतील तत्कालीन अध्यक्ष, संचालक, व्यवस्थापक अधिकारी आणि कर्मचाऱ्यामुळे कोट्यवधी रुपयांचे कर्ज थकीत झाली आहेत. त्यात पुरेशी फौजदारी झालेली नाही. सहकारी संस्था अधिनियमातील तरतुदीनुसार शिवशंकर संस्थेची चौकशी झाली, तरीही त्या अहवालानंतरही पुढील कारवाईबाबत स्पष्टता नाही. पूर्वी नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांच्या अहवालानंतर नव्याने अधिकृत चौकशी अधिकारी नियुक्तीचे आदेश असतानाही अद्याप नियुक्ती नाही. संस्थेचे माजी पदाधिकारी व संबंधित व्यक्तींनी संगनमत करून संस्थेच्या मालमत्ता विक्री, हस्तांतरण अथवा अन्य प्रकारे व्यवहार केल्याचा आरोप ठेवीदारांनी केला आहे. काही मालमत्तांबाबत ‘फ्रॉड्युलंट ट्रान्सफर’ झाल्याचा दावा करत संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी. संस्थेची रक्कम वसूल करण्यासाठी उपलब्ध मालमत्तांवर तातडीने कारवाई करावी. वसुलीला विलंब होत असल्याने ठेवीदारांना एक रुपयाही मिळत नाही. या काळात सुमारे १७ ठेवीदारांचा मृत्यू झाल्याचा दावा केला आहे. संस्थेकडे शिल्लक रकमेतून सुमारे ४० टक्के रक्कम खर्च झाल्याचेही निवेदनात नमूद आहे. त्यामुळे उर्वरित निधीचे संरक्षण आणि ठेवीदारांच्या पैशांची परतफेड त्याबाबत तातडीने निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली आहे. अवसायकाची अंतिम नियुक्ती कधी होणार तेही स्पष्ट करावे. ठेवीदारांच्या आर्थिक अडचणी लक्षात घेऊन १५ दिवसांत योग्य निर्णय घेऊन कारवाई करावी, अशी स्पष्ट मुदत निवेदनातून देण्यात आली आहे. त्या कालावधीत समाधानकारक कारवाई न झाल्यास कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा ठेवीदारांनी दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.